बीटिंग रिट्रीट
बीटिंग रिट्रीट हा सैन्यदलाशी संबंधित एक उत्सवी कार्यक्रम आहे. भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या सांगतेला हा कार्यक्रम होतो.[१]
इतिहास
[संपादन]इसवी सनाच्या सतराव्या शतकात इंग्लंड येथे या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि नंतर तो जगातील विविध देशांनी स्वीकारला असे दिसून येते. भारतीय स्वातंत्र्यानंतर १९५० साली एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलीप यांच्या भारत भेटीच्या वेळी प्रथम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या भेटीच्या वेळी नेत्रदीपक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले. विशेष पाहुण्यांच्या सन्मानार्थ भारतीय लष्कराच्या तीनही दलांनी पाईप, ड्रम, बगलर आणि ट्रम्पेट या वाद्यांचे एकत्र सादरीकरण यावेळी केले. त्यानंतर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला भारताने एका दुसऱ्या देशाच्या प्रमुखांना आमंत्रित करणे आणि त्यांच्या आदरार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणे ही पद्धत सुरू झाली.
भारतीय प्रजासत्ताक दिन सांगता
[संपादन]भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या सांगतेनिमित बीटिंग रिट्रीट हा कार्यक्रम सादर केला जाते. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या डी विभागातर्फे २९ जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भारतीय लष्कराच्या सैन्यदल (पायदळ), हवाई दल आणि नौदलाच्या वाद्यवृंदाचे सादरीकरण या कार्यक्रमात केले जाते हे याचे वैशिष्ट्य होय. रायसीना हिल्सपासून राष्ट्रपती भवनाच्या दिशेने राजपथापर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विजय चौक, आणि नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक परिसरातील मध्यवर्ती सचिवालयाच्या परिसरातून हा वाद्यवृंद सादर होतो.[२]
स्वरूप
[संपादन]या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारताचे माननीय राष्ट्रपती हे असतात. या कार्यक्रमासाठी आपल्या अंगरक्षक समूहाच्या सोबतीने राष्ट्रपती कार्यक्रमाला उपस्थित राहतात. यावेळी वाद्यांवर विशिष्ट धून वाजविली जाते आणि अंगरक्षक दलाचे प्रमुख राष्ट्रपतींना भारताच्या राष्ट्रगीताच्या वादनाबरोबर मानवंदना देण्यासाठी सूचना देतात. यावेळी विजय चौकाच्या उजवीकडे असलेल्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज उलगडला जातो. लष्कराच्या तीन दलांच्या वाद्यवृंद समूहाकडून काही वैशिष्ट्यपूर्ण धुनी वाजविल्या जातात आणि यातील सहभागी वादक त्या तालावर विविध आकारात संचलन सादर करतात. सूर्यास्त होताना बिगुल या वाड्यावर धून वाजविली जाते. त्यावेळी सर्व ध्वज आदरपूर्वक खाली उतरविले जातात. त्यानंतर वाद्यवृंद प्रमुख माननीय राष्ट्रपती यांच्या समोर जाऊन परत जाण्याची परवानगी घेतो आणि कार्यक्रम संपल्याची सूचना त्यांना देतो. वाद्यवृंद आणि संचलन परत जाताना भारतातील सैन्यदलाची प्रसिद्ध अशी सारे जहाँ से अच्छा हे धून वाजवीत परत जातो. यानंतर राष्ट्रपतींना विशेष मानवंदना दिली जाते आणि भारताचे राष्ट्रगीत वाजविले जाते. हे संचलन रायसीना हिल्स परिसरातून पुढे जातानाच दृश्य विशेष लक्षणीय असते. त्यानंतर माननीय राष्ट्रपती अंगरक्षक दलासह राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतात.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Beating Retreat Ceremony 2021 Delhi: रायसीना हिल्स पर सेना के जवानों ने शुरू की रिहर्सल". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2021-01-24 रोजी पाहिले.
- ^ "Ceremonials | Department Of Defence". www.mod.gov.in. 2021-01-24 रोजी पाहिले.
- ^ "Republic Day: What is the Beating Retreat ceremony?". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2021-01-24. 2021-01-24 रोजी पाहिले.