मासुंदा तलाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मासुंदा तलाव किंवा तलावपाळी हा ठाणे शहरातील एक प्रमुख आणि अतिशय प्राचीन तलाव आहे.

इतिहास[संपादन]

इ.स. १५३८ मध्ये ठाणे परिसरात ६० मंदिरे व ६० तलाव होते, अशी नोंद इतिहासात सापडते. इ.स. १५०२ लुडविगो व्हर्देमा, इ.स. १६७३ फ्रायर (इंग्रज), इ.स. १६९५ गॅमेल्ली करेरी (इटालियन), निकिटिन (रशियन), अन्कव्हेटिल ड्यू पेरॉ (फ्रान्स), फोर्बेस व फ्रेयर इत्यादी परदेशी प्रवाशांनी ठाण्याच्या प्राकृतिक वर्णनात मासुंदा, देवळा, आंबे घोसाळे, हरियाला, गोशाला इत्यादी तलावांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे तलावांचे शहर ही एकेकाळी ठाण्याची ओळख होती.

मासुंदा शब्दाचा विग्रह केला तर दोन अर्थ संभवतात, मा= मास महिना व सुंदा हा ऊंदचा अपंभ्रश असेल तर त्याचा अर्थ होतो पिंड, हे दोन शब्द एकत्र केल्यास मासिक पिंडदान असा त्याचा अर्थबोध होतो. कौपीनेश्वर मंदिर आवारात मृत व्यक्तींचे दशक्रिया विधी, मासिक व वार्षिक श्राद्ध विधी केले जातात. त्यामुळे कदाचित कौपीनेश्वर तलावाला मासुंदा या अपंभ्रश नावाने ओळखले जात असावे.

इ.स. १८६३ पासूनची नगरपालिकेची कागदपत्रे पाहता १८८० साली या तलावाला महादेवाचे तलाव म्हटले आहे. १९१२ च्या नगरपालिकेच्या शहर विकास आराखड्यात कौपीनेश्वर तलाव असा उल्लेख केला आहे. या तलावाला लोक शंकराचे तळे किंवा तलावपाळी म्हणत असले तरी या तलावाचे खरे नाव मासुंदा हे प्राचीन काळापासून प्रचलित असावे.

इ.स. ८१५ ते १२६५ श्रीस्थानक (म्हणजे ठाणे) ही शिलाहार राजाची राजधानी होती. या घराण्याची साडेचारशे वर्षांंची प्रदीर्घ राजवट पाहता ठाणेनगर तेव्हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्टय़ा अतिशय संपन्न होते असे दिसून येते. शिलाहार हे शिवभक्त होते. त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली आणि त्यांचा योगक्षेम निरंतर चालावा म्हणून योग्य व्यक्तींची नेमणूक व दानाची व्यवस्था सरकारी खजिन्यातून केलेली होती. त्या संदर्भात शिलाहारांचे अनेक ताम्रपट व शिलालेख प्रसिद्ध आहेत. कौपीनेश्वर मंदिर व मासुंदा तलावाची निर्मिती त्यांच्याच काळातील आहे

शके १०६२ (इ.स. ११४०)मध्ये शिलाहारांच्या पडत्या काळात अनहिलवाड पाटणच्या प्रतापबिंबाने ठाणे काबीज केले, पण त्याने आपली राजधानी महीकावती ऊर्फ मुंबईतील माहीम येथे स्थापन केली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा महीबिंब शके १०६९ (इ.स. ११४७)मध्ये गादीवर बसला. तो अतिशय पराक्रमी होता. त्याच्या आमदानीत शके १११० (इ.स. ११८८)ला चंपावती (चेऊल-आताचे चौल)च्या भोज राजाने ठाण्यावर स्वारी केली. तो कळव्याला येत असतानाच महीबिंबाने आठ हजार सैनिकांसह त्याला गाठले. त्यात भोज राजा मारला गेला. नंतर भोज राजाचा प्रधान महीबिंबावर चालून आला. त्याचा शेषवंशी केशवराव याने वध केला, तर भोज राजाच्या पालक पुत्राला मरोळच्या हंबीररावाने यमसदनास पाठविले, त्यामुळे भोज राजाचे उरले सुरले सैन्य भयभीत होऊन पळून गेले. हा विजय महीबिंबाने ठाण्यातील ‘मासवदा’ (मासुंदा) तलावाकाठी मोठय़ा थाटामाटात साजरा केला. महीकावतीच्या बखरीत हा प्रसंग तिथी-वारासहित लिहिला आहे.

।। सवंत १२४५।। ।। मग राजा ‘मासवदा’ तळ्यावर आला।। ।। तेथे देसायाला वृत्ती दिधल्या।। ।। तेधवा शेषवंशी केशवराव नावाजिला।। ।। पदक गळ्याचे दिधले आणि पद चोधरी पावला।।.. (चौधरी पदास)

(संवत वर्ष इ.स. पेक्षा ५७ वर्षे जास्त असल्यामुळे ही घटना इ.स. ११८८ सालात घडली आहे. म्हणजेच हा तलाव शिलाहार काळातच बांधला असून, त्याचे नाव ‘मासवदा’ आहे. त्याभोवती असलेल्या राजप्रसाद व मंदिरांमुळे येथे सांस्कृतिक व्यासपीठ तयार झाले. जे आजही ठाणेकरांनी जीवापाड जपले आहे. शिवाय स्थानकीय पत्तन म्हणजे ठाणे बंदरात देशोदेशीच्या मालाची चढ-उतार होत असे. त्यामुळे निरनिराळ्या प्रांताचे व्यापारी दरमहा राजवाड्यानजीकच्या तलावासमोर राजासमक्ष सौदेबाजी करून नफ्यातील राजाचा हिस्सा किंवा कर तिथल्या तिथे अदा करीत असावेत, त्यामुळे दरमहा भरणाऱ्या या बाजारासमोरील तलावाला ‘मासवदा’ (‘मासिक-सौदा’चे ठिकाण) नाव रूढ झाले व कालांतराने त्याचाच अपंभ्रश मासुंदा झाले असावे, अशी एक कल्पना आहे.

ठाणेकरांचे आवडते स्थळ[संपादन]

मासुंदा तलावाला बहुतांशी ठाणेकर तलावपाळी म्हणुन संबोधतात.सध्याचे तलावपाळी हे एक वर्दळिचे व संध्याकाळचा फेरफटका मारण्याचे आवडते ठिकाण आहे.तसेच सभोवती असलेल्या विविध खाद्य-पदार्थ विक्रेत्यां मुळे ठाण्यातील खवय्यांचा सुद्धा हे आवडते ठिकाण आहे.

बाहेरून आलेले पर्यटक तलावपाळिला आवर्जुन भेंट देतात.कारण लागुनच गडकरी रंगायतन,१५८२ सालचे सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च व कोपिनेश्वर मंदिर या प्रेक्षणिय गोष्टी आहेत.

तलावाच्या मध्यभागी असलेले कृत्रीम बेट व तेथील विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी नयनरम्य दिसते.

येथिल नौकावहनसुविधेचा आनंद घेण्यासाठी ठाणेकर खास वेळ काढुन येतात.

हे ठिकाण चारहि बाजुने ठाण्यातील मुख्य ठिकाणांशी जोडलेले आहे.जवळच रेल्वे स्थानक आहे.ठाण्यातील मुख्य बाजारपेठा,गोखले रोड,जांभळी नाका या तलावा नजिक आहेत.त्यामुळे खरेदी केल्यावर शीण घालवण्यासाठी वो खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोक इथे येतात.


हेसुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]