बाणगंगा तलाव
बाणगंगा तलाव, वाळकेश्वर
पौराणिक कथेनुसार दक्षिण मुंबईतील पौराणिक वाळकेश्वर मंदिर परिसरात असलेला हा तलाव प्रभु श्री रामाच्या काळखंडातील आहे.प्रभु श्रीराम सीतेच्या शोधात असताना ह्या ठिकाणी थांबले होते.त्यांना समुद्राच्या खारट पाण्याजवळ जवळपास गोडे पाणी उपलब्ध न झाल्याने त्यांनी जमिनीवर एक बाण मारला व त्यामधून गोड्या पाण्याचा झरा निर्माण झाला तोच बाणगंगा म्हणून ओळखला जाऊ लागला. अरबी समुद्राच्या जवळ असूनही ह्या तलावात वर्षभर गोडे पाणी उपलब्ध असते. जेथे बाण मारला असे समजले जाते तिथे एक खांब आहे.
प्रत्येक वर्षी देवदिवाळीला येथे दिपोत्सव साजरा केला जातो. देवदिवाळी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते. महाराष्ट्र राज्य टुरिझम विकास संस्था आणि गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर न्यासातर्फे येथे काशीमठ मंदिर आणि शांतादुर्गा मंदिर आणि इतर मंदिरात आरती व पूजा केली जाते.