मुंबईतील डबेवाले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबईतील डब्बेवाले या पानावरून पुनर्निर्देशित)
डबेवाले
डबेवाले
डबेवाले

डबेवाले हे मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करतात. डबे पोहचवण्याचे काम ऐकण्यास सोपे वाटत असले तरी मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ज्या अचूकतेने हे काम केले जाते त्या कारणाने मुंबईचे डबेवाले संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाले आहेत.

मुंबई शहर हे विस्ताराने अवाढव्य असल्याने कामाच्या जागी वेळेवर पोहचण्यासाठी नोकरदार मंडळींना घरांतून लौकर निघावे लागते. जर डबेवाल्यांची यंत्रणा अस्तित्वात नसती तर बहुसंख्य मंडळींना सकाळचा नाष्ता व दुपारच्याजेवणाचा डबा सकाळीच घेऊन निघावे लागले असते. डबेवाल्यांच्या यंत्रणेमुळे बहुसंख्य गृहिणी गरम जेवण भरलेला डबा कार्यालयात पाठवू शकतात. . १८९० ला हा व्यवसाय मुंबईत सुरू झाला. १८९० ला संपुर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य होते. व भारताचा इंग्लंडशी व्यापार चालायचा तो मुंबईच्या बंदरातुन चालायचा या व्यापारा मुळे काही कंपनींची कार्यालये दक्षिण मुंबईत होती.या कार्यालयात काम करणार्यांना पहीले डबे पोचवण्याचे काम सर्व प्रथम चालु झाले. व्यवस्थापन कौशल्याने डबेवाले काम करत गेले. जसं जसं डबेवाले काम करत गेले तसं तसं व्यवस्थापनाचे उच्चांक आपोआप घडत गेले.डबेवाले संघटनेचे नेते मॅनेजमेंन्ट गुरू कै.गंगाराम तळेकर हे डबेवाले संघटनेचे सरचिटणीस होते तेव्हा संस्थेने अनेक जागतीक पुरस्कार मिळवले. गिनिजबुकात डबेवाल्यांची नोंद झाली.सिक्स सिग्मा मिळाला ISO प्रमाणपत्र मिळाले कै.गंगाराम तळेकर यांचे वडील कै.लक्ष्मण तळेकर हे डबेवाले संस्थेच्या संस्थापका पैकी एक सदस्य होते.कै.गंगाराम तळेकर यांचे चिरंजीव सुभाष तळेकर आता डबेवाले संस्थेत प्रवक्ता आहेत. अशा प्रकारे डबेवाल्यांच्या या व्यवसायात तिन तिन पिढ्या कार्यरत आहेत. दिवसाला २ लाख डबे घरातुन कार्यालयात व जेवून रिकामी झालेले २ लाख डबे पुन्हा घरी पोचवायचे म्हणजेच दिवसाला ४ लाख डब्यांची देवाण घेवाण डबेवाले करतात. चर्चगेट ते विरार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण व नवी मुंबई या दरम्यान ५ हजार डबेवाले काम करत आहेत.

सुरुवात[संपादन]

महादू हावजी बुचे यांनी सन १८९० साली ३५ डबेवाल्यांसह ही सेवा सुरू केली. त्यानंतर डबेवाला धर्मशाळेची स्थापना रघुनाथ मेडगे यांनी केली.

मुंबई शहरात सध्या सुमारे ५००० डबेवाले आहेत. त्यांपैकी ८५ टक्के डबेवाले निरक्षर व १५ टक्के डबेवालेच साक्षर आहेत. हे डबेवाले सुमारे २,००,००० डब्यांची ने-आण करतात असा अंदाज आहे.[१]

नियम व शिस्त[संपादन]

त्यांच्या कामात शिस्त आहे. कुठल्याही घरून डबा घेण्यासाठी फक्त ५ सेकंदांचा वेळ देण्यात येतो. नेहमीच उशिरा डबा देण्याची सवय असल्यास तो डबा बंद करण्यात येतो. यावर असलेल्या रंग संकेतामुळे(कलर कोड) डब्याची अदलाबदल कधीच होत नाही. या डबेवाल्यांनी गेल्या १२० वर्षात कधीच संप केलेला नाही. सर्व डबे पोहेचते झाल्याशिवाय कोणताही डबेवाला जेवत नाही.

या डबेवाल्यांच्या आयुष्याच्या पार्श्वभूमीवर ’मुंबईचा डबेवाला’ नावाचा एक मराठी व्यावसायिक चित्रपटही बनवण्यात आला होता. त्यात भरत जाधव यांची प्रमुख भूमिका होती.

प्रणालीची ओळख[संपादन]

एकाच भागातील डबे प्रथम एकत्र करून त्यांची गंतव्य स्थानाप्रमाणे छटाई (Sorting) होते. एकाच ठिकाणी जाणारे डबे जलद पोहोचणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्यांवर (Fast Local Trains) चढवण्यात येतात. डब्यांवर पोहोचवायचा पत्ता ठिपक्यांच्या स्वरूपात गोंदलेला असतो. सुरुवातीच्या काळात अनेक डबेवाले निरक्षर असल्याने ठिपक्यांच्या स्वरूपातील पत्ता त्यांना सोईचा होता. प्रत्येक स्टेशनवर त्या त्या ठिकाणचे डबे उतरवले जातात व वितरणासाठी स्थानिक डबेवाल्यांकडे देण्यात येतात. हे स्थानिक डबेवाले त्यांचे योग्य त्या ठिकाणी तातडीने वितरण करतात.

कर्मचाऱ्यांची जेवणे झाल्यावर रिकामे डबे गोळा करून ते पुन्हा परत पाठवण्यात येतात. डबे घरांघरांतून गोळा करणे व रिकामे डबे परत नेणे ही सर्व कामे अतिशय काटेकोर, वक्तशीरपणे व कमी मोबदला घेऊन करण्यात येतात. डब्यांचे वितरण करतांना हे डबेवाले कोणतेही प्रत्यक्ष इंधन खर्च करीत नाहीत, की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही. त्यांची भांडवली गुंतवणूक अत्यल्प आहे. आपसात वाद अजिबात नाहीत. सुमारे २५० ते ३०० रु. या दराने ते महिनाभर सेवा पुरवितात. महिन्याला साधारणतः ७००० रु. इतकी कमाई प्रत्येक डबेवाल्यास होते.

प्रणालीची अचूकता[संपादन]

डबेवाल्यांच्या या वाहतूक प्रणालीत डबा चुकीच्या ठिकाणी जाण्याची शक्यता (Error rate) १.६ कोटी डब्यांमधे १ इतकी नगण्य असते. इतक्या अचूकतेमुळे प्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिनने डबेवाल्यांच्या या प्रणालीस सिक्स सिग्मा वर्गात स्थान दिले आहे. या वर्गात मोटोरोला, जनरल इलेक्ट्रिक अशा मातब्बर कंपन्यांचा समावेश आहे.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्यानुसार डबेवाले फारतर सायकलींचा वापर करतात. त्यांचा इंधनाचा वापर शून्य टक्के, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शून्य टक्के, गुंतवणूक शून्य टक्के, वादविवाद शून्य टक्के, परिणाम शंभर टक्के आणि ग्राहकांचे समाधान शंभर टक्के, असे या डबेवाल्यांचे गणित मांडले आहे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. फ्रेन्च विकीवरील डबेवाल्यांवरचा लेख
  2. http://marathi.indiainfo.com/2008/06/21/0806211535_mumbai_dabbawala_shares_secret_success_dubai_accountants.html