प्रतापसिंह हायस्कूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रतापसिंह हायस्कूल (जुने नाव: गव्हर्नमेंट हायस्कूल) हे साताऱ्यातील जुन्या राजवाड्यात भरणारे विद्यालय आहे. सातारा जिल्ह्यातील ही पहिली शाळा इ.स. १८७४मध्ये गव्हर्नमेंट हायस्कूल या नावाने सुरू झाली. त्यावेळी ही इंग्रजी माध्यमाची शाळा होती, आता मराठी माध्यमाची आहे. २०१७ मध्ये, येथे ५वी ते १०वीपर्यंतचे वर्ग भरतात. आणि शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या १२० इतकी होती.[१]

बाबासाहेब आंबेडकर, नरेंद्र दाभोलकर, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गजेंद्र गडकर इत्यादी मोठ्या व्यक्तींनी या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.[२]

इतिहास[संपादन]

या शाळेचा वाडा इ.स. १८२४ साली शिवाजी महाराज यांचे वारसदार प्रतापसिंह भोसले यांनी बांधला होता. त्याकाळी राजघराण्यातल्या मुलींना या वाड्यात शिक्षण दिले जायचे. इ.स. १८५१ साली हा वाडा विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश शासनाच्या ताब्यात देण्यात आला.[३] या जुन्या राजवाड्याची ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंद झाली आहे.

पूर्वी ही शाळा चौथ्या इयत्तेपर्यंत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी या शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतला, व ते चौथी पास झाले. शाळेच्या रजिस्टर क्रमांक १९१४ मध्ये 'भिवा रामजी आंबेडकर' अशी नोंद आहे.

शाळेला शंभर वर्षं पूर्ण झाली तेव्हा १९५१ साली या शाळेचे नाव प्रतापसिंह हायस्कूल असे झाले.

इ.स. २००३ सालापासून साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आंबेडकरांनी शाळेत प्रवेश घेतलेला ७ नोव्हेंबरचा दिवस 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकाने या दिनाला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन' म्हणून घोषित करावे, ही मागणी सुद्धा अनेक वर्षांपासून होत होती. नंतर इ.स. २०१७ मध्ये हा दिवस महाराष्ट्र शासनाने २०१७ या वर्षापासून ‘विद्यार्थी दिन’ म्हणून राज्यातील सर्व शाळांत व कनिष्ठ महाविद्यालयांत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.[४][५][६][७] 

अवस्था[संपादन]

जुन्या राजवाड्यात भरणारे या हायस्कूलची इमारत सध्या (२०१८ साली) जीर्ण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी ही शाळा धोकादायक असल्याचे म्हणत तिला इतर ठिकाणी हलवण्यासाठीचे पत्र दिले आहे. तरीसुद्धा हा विभाग व जिल्हा परिषद या वास्तूची देखभाल व दुरुस्ती करीत आहे.[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "अशी आहे बाबासाहेबांची साताऱ्यातील शाळा". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2017-11-07. 2018-05-10 रोजी पाहिले.
  2. ^ "प्रतापसिंह हायस्कूल मोजतेय अखेरच्या घटका.! - तरुण भारत". तरुण भारत (इंग्रजी भाषेत). 2017-05-12. 2018-05-10 रोजी पाहिले.
  3. ^ "प्रतापसिंह हायस्कूलचे भविष्य रामभरोसे!". Lokmat. 2016-08-17. 2018-05-10 रोजी पाहिले.
  4. ^ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस". www.esakal.com. 2018-05-09 रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 27 (सहाय्य)
  5. ^ "राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रीत्यर्थ ७ नोव्हेंबर 'विद्यार्थी दिवस'". Lokmat. 2017-10-28. 2018-05-09 रोजी पाहिले.
  6. ^ "बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन "विद्यार्थी दिवस' ओळखला जाणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune". www.dainikprabhat.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-06-15. 2018-05-09 रोजी पाहिले.
  7. ^ "आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस". Loksatta. 2017-10-28. 2018-05-09 रोजी पाहिले.
  8. ^ "विद्यार्थी दिनाचे नाटक." Loksatta. 2017-12-01. 2018-05-10 रोजी पाहिले.