माल्बोर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माल्बोर्क पोलंडच्या उत्तर भागातील एक शहर आहे. या शहराची स्थापना इ.स.च्या तेराव्या शतकात झाली होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास जर्मनीने पोलंड काबीज केल्यानंतरच्या काळात या शहरात फॉका-वुल्फ विमानांचा कारखाना होता. दोस्त राष्ट्रांनी युद्धादरम्यान दोनवेळा या शहरावर बॉम्बफेक केली होती. युद्धाच्या अखेरीस जर्मनीने माल्बोर्कला बालेकिल्ल्याचे शहर घोषित केले आणि तेथील सगळ्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरित केले. ४,००० नागरिकांनी तरीही येथेच राहणे पसंत केले. १९४५ च्या सुरुवातीस येथील नाझी शिबंदी आणि सोवियेत लष्करामध्ये घनघोर युद्ध झाले व त्यात शहर बेचिराख झाले. सोवियेत संघाने शहर जिंकल्यावर उरलेले नागरिक नाहीसे झाले. त्यांतील १,८४० लोकांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. १९९६ मध्ये येथे १७८ मनुष्यावशेष सापडले होते तर २००५ मध्ये अधिक १२३ लोकांचे अवशेष मिळाले. ऑक्टोबर २००८मध्ये येथे २,११९ लोकांचे अवशेष सापडले. त्यांतील बव्हंश स्त्रीया होत्या.

युद्धानंतर सोवियेत संघातून हाकलून दिलेल्या पोलिश लोकांनी येथे वस्ती केली. २००६ च्या अंदाजानुसार येथे ३८,४७८ व्यक्ती राहत होत्या.