Jump to content

पोस्टमॉर्टम्‌ (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पोस्टमॉर्टम (पुस्तक) या पानावरून पुनर्निर्देशित)
पोस्टमॉर्टम्‌ (पुस्तक)
लेखक डॉ.रवी बापट आणि सुनीति जैन
भाषा मराठी
देश भारत भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मनोविकास प्रकाशन
प्रथमावृत्ती २४ डिसेंबर, इ.स.२०११
चालू आवृत्ती
मालिका नाही
माध्यम मराठी

पोस्टमॉर्टम्‌ हे डॉ.रवी बापट आणि सुनीति जैन यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. हे पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेने छापून प्रकाशित केले आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती २४ डिसेंबर इ.स.२०११ रोजी, दुसरी २७ डिसेंबर इ.स.२०११ रोजी, तर तिसरी आवृत्ती २४ जानेवारी इ.स.२०१२ला प्रसिद्ध झाली.

डॉ. रवी बापट हे एक कुशल शल्यविशारद आणि लोकोपयोगी व लोकाभिमुख वैद्यकतज्ज्ञ म्हणूनही नावाजले गेले आहेत. ते मितभाषीही नाहीत आणि गुळमुळीत बोलणारेही नाहीत. त्यांच्या या फटकळ परखडपणाचा प्रत्यय "पोस्टमॉर्टम' वाचताना जागोजागी येतो. इथे कुठलाही आडपडदा न ठेवता सध्याच्या वैद्यकीय व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेतून निर्माण झालेल्या वाममार्गांचा पर्दाफाश केला आहे.

डॉक्‍टर रवी बापट यांना अनेक गोष्टींची खंत वाटते. वैद्यकीय व्यवसायात मुलाचा कल न बघता, त्याला लोटू पाहणारे पालक हा त्यांचा मुद्दा, त्यांनी सोदाहरण स्पष्ट केला आहेच, पण आजकाल प्रवेशासाठी ज्या खटपटी कराव्या लागतात, त्याचीही त्यांनी हजेरी घेतली आहे. एवढे पैसे खर्च करून वैद्यकीय पदवी मिळवणारी व्यक्ती ते पैसे पुढे रुग्णांकडून कसे वसूल करते, हे सोदाहरण स्पष्ट करायला डॉ. बापट विसरत नाहीत. किंबहुना डॉक्‍टरांची साटीलोटी, नको त्या आणि अनावश्‍यक चाचण्या रुग्णांच्या माथी मारणे आणि रुग्णाला पिळून काढणे, हे एका समव्यावसायिकानेच उघड केल्यामुळे डॉक्‍टर जमातीची चांगलीच गोची होईल, असे आपल्याला वाटू शकते; पण डॉ. बापट यांचे पुस्तक वाचूनही डॉक्‍टर मंडळी त्यांचे हे मार्ग बदलणार नाहीत, कारण ही मंडळी किती निर्ढावलेली आहेत, हेही या पुस्तकातूनच कळते.

या पुस्तकामधील दोन मुद्दे अत्यंत कळीचे आहेत. ते दोन मुद्दे म्हणजे रुग्णांची जीवघेणी लूट आणि औषधनिर्मिती कंपन्यांकडून डॉक्‍टरांना दाखविण्यात येणारी प्रलोभने. औषध निर्मात्या कंपन्या, त्यांची महागडी औषधे डॉक्‍टरांच्या मार्फत रुग्णांच्या गळ्यात मारण्यात कशा यशस्वी होतात, याचीही काही निवडक उदाहरणे पुस्तकात दिली आहेत.

दूरचित्रवाणीवरील आमीर खानचा ’सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम सादर होण्याच्या कित्येक महिने आधी डॉ. रवी बापटांनी त्या विषयाला तोंड फोडले होते.