मटारू
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
डुकरकंद, मटारू, मटाळू किंवा करांदा ( शास्त्रीय नाव:Dioscorea bulbifera ) ही आशिया तसेच आफ्रिका खंडात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी/भाजी आहे. वेलीवर येणाऱ्या वरच्या कंदासोबत या वेलीचा जमिनीत पण मोठा कंद असतो ज्याला सर्व बाजूंनी बारीक मुळे असतात. हे दोन्ही कंद सोलून उकडून खाल्ले जातात. तसेच त्याची बटाट्यासारखी रस्सा भाजी किंवा सुकी भाजी पण बनवतात. डुकरकंद उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय जंगलामध्ये एक हजार मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये उगवते. संस्कृतमध्ये याला वराह कंद किंवा वराहि असेही म्हणतात. याची लागवड मुख्यकरून प्रकलिका(bulbils) किंवा घनकंदाद्वारे(corm) केली जाते.
या वेलीचे उगमस्थान दक्षिण आशिया असल्याचे मानले जाते. ही Dioscoriaceae कुटुंबातील एक वनस्पती आहे. हिचे जीवशास्त्रीय नाव डायोस्कोरिया बल्बिफेरा आहे. हिला संस्कृतमध्ये वराही कंद, हिंदीत गांठी, गेठी किंवा गिंथी तर इंग्रजीत एर पोटॅटो असे म्हणतात.
भारतात मटारूच्या २६ प्रजाती आढळतात. ज्यामध्ये 'डा बेल्फिला (तरुड कंद)' हा प्रकार देखील पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळतो. भारतातील आयुर्वेद ग्रंथ चरक संहिता आणि सुश्रुतसंहिता मध्ये, मटारूला अठरा दैवी वनस्पतींमध्ये स्थान दिले गेले आहे. हिचा वापर च्यवनप्राशच्या निर्मितीमध्ये देखील केला जातो. नायजेरिया हा बीटरूटचा सर्वात मोठा उत्पादक देश मानला जातो. नायजेरिया व्यतिरिक्त घाना ब्राझील, क्युबा, जपान हे त्याचे प्रमुख उत्पादक देश आहेत. भारतातील काही राज्ये, ओरिसा, केरळ, तामिळनाडू येथे त्याची लागवड केली जाते. उत्तराखंडमध्ये २००० मीटर उंचीच्या भागात अनेक वेली आढळतात. हिच्या कंदाचा तसेच पानांचा वापर प्रामुख्याने भाजी म्हणून केला जातो. कंदाची चव बटाट्याच्या तुलनेत थोडी तुरट व किंचित कडू असते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, हिचे कंद गोळा करतात आणि साठवतात आणि नंतर ते उकडून सोलून खाल्ले जातात किंवा उकडलेल्या बटाट्याच्या भाजीप्रमाणे खाल्ली जातात. हे कंद वात आणि कफ नाशक व गरम असून, जास्त खाल्ल्यास पित्तवर्धक असतात. थंडीच्या वातावरणात त्याचा वापर खूप फायदेशीर आहे. कडू प्रजातीचे कंद गरम राखेत शिजवून खातात. खोकल्यासाठी हे उत्तम औषध मानले जाते.[१]
- इंग्रजी: aerial yam, air potato, air yam, bitter yam,
- बांगला: বনআলু (बन आलू)
- हिंदी: गैण्ठी, वाराहवदना, गृष्टिक, वराही, वराहीकन्द, कदू कन्दा, रतालू (D. purpurea)
- उर्दू-जमीनेकन्द
- कन्नड: ಅಮ್ಬಲಿ ಗೆಣಸು (अंबाली गेनासू), ಹಮ್ದಿಗೆಣಸು (हमदी गेनासू), ಹೆಗ್ಗೆನಸು, ಕುಮ್ಟಗೆಣಸು (कुंता गेनासू)
- कोंकणी: करंदो, करांदा,
- मल्याळम: കാച്ചില് (कच्चील), പന്നികിഴങ്ങ (पन्नीकिझांगु)
- मराठी : डुकरकंद, कडूकरंदा, वराही कंद
- नेपाळी: गीट्ठा, गीट्ठे तरुल, वन तरुल
- ओडिया: पिटा आलू
- संस्कृत: आलुकः, वराहीकन्द
- तमिळ: காட்டுச்சீரகவள்ளி (कट्टू सिर्का वल्ली), காட்டுக்காய்வள்ளி (कट्टू क कायवल्ली), कट्टूवकीलंगू
- तेलुगू: అడవి దుంప (अदवी दुंपा), चेद्दूपोड्डू दुंपा
या वेलाची फुलेही फांदीच्या काखेत किंवा बगलेत गुच्छाच्या स्वरूपात उगवतात व त्यांचा रंग पांढरट असून आकाराने ती लहान असतात. फळे लहान गोलाकार असून यांची बीजे पंखयुक्त असतात.
उपयोग
[संपादन]आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा लैंगिक वासना उद्दीपित करणारे औषध म्हणून मुख्य उपयोग केला जातो. तसेच खवखवणारा घसा, मुळव्याध, नेत्रश्लेष्मलाशोथ, अतिसार आणि आमांश, यावरही त्याचा उपयोग केला जातो. शरीरावर आलेल्या गाठींवर देखील ते प्रभावी ठरते. त्याच बरोबर हे एक उत्तम रसायन असून, स्वरवर्धक, वृष्य, बलकारक, वर्ण्य, शुक्रवर्धक, हृद्य, दीपन, पित्तवर्धक, आयुवर्धक, मधुमेह, कुष्ठ, कृमि, विष, वातज गुल्म तथा मूत्रकृच्छ्र इत्यादी आजारात लाभप्रद आहे.
अति प्रमाणात खाल्ल्यास हे पित्तवर्धक असून यकृतात देखील बिघाड निर्माण करू शकते.
पाककृती
[संपादन]भाजीच्या पाककृतीसाठी कृपया येथे टिचकी द्यावी.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "गेठी उत्तराखंड का एक दिव्य औषधीय कंद मूल जो जानकारी के अभाव में विलुप्तप्राय हो रहा". devbhoomidarshan.in. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ दिनेश वाळके. "डुकर कंद". flickr.com. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.