दुसरा जयसिंह
महाराजा दुसरा जयसिंह ऊर्फ सवाई जयसिंह (नोव्हेंबर ३, इ.स. १६८८ - सप्टेंबर २१, इ.स. १७४३) हा राजपुतान्यातील आंबेर (उत्तरकाळातील जयपूर) राज्याचा राजा होता. तो कछवाहा या राजपूत कुळात जन्मला होता. त्याचा पिता महाराजा बिशनसिंह याच्या मॄत्यूनंतर इ.स. १६९९ साली वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी तो आंबेराच्या गादीवर बसला. मुघल सम्राट औरंगजेबाने त्याला सवाई हा किताब दिला. दुसऱ्या जयसिंहापासून वापरात आलेली ही उपाधी कछवाहांच्या वंशजांसाठी आजतागायत वापरली जाते.
इ.स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान महाराजा जयसिंह ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये वेधशाळा बांधल्या त्या जंतर मंतर या नावाने ओळखल्या जातात. ह्यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित व भाकित करणे हा होता.