शांता मोडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शांता भास्कर बिंबा मोडक (१ एप्रिल, इ.स. १९१९ - २८ एप्रिल, इ.स. २०१५) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका होत्या. [१]

त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण इंदूरमधून घेतले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी एसपी कॉलेजमधून १९४२मध्ये कला शाखेची पदवी मिळवली. विश्राम बेडेकर दिग्दर्शित चूल आणि मूल या चित्रपटातील बिंबा नावाच्या नायिकेच्या भूमिकेतून शांता मोडक यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दामूअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाटक कंपनीतून त्यांनी १९४९मध्ये संगीत भावबंधन या नाटकाच्या द्वारे रंगभूमीवर पाऊल ठेवले. नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर शांताबार्इंनी गाणे शिकण्यास सुरुवात केली. संगीत नाटकांतील पदांचे शिक्षण त्यांनी गंधर्व नाटक मंडळीतील बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे पट्टशिष्य व गायक-नट कै. हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे घेतले. याशिवाय कै. हरिभाऊंनी त्यांना मास्तर कृष्णराव मैफिलीत गात असलेल्या शास्त्रीय संगीतातील चिजांची देखील तालीम दिली.

शांता मोडक यांनी भारत नाटक कंपनी, संध्या थिएटर या नाटकमंडळींच्या, व पंडितराव तरटे यांच्या कंपनीच्या अनेक संगीत नाटकांत भूमिका केल्या. त्यामुळे छोटा गंधर्व, श्रीपादराव नेर्लेकर, कृष्णराव तोंडकर, जयराम शिलेदार अशा गायक-नटांबरोबर त्यांना भूमिका करायला मिळाल्या.

इन मीन साडेतीन, ऊन-पाऊस या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.

शांता मोडक यांची नाटके आणि त्यांच्या त्यांतील भूमिका[संपादन]

 • संगीत एकच प्याला (सिंधू)
 • झुंझारराव (कमला)
 • संगीत द्रौपदी (द्रौपदी)
 • संगीत भावबंधन (लतिका)
 • संगीत मृच्छकटिक (वसंतसेना)
 • संगीत विद्याहरण (देवयानी)
 • संगीत सौभद्र ( सुभद्रा)
 • संगीत स्वयंकर (रुक्मिणी)

पुरस्कार[संपादन]

 • महाराष्ट्र राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार
 • पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार
 1. ^ शांता मोडक यांचे निधन. Maharashtra Times; Apr 29, 2015.