मराठवाडा (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठवाडा हे मराठी भाषेतून प्रकाशित होणारे मराठवाड्यातील दैनिक वृत्तपत्र होते. १ फेब्रुवारी, इ.स. १९३८ या दिवशी त्याचा पहिला अंक साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित करण्यात आला होता. नंतर त्याचे दैनिकात रूपांतर झाले. सप्टेंबर २००० सालापासून या वृत्तपत्राचे प्रकाशन बंद आहे.

सुरुवात[संपादन]

सध्या महाराष्ट्रात असलेला मराठवाडा हा भाग पूर्वी हैदराबाद संस्थानात होता. हैदराबादचा निजाम आणि ब्रिटिश सत्ता यांच्या कचाट्यात सापडलेल्या जनतेला संघटित करून त्यांच्या बाजूने लढा देण्यासाठी आनंदराव वाघमारे यांनी १ फेब्रुवारी, इ.स. १९३८ रोजी पुण्याहून मराठवाडा साप्ताहिकाची सुरुवात केली. तिथून ती गुप्तपणे मराठवाड्यात पाठविली जात.

ध्येय[संपादन]

हैैदराबाद संस्थानातील एकतंत्री सरकारला जबाबदारीची जाणीव करून देणे, दैववादी, दरिद्री, असंघटित जनतेला सक्रिय करणे आणि जनतेमधील संवेदनशीलता जागृत करणे, मातृभाषेतून शिक्षण, मराठी भाषेची सुरक्षितता या तत्त्वांचा पुरस्कार करणे हे मराठवाडा वृत्तपत्राचे ध्येय होते.

बंदी[संपादन]

पुण्यातून निघालेला अंक लोकांपर्यंत पोहोचू न देण्याचा निजाम सरकार हरप्रकारे प्रयत्न करीत होते. परंतु आनंदराव वाघमारेंच्या मेहनतीपुढे निजाम सरकार थकले व ब्रिटिश सरकारच्या मदतीने पत्रावर बंदी आणली. आनंद वाघमारेंनी हार न मानता नाव बदलून वृत्तपत्र चालूच ठेवले. दहा महिन्यांच्या कालावधीत मराठवाडा नागरिक, संग्राम, रणदुंदुभी, समरभूमी, हैद्राबाद स्वराज्य, मोगलाई, कायदेभंग, सत्याग्रह, कायाकल्प, संजीवनी अशी अकरा वेळा नावे बदलत प्रकाशित होत राहिले आणि प्रत्येकवेळेस सरकार त्यावर बंदी घालत राहिले. शेवटी इ.स. १९३९ साली वाघमारे यांच्यावरच राजद्रोहाचा खटला भरला गेला. एकवीस महिन्यांसाठी त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले व पत्राचे प्रकाशनच बंद झाले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर[संपादन]

इ.स. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर १३ मार्च, इ.स. १९४८ यादिवशी मुंबईहून मराठवाडा अंक पुन्हा प्रकाशित झाला व हैदराबाद संस्थानात गुप्त रीतीने पाठवला गेला. १७ सप्टेंबर, इ.स. १९४८ला निजामाने शरणागती पत्करली व मराठवाडाचे स्थलांतर हैदराबाद येथे झाले.

इ.स. १९४९ सालापासून मराठवाडा अर्धसाप्ताहिक म्हणून प्रकाशित होऊ लागले. इ.स. १९५३ साली आनंद वाघमारे निवृत्त झाले व अनंत भालेराव पत्राचे संपादक झाले. मराठवाडा विभागाचा द्विभाषिक मुंबई राज्यात समावेश केल्यानंतर मराठवाडा पत्राचे स्थलांतर औरंगाबादला झाले. मराठवाड्यातील वाढत्या लोकप्रियतेमुळे १५ आॅगस्ट, इ.स. १९६८ रोजी मराठवाड्याचे दैनिकात रूपांतर झाले.