Jump to content

माधव केशव काटदरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


माधव केशव काटदरे (जन्म : ३ डिसेंबर १८९२; मृत्यू ३ सप्टेंबर १९५८) ऊर्फ कवी माधव हे एक मराठी निसर्गकवी होते. ते मूळचे कोकणातील असले तरी त्यांचे बरेचसे आयुष्य आबकारी खात्यातील नोकरीमुळे मुंबईत गेले.

माधव काटदरे यांनी निसर्गकवितांशिवाय काही ऐतिहासिक कविताही लिहिल्या. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी असे त्यांच्या कवितांचे विषय होते. याशिवाय काटदऱ्यांनी शिशुगीते व काही विनोदी कविताही लिहिल्या. [१].

'हिरवे तळकोकण' ही काटदऱ्यांची प्रसिद्ध कविता. हिच्यामुळेच ते जनमानसांत ओळखले जातात.

काटदऱ्यांनी गोविंदाग्रज, ना वा. टिळक, बालकवी, कवी विनायक आदी मराठी कवींवर कविता लिहिल्या आहेत.

‘पानपतचा सूड’, ‘तारापूरचा रणसंग्राम’, ‘जिवबादादा बक्षी’ या त्यांच्या काही ऐतिहासिक कविता.

काटदऱ्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या काही कवितांचीही अतिशय प्रासादिक भाषांतरेही केली आहेत.

ज्या कवितेमुळे माधव काटदरे यांना अमाप प्रसिद्धी मिळाली ती 'हिरवे तळकोकण' ही कविता :

सहय़ाद्रीच्या तळी शोभिते हिरवे तळकोंकण,,
राष्ट्रदेविचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन !

निसर्गाचे चित्रण

[संपादन]

प्रत्यक्ष निरीक्षणामुले त्यांना वनस्पतींच्या अनेक जातींची माहिती होती. उदाहारणार्थ, त्यांच्या कवितांत करवंद, तोरणे अशा अनेक वनस्पती जातींचा उल्लेख आहे. यात सर्वात उल्लेखनीय व रसभरित अशी हिरवे तळकोंकण ही कविता वेबवर उपलब्ध आन्ही, म्हणून मुद्दाम इथे देत आहे.

हिरवे तळकोकण...

.......................................

सह्याद्रीच्या तळीं शोभते हिरवे तळकोकण!

राष्ट्रदेविचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन! ।।१।।

झुळझुळवाणे मंजुळ गाणे गात वाहती झरे

शिलोच्चयांतुनी झुरुझुरू जेथे गंगाजळ पाझरे ।।२।।

खेळत खिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे

दरिखोऱयांतुनी माणिकमोती फुलुनी झांकले खडे ।।३।।

नीलनभी घननील बघुनी करी सुमनीं स्वागत कुडा

गोमेदांच्या नटे फुलांनी बरसातिंत तेरडा! ।।४।।

क़डेपठारी खेळ मारुतासह खेळे हिरवळ

उधळित सोने हसे नाचरे बालिश सोनावळ ।।५।।

शारदसमयी कमलवनाच्या तरत्या शय्येवरी

मदालसा स्वच्छंद लोळती जलदेवी सुंदरी! ।।६।।

कविकाव्यांतुनी तशी जींतुनी स्रवते माध्वी झरी

आमोदा उधळीत फुले ती बकुळीची मंजरी ।।७।।

हिरव्या पिवळ्या मृदुल दलांच्या रम्य गालिच्यावरी

स्वप्नीं गुंगत गोकर्णीची फुले निळी पांढरी ।।८।।

वृक्षांच्या राईत रंगती शकुंत मधुगायनी

तरंगिणीच्या तटी डोलती नाग केतकी वनी ।।९।

फूलपाखरांवरुनी विहरती पु्ष्पवनांतिल परी

प्रसन्नता पसरीत वाजवुनी जादूची पावरी ।।१०।।

शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी

रागाने दे बाइलवेडा कवडा भिरकावुनी ।।११।।

रोपे त्यांची बनुनी पसरली नाचत चोहीकडे

अजुनी पाहा या! मंडित त्यांनी कोकणचे हे सडे! ।।१२।।

इतिहासाला वार्ता ज्याची श्रुत नाही जाहली

दंतकथांसही विस्मृती ज्याची होउनिया राहिली ।।१३।।

'झिम्मा खेळे कोकणचा तो नृपाळ' म्हणती मुली

'गळे वसंती टपटप जेव्हा आंब्याची डाहळी! ।।१४।।

कुठे आढळे फळभाराने लवणारी आवळी

कुठे गाळिती भुळभुळ अपुली पक्व फळे जांभळी ।।१५।।

कुठे हलवितो पिंपळपाने पिंपळ पारावर

कुठे वडाच्या पारंबीवर झोकें घे वानर! ।।१६।।

कुठे बेहड्यावरी राघूस्तव विरही मैना झुरे

प्राणविसावा परत न आला म्हणुनी चित्त बावरे! ।।१७।।

मधमाश्यांची लोंबत पोळी कुठे सात्विणावरी

रंग खेळती कुठे प्रमोदें पांगारे, शेवरी!   ।।१८।।

पोटी साखरगोटे परी धरी कंटक बाहेरुनी

झुले कुठे तो फणस पुरातन रहिवासीं कोकणी! ।।१९।।

कोठें चिचेवर शठ आंबा करी शीतळ साउली

म्हणुनी कोपुनी नदीकिनारी रातंबी राहिली! ।।२०।।

निर्झरतीरी रानजाइच्या फुलत्या कुंजातुनी

उठे मोहमय संगीताचा अस्फुट कोठे ध्वनी! ।।२१।।

कुठे थाट घनदाट कळकिचा, त्यांत संचरे कुणी

पुंगी बजावित फंदी मुशाफर दर्य़ापुर सोडुनी! ।।२२।।

कुठे सुरंगीमुकुलकुलाच्या सस्मित वदनांतुनी

दरवळलेला परिमळ सेवित फिरती अप्सरा वनी! ।।२३।।

कोरांटीची, नादवटीची, नेवाळीची फुले

फुलुनी कुठे फुलबाग तयांनी अवगे शृंगारिले! ।।२४।।

नीललोचना कोकणगौरी घालुनी चैत्रांगणी

हिंदोळ्यावरी बसविती जेव्हा अंबा शुभदायिनी ।।२५।।

हळदी कुंकू तदा वाटता नसो प्रसादा उणे,

पिकली म्हणून रानोरानी करवंदे तोरणे ||२६\\

औदुंबर तरू अवधूताचा छाया दे शीतळ.

शिवयोग्याचा बेल वाढवी भावभक्तीचे बळ||२७||

बघुनी पांढरी भूतपाळ वेताळ काढितो पळ,

आईन किंदळ करिती मांत्रिकमंत्रबळा दुर्बळ ||२८ ||

गडा गडावर निवास जेथे माय भवानी करी,,

राहे उधळीत फुले तिथे खुरचाफा चरणावरी||२९||

पान फुलांच्या वाहूनी माळा अंजनीच्या नंदना,

तिजवर वरुनी वैधव्याच्या रुइ चुकवे यातना ||३०||

चिव चिव शब्दा करित निंबावर खार भराभर पळे,

भेंडी उंडीणी वरती बसूनि करकरती कावळे||३१||

लज्जालज्जित नवयुववतीच्या कोमल गालांसम,

रंगुनी काजू भरले त्यांनी गिरी डोंगर दुर्गम! |३२|

तिथे मंडलाकार मनोहर नर्तन आरंभुनी,

रुसल्या सखीची घुमत पारवा करतो समजावणी || ३३ ||

हसे उपवनी अर्धोन्मीलित सुवर्ण चंपककळी, पाहुनि

तुळशिंवरी चिमुकली हलती निज सावली ||३४||

केसर पिवळे धवल पाकळ्या परिमल अंबर भरी,

घालित रुंजी भ्रमति भृंग त्या नागचंपकावरी || ३५||

सौगंधित उछवास सोडती प्राजक्ताच्या कळ्या,

लाजत लाजत हळूच उघडता निज नाजूक पाकळ्या || ३६ ||

त्या उछवासा पिउनि बिजेचा चांद हर्ष निर्भरी  

होऊनिया बेभान नाचतो निळावंतीच्या घरी || ३७||

धुंद सिंधूला मारवेलीची मर्यादा घालून,

उभी सैकती कोकण देवी राखित तळ कोकण || ३८ ||

निकट माजली निवडुंगाची बेटे कंटकमय,

आश्रय त्यांचा करूनी नांदती कोचींदे  निर्भय  ||३९ ||

मागे त्यांच्या डूले नारळी पोफळीचे आगर,

पुढे विराजे निळवंतीचे निळेच जलमंदिर ||४०|

राष्ट्र देवीचे निसर्गनिर्मित ऐसे नंदनवन,

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण ||४१||

माधव केशव काटदरे यांचे कवितासंग्रह

[संपादन]
  • गीतमाधव (१९४२)
  • ध्रुवावरील फुले (१९१५)
  • फेकलेली फुले (१९२१)
  • माधवांची कविता (१९३५)