Jump to content

बीजप्रक्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बीजप्रक्रिया म्हणजे बियाण्यावर त्याच्या लागवडीपूर्वी करावयाची प्रक्रिया होय. त्यात बियाण्यांची पारख करणे, त्यांतील सकस बिया निवडणे, त्यांवर लेपन इत्यादी योग्य प्रक्रिया करणे, त्यांची उगवणशक्ती तपासणे आदी बाबींचा समावेश असतो. बीजप्रक्रिया केल्यावर त्यांपासून वाढीव दर्जेदार उत्पन्न अवश्य मिळते. ही लागवडीपूर्व करावयाची एक सोपी पण परिणामकारक प्रक्रिया आहे. याने तद्नंतरच्या कीटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखे येते. बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील अपायकारक जीवाणूंसून पिकाचे संरक्षण होते.

बीजप्रक्रियेसाठीचे साहित्य : बियाणे, बुरशीजन्य औषधे: ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सल्फर (गंधक), पाणी इत्यादी.

साधने : घमेले, बादली, रद्दी पेपर, हातमोजे इत्यादी.

कृती:

बियाण्याची उगवणशक्ती तपासण्यासाठी बियाणे हे पेरणीपूर्वी किमान १५ दिवस आधी खरेदी करतात. या बियाण्याच्या साठ्यातील सुमारे १०० दाणे काढून ते, ज्या शेतात त्यांची पेरणी करावयाची आहे तेथील माती एका मातीच्या कुंडीत घेऊन पेरतात. अशा बियाण्याचे सुमारे ८ ते १० दिवसात कोंब निघतात. किती कोंब निघाले यावरून त्या विशिष्ट बियाण्याची उगवणशक्तीची टक्केवारी कळते. समजा,त्यापैकी ८३ कोंबच उगवले तर त्या बियाण्यांची उगवणशक्ती ८३% आहे असे अनुमान काढता येते.त्याप्रमाणात पेरणी करता येते.

बीजप्रक्रियेसाठी शुद्ध,निरोगी चमकदार व वजनदार बिया घमेल्यात घेतात. पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियांवर व त्यांच्या आतही रोगाचे जीवाणू असू शकतात. त्यासाठी, हातात हातमोजे घालून बियांवर ५% गुळाचे पाणी शिंपडतात व नंतर त्यांवर बुरशीनाशक औषधे, संजीवके, सल्फर (गंधक) वगीरे रसायने योग्य प्रमाणात चोळतात. नंतर बियाणे थोडा वेळ सावलीत वाळवतात.

बीजसंस्काराच्या पारंपरिक पद्धती

[संपादन]
  • बी गरम पाण्यात भिजत ठेवणे.
  • बी थंड पाण्यात भिजत ठेवणे.
  • कोरडया बियांना औषध चोळणे.
  • रोपांची मुळे द्रावणात बुडवून ठेवणे.
  • बी कठीण पृष्ठभागावर घासणे.

बीजप्रक्रियेचे थोडक्यात फायदे

[संपादन]
  • बियांची उगवणक्षमता वाढते.
  • रोपांची किंवा पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
  • रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते.

संदर्भ

[संपादन]
  1. - बीज उपचारकी घरेलू विधी- दैनिक भास्कर.कॉम (हिंदी मजकूर) Archived 2016-09-24 at the Wayback Machine.

बाह्य दुवे

[संपादन]