Jump to content

बुगुन लिओचिकला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुगुन लिओचिकला

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: पॅसरीफॉर्मेस
कुळ: लिओथ्रिचिडे
जातकुळी: लिओचिकला
जीव: एल. बुगुनोरम
शास्त्रीय नाव
लिओचिकला बुगुनोरम
अत्रेय २००६

लिओचिकला बुगुनोरम

बुगुन लिओचिकला (इंग्रजी: Bugun Liocichla; शास्त्रीय नाव: Liocichla bugunorum; लिओचिकला बुगुनोरम) हा सातभाई पक्ष्याच्या कुळातील एक छोटा पक्षी आहे. त्याला सर्वात पहिल्यांदा १९९५ मध्ये ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये पाहण्यात आले होते आणि २००६ मध्ये नवीन त्याला पक्ष्यांची नवीन प्रजात घोषित करण्यात आले.[२] या पक्ष्यांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांचा नमुना घेण्यात आला नाही. या पक्ष्यांची स्थिती अतिशय चिंताजनक असून २००६ मध्ये या प्रजातीचे फक्त १४ पक्षी अस्तित्वात होते. त्याचबरोबर त्यांच्या अधिवासाच्या भागामध्ये होणाऱ्या विकासकामांमुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे.[३]

वर्णन[संपादन]

बुगुन लिओचिकला एक लहान (२२ सेंमी) सातभाई कुळातील पक्षी आहे. त्याचा पिसारा पिवळट-हिरवट-राखाडी रंगाचा आहे आणि डोक्याचा वरचा भाग काळा आहे. त्याच्या चेहऱ्यावर नारंगी-पिवळ्या रेषा आणि पंखांवर पिवळे, लाल, पांढरे पट्टे आहेत. शेपूट काळी असून तिचं टोक लाल रंगाचे आहे. त्याचे पाय गुलाबी रंगाचे आहेत तर चोच तोंडापाशी काळ्या रंगाची असून टोकाकडे पांढऱ्या रंगाची होते.

वितरण आणि अधिवास[संपादन]

हा पक्षी अतिशय दुर्मीळ आहे. हा पक्षी फक्त भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातल्या ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये लामा आणि बोम्डीला या भागात समुद्रसपाटीपासून २००० मीटर उंचीवर सापडतो. तो प्रामुख्याने सदाहरित जंगलाचे किनारे, बांबूच्या रांजी, डोंगरउतारावरील झाडोरा अशा ठिकाणी वास्तव्य करतो. २००६ च्या जानेवारीमध्ये त्यांचा एक थवा दिसला होता आणि मे २००६ मध्ये एक नर-मादेची जोडी दिसली होती, तर त्यांची एकूण संख्या १४ वर्तवण्यात आली होती. या पक्ष्याच्या शोधानंतर त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले. आता त्यांची संख्या ५०-२५० च्या आसपास असावी, असे पक्षीशास्त्रज्ञांचे अनुमान आहे.[४]

बुगुन लिओचिकला ईगलनेस्ट अभयारण्याबरोबरच अरुणाचल प्रदेशातील इतर भागात आणि शेजारील भूतानमध्ये सापडण्याची शक्यता आहे.

शोध[संपादन]

खगोलशास्त्रज्ञ रमणा अत्रेय यांना २००५ मध्ये भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये हा पक्षी आढळल्यावर त्यांनी याचे शास्त्रीयदृष्ट्या वर्णन केले. हा पक्षी पहिल्यांदा १९९५ साली दिसला होता. रमणा अत्रेय यांना २००५ मध्ये पुन्हा दिसेपर्यंत मधली दहा वर्ष तो पुन्हा दिसला नव्हता. हा नवीन प्रजातीचा पक्षी आहे याची खात्री करण्यासाठी त्यांनी या प्रजातीच्या दोन पक्ष्यांना पकडून त्यांचा अभ्यास केला आणि २००६ साली नवीन पक्ष्याची प्रजात सापडल्याचे घोषित केले. पक्षीशास्त्रात नवीन पक्षी शोधण्याची घटना अतिशय दुर्मीळ आहे, कारण प्राणीशास्त्रात आतापर्यंत पक्ष्यांचा अभ्यास सर्वात जास्त झाला आहे असे समजले जाते.[४]

या पक्ष्याला त्याचे नाव तिथे राहणाऱ्या बुगुन जमातीच्या नावावरून देण्यात आले आहे.

धोका आणि संवर्धन[संपादन]

या पक्ष्याचा रंग आणि आवाज इतका विशिष्ट आहे, की तो अभ्यासकांच्या नजरेतून सुटणे कठीण आहे. त्यामुळे याचे अस्तित्व लपून राहू शकत नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की, हा पक्षी निसर्गत: दुर्मीळ आहे. त्यामुळेच त्यांच्या वास्तव्याच्या भागात होणारी विकासकामे, विशेषतः त्यांच्या मुख्य अधिवास क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गाच्या प्रस्तावामुळे त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

अलीकडे रमणा अत्रेय आणि काही संस्था स्थानिक बुगुन जमातीच्या सहाय्याने हा पक्षी आणि तिथले जंगल वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ बर्डलाईफ इंटरनॅशनल. "लिओचिकला बुगुनोरम". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१६-३. ३१-०३-२०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link)
  2. ^ Ramana Athreya (2006). "A new species of Liocichla (Aves: Timaliidae) from Eaglenest Wildlife Sanctuary, Arunachal Pradesh, India" (PDF). Indian Birds (इंग्रजी भाषेत). 2 (4): 82–94. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  3. ^ रमणा अत्रेय. "Eaglenest Biodiversity Project (2003 – 2006): Conservation resources for Eaglenest wildlife sanctuary" (PDF) (इंग्रजी भाषेत).
  4. ^ a b गिरीश जठार. "बुगुन लायोचीकला". ३१ मार्च २०१७ रोजी पाहिले.