मराठी आरत्या
"आरती" म्हणजे प्रार्थना. आरत्या ह्या देवाकडे साकडे किंवा स्तुति मागण्यासाठी म्हणल्या जातात. आरत्यांचे फार मोठे महत्त्व हिंदू धर्मात सांगितले आहे.
खाली दिलेल्या काही मराठी आरत्या:
[संपादन]सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कॄपा जयाची || सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची | कंठी झळके माळमुक्ता फळांची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मनःकामनापूर्ती || धृ ||
रत्नखचीत फरा तुज गौरी कुमरा| चंदनाची उटि कुंकुमकेशरा|| हिरेजडित मुगुट शोभतो बरा | रुणझुणती नुपूरे चरणीं घागरीया || २ ||
लंबोदर पितांबर फणिवरबंधना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना || दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना || ३ ||
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा | विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा || लावण्यसुंदर मस्तकीं बाळा | तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा || १ ||
जयदेव जयदेव जय श्री शंकरा | आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा || धृ ||
कर्पुगौर भोळा नयनीं विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा || विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा | ऐसा शंकर शोभे उअमवेल्हाळा || २ ||
देवीं दैत्यीं सागर मंथन पैं केले | त्यामाजी अवचित हलहल जे उठिले || तें त्वां असुरपणें प्राशन केलें | नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें || ३ ||
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी || शतकोटींचे बीज वाचे उच्चारी | रघुकुळटिळक रामदासाअंतरी || ४ ||
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी | अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी | वारी वारी जन्ममरणातें वारी | हारी पडलों आता संकट नीवारीं || १ ||
जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी | सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी || धृ ||
त्रिभुवनभुवनी पाहतां तुजऐसी नाही | चारी श्रमले परंतु न बोलावे काही | साही विवाद करितां पडले प्रवाहीं | ते तूं भक्तांलागी पावसी लवलाहीं || २ ||
प्रसन्नवदने प्रसन्न होती निजदासां | क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा | अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा | नरहरि तल्लिन झाला पदपंकज-लेशा || ३ ||
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ ध्रु० ॥
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं । कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं ॥ देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढें उभे रहाती ॥ जय० ॥ २ ॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळें वनमाळा गळां ॥ राई-रखुमाबाई राणीया सकळां । ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय० ॥ ३ ॥
ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती । चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती ॥ दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥ जय० ॥ ४ ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥ दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती । केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ॥ जय० ॥ ५ ॥