फ्रंटियर एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रंटियर एरलाइन्स
Frontier airlines logo14.png
आय.ए.टी.ए.
F9
आय.सी.ए.ओ.
FFT
कॉलसाईन
फ्रंटियर
स्थापना १९९४
हब डेन्व्हर, मिलवॉकी विमानतळ, ओमाहा विमानतळ, कॅन्सस सिटी विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर अर्ली रिटर्न्स
उपकंपन्या फ्रंटियर एक्सप्रेस
विमान संख्या १०२ (+९६ येणे +१८ ऑप्शन)
पालक कंपनी रिपब्लिक एरलाइन्स
मुख्यालय इंडियानापोलिस, इंडियाना
प्रमुख व्यक्ती ब्रायन बेडफोर्ड
संकेतस्थळ http://www.frontierairlines.com

फ्रंटियर एरलाइन्स ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीची सगळ्यात जास्त उड्डाणे डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होतात. रिपब्लिक एरलाइन्सची उपकंपनी असलेली ही कंपनी याव्यतिरिक्त मिलवॉकी, विस्कॉन्सिन, कॅन्सस सिटी, मिसूरी आणि ओमाहा, नेब्रास्का येथूनही विमानसेवा पुरवते. फ्रंटियर एरलाइन्स रॉकी माउंटन प्रदेशात ग्रेट लेक्स एरलाइन्स या कंपनीद्वारे प्रादेशिक विमानसेवा पुरवते. हीची विमाने अमेरिका, मेक्सिको आणि कोस्टा रिका देशांतून एकूण ८३ शहरांना उड्डाणे करतात.[१]

इतिहास[संपादन]

फ्रंटियर एरलाइन्सचा पुनर्जन्म[संपादन]

फ्रंटियर एरलाइन्सचे बोईंग ७३७. आता फ्रंटियर एरलाइन्स बोईंग ७३७ प्रकारची विमाने वापरत नाही.
फ्रंटियर एरलाइन्सचे एरबस ए३१९ प्रकारचे विमान. या विमानाला स्टॅन द रॅम असे नाव दिले आहे.

डेन्व्हरमध्ये इ.स. १९५० ते इ.स. १९८६ दरम्यान फ्रंटियर एरलाइन्स याच नावाची एक विमानकंपनी कार्यरत होती. इ.स. १९९३मध्ये काँटिनेन्टल एरलाइन्सने आपले डेन्व्हरच्या स्टेपलटन विमानतळावरील हब बंद केले व तेथील उड्डाणे अगदी कमी केली. यामुळे डेन्व्हरहून अमेरिकेच्या इतर शहरांना जोडणारी विमानसेवा कमी झाली. ही पोकळी भरुन काढण्यासाठी जुन्या फ्रंटियर एरलाइन्सच्या काही अधिकाऱ्यांनी एकत्र येउन फ्रंटियर एरलाइन्स याच नावाने फेब्रुवारी ८, इ.स. १९९४ रोजी नवीन विमानकंपनी सुरू केली.[२] जुलै १९९४मध्ये डेन्व्हरमधून कंपनीचे पहिले उड्डाण झाले. सुरुवातीस फ्रंटियरकडे बोईंग ७३७ विमाने होती पण १९९९मध्ये त्यांनी एरबसशी संधान बांधले व एरबस ए३१९ विमानांची खरेदी सुरू केली. याचबरोबर काही विमाने भाडेपट्ट्यावरही घेतली. २००१मध्ये पहिले एरबस विमान कंपनीच्या ताफ्यात दाखल झाले. यानंतरच्या सगळ्या विमानांवर डिरेक्टीव्हीची सुविधा होती. २००३मध्ये फ्रंटियर एरबस ए३१८ प्रकारचे विमान व्यापारीतत्त्वावर चालवणारी पहिली कंपनी झाली.[३] एप्रिल २००५पर्यंत फ्रंटियरने आपली सर्व बोईंग विमाने निवृत्त केली व त्यांच्या जागी एरबस विमाने वापरण्यास सुरुवात केली.

वाढ आणि पुनर्रचना[संपादन]

कंपनीची वाढ होत असताना फ्रंटियरने आपल्या विभागांची पुनर्रचना करण्याचे ठरवले. एप्रिल ३, २००६ रोजी फ्रंटियर एरलाइन्स होल्डिंग्स, इं या कंपनीची डेलावेर राज्यात स्थापना करण्यात आली. डेलावेरमध्ये असलेल्या व्यावसायिक करांतील सवलतींचा लाभ घेण्यासाठी ही चाल होती. फ्रंटियर एरलाइन्सची सगळी मालमत्ता या नवीन कंपनीच्या हवाली करण्यात आली. कंपनीचे मुख्यालय मात्र डेन्व्हरमध्येच ठेवण्यात आले.[४] नोव्हेंबर २००६ मध्ये फ्रंटियरने एरट्रान एरवेझशी संधान बांधले व दोन्ही कंपन्यांच्या प्रवाशांना त्यांचे फ्रिक्वंट फ्लायर मैल[मराठी शब्द सुचवा] एकमेकांवर वापरता येण्याची सोय केली. ज्याठिकाणी फ्रंटियरची सेवा नव्हती तेथे जाणाऱ्या प्रवाशांना एरट्रानकडून तिकिटे काढण्यास उत्साहित करणे सुरू केले. एरट्राननेही फ्रंटियरसाठी ही सेवा उपलब्ध केली. ही सेवा जुलै २०१० मध्ये मिडवेस्ट एरलाइन्स फ्रंटियरमध्ये विलीन होईपर्यंत सुरू होती. जानेवारी २४, २००७ रोजी अमेरिकेच्या सरकारच्या वाहतूक खात्याने फ्रंटियरला मोठी विमानकंपनी म्हणून मान्यता दिली.[५] मार्च २००७मध्ये फ्रंटियरने होरायझन एरशी असलेले फ्रंटियर एक्सप्रेस या नावाखाली जवळची प्रवासी सेवा पुरवण्याचे कंत्राट हळूहळू कमी करणे सुरू करून तेथे रिपब्लिक एरलाइन्सला कंत्राट देणे सुरू केले. नोव्हेंबर ३०, २००७ रोजी रिपब्लिक एरलाइन्सने ही सगळी कंत्राटे हस्तगत केली. त्यानंतर पाचच महिन्यात एप्रिल २००८मध्ये रिपब्लिक एरलाइन्सने फ्रंटियर एरलाइन्सशी केलेले कंत्राट बंद केले व जून २३ पासून आपली सेवा फ्रंटियरला देणे बंद केले.[६]

मार्ग[संपादन]

फ्रंटियर एरलाइन्सच्या मार्गांची रचना हब-अँड-स्पोक[मराठी शब्द सुचवा] तत्त्वावर आधारित आहे. यात बव्हंश मार्ग डेन्व्हरसारख्या मोठ्या विमानतळाहून सुरू होतात आणि संपतात. यामुळे कोणत्याही शहरातून इतर शहरास डेन्व्हर, मिलवॉकी, इ. विमानतळापर्यंत एक आणि मग तेथून इच्छित शहरापर्यंत दुसरी अशा दोन धावांमध्ये पोचता येते. या प्रकारच्या मार्गरचनेमुळे विमानांचा सांभाळ व निगा करणे सुद्धा सोपे जाते कारण बहुतेक सगळी विमाने रोज नाही तरी दर काही दिवसांनी मोठ्या तळावर येत असतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "प्रवासमार्ग आणि वेळापत्रक." (इंग्लिश मजकूर) फ्रंटियर एरलाइन्स. मार्च ७, इ.स. २०११रोजी पाहिले.
  2. फ्रंटियर एरलाइन्स - आमचा इतिहास[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  3. एरबसच्या सगळ्यात नवीनतम आणि सगळ्यात छोट्या विमानाला प्रमाणपत्र
  4. "Frontier Airlines Fact Sheet". Frontier Airlines. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २६ जुलै २०१४ रोजी मिळविली). 2006-11-01 रोजी पाहिले. 
  5. Frontier Airlines is a Major Carrier[मृत दुवा].
  6. "Republic Airways wants $260M after Frontier cancels contract".