भीष्मराज बाम
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
भीष्मराज बाम (जन्म : हैदराबाद, इ.स. १९३८; - नाशिक, १२ मे, इ.स. २०१७) हे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक व एक क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ होते.
बाम यांनी उस्मानिया विद्यापीठातून ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स या विषयाची प्रथम श्रेणीत बीएची पदवी मिळवली होती. ते १९६३ साली डेप्युटी सुपरिंटेन्डन्ट ऑफ पोलीस या पदावर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात दाखल झाले व १८ वर्ष त्यांनी पोलीस दलात काम केले त्यानंतर त्यांची गृहमंत्रालयात डेप्युटेशनवर बदली झाली. शेवटी शेवटी ते नॅशनल रायफल असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. नाशिकच्या महात्मानगर सभागृहात दर शुक्रवारी बाम हे योग या विषयावर नागरिकांसह खेळाडूंना मार्गदर्शन करीत असत. सभागृहात मार्गदर्शन करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्र पोलीस दलातर्फे प्रकाशित होणाऱ्या दक्षता मासिकाचे ते दोन वर्ष संपादक होते.
क्रीडा मानसोपचार म्हणून कारकिर्दीची सुरुवात
[संपादन]पोलीस महासंचालकपदाहून निवृत्त झाल्यानंतर भीष्मराज बाम यांना एक दुखापत झाली. या दुखापतीमुळे बाम यांना सहा महिन्यांपेक्षा अधिक दिवस विश्रांती घ्यावी लागली. यादरम्यान काही रशियन पुस्तके त्यांच्या वाचण्यात आली. त्यात एका पुस्तकातील ‘आपले मन हाच आपला शत्रू’ हे वाक्य त्यांना अधिक भावले. स्वतः: एक उत्कृष्ट नेमबाज असलेल्या बाम यांनी त्यानंतर योग आणि मन यांचा क्रीडा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास सुरुवात केली. क्रीडा मानसोपचाराचा रीतसर अभ्यासक्रमही पूर्ण केला. काही खेळाडूंच्या कामगिरीत त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार फरक पडत गेल्यावर दिग्गज खेळाडू त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यास येऊ लागले. २००१ पर्यंत माजी क्रिकेट कसोटीपटू राहुल द्रविड हा अत्यंत संथपणे खेळत असे. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करूनही ते जमत नव्हते. अशा वेळी बाम यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे द्रविडच्या कामगिरीत आमूलाग्र बदल झाला. बाम यांच्या मार्गदर्शनामुळे २००० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अंजली भागवतला सुवर्णपदके मिळाली. नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिलाही बाम यांच्या मार्गदर्शनाचा आधार मिळत असे.
सचिन तेंडुलकर, जसपाल राणा, सुमा शिरूर, पी.गोपीचंद, मोनिका आथरे हे भीष्मसरांचा लाभ घेणारे अन्य खेळाडू होत.
बाम यांचे संस्थाकीय कार्य
[संपादन]१९९८ मध्ये नाशिकमध्ये नेमबाजीची क्रीडा प्रबोधिनी स्थापन केली आणि तिच्याद्वारे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेमबाज घडविले.
नेमबाजीला प्रोत्साहन देण्यासाठी बाम यांनी एक्स एल टारगेट शूटर्स असोसिएशनची स्थापना केली.
बाम हे पुरुषोत्तम अकॅडमीचे संस्थापक, पुण्याच्या चाणक्य मंडलाचे विश्वस्त व मार्गदर्शक होते. योग विद्याधामच्या योग गुरुकुल विभागात अध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
राजकारणापलीकडचे भीष्मराज
[संपादन]रिओ ऑलिम्पिकपूर्वी बंगलोर येथे आयोजित केलेल्या शिबिरात खेळाडूंना मानसिकदृष्ट्या कणखर कसे राहावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बाम यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे आमंत्रित करण्यात आले होते. महिनाभरासाठी बाम यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातील विचित्र राजकारण सहन न झाल्याने ते अवघ्या दोन आठवड्यांत परत आले.
भीष्मराज बाम यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- मना सज्जना (आध्यात्मिक)
- मनोपासना
- विजयाचे मानसशास्त्र (अनुवादित, मूळ इंग्रजी - Winning Habit) : ह्या पुस्तकाचे मराठीखेरीज हिंदी, तामिळ व पंजाबी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
- संधीचं सोनं करणारी इच्छाशक्ती
- यशाचा मार्ग
पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार (२०११-१२)
- पोलीस महासंचालकपदी असताना मानाचे राष्ट्रपती पदक
- भारतीय पोलीस पदक
- भारतीय क्रीडा मानसोपचार संघटनेतर्फे जीवनगौरव पुरस्कर