प्रफुल्लचंद्र राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय (मराठी लेखनभेद: प्रफुल्लचंद्र रे; बंगाली: প্রফুল্লচন্দ্র রায় ;) (ऑगस्ट २, इ.स. १८६१ - जून १६, इ.स. १९४४) हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली.

प्रफुल्लचंद्र रायांनी इ.स. १८८२ साली कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून नैसर्गिक विज्ञान हा प्रधानविषय घेऊन बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी युनायटेड किंग्डम येथे प्रयाण करून एडिन्बरा विद्यापीठात प्रवेश घेतला. इ.स. १८८६ साली त्यांनी बी.एस्सी पदवी, तर इ.स. १८८७ साली डी.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरे केले. इ.स. १८८९ साली ते भारतात परतले व कोलकात्यात प्रेसिडेन्सी कॉलेजात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी इ.स. १९१६ सालापर्यंत शिकवले. त्यानंतर ते कलकत्ता युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात पलित अध्यासनावर रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकवू लागले.

इ.स. १८९३ साली त्यांनी स्वतःचे भांडवल ओतून बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स वर्क्स हा रसायननिर्मिती उद्योग स्थापला. भारतातील रसायन व औषधनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ या कारखान्याने रोवली गेली, असे मानले जाते. इ.स. १९०२ साली या कारखान्याचे मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]