Jump to content

पिंपळनेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिंपळनेर हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले गाव आहे. हे गाव वारकरी संप्रदायातील दोन प्रमुख शक्तीपीठांच्या, भगवानगड आणि गहिनीनाथ गड मध्यस्थानी वसलेले आहे. संत वामनभाऊ महाराज आणि संत भगवान बाबा यांची कर्मभूमी म्हणून या गावाला विशेष महत्त्व आहे.

धार्मिक व आध्यात्मिक वारसा

[संपादन]

श्री भाऊबाबा संयुक्त मंदिर

[संपादन]

हे मंदिर परिसरातील सर्वात मोठे आणि भव्य मंदिर मानले जाते. या मंदिराची तुलना अहमदनगर जिल्ह्यातील मोहटादेवी मंदिराशी केली जाते. दरवर्षी जानेवारी महिन्यात येथे भाऊबाबांची संयुक्त पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

लालपुरी देवस्थान (बजरंग बली मंदिर)

[संपादन]

हे गावातील अत्यंत प्राचीन स्थान आहे. पूर्वीचे गाव याच मंदिराशेजारी वसलेले होते. येथे दरवर्षी राम नवमीला अखंड हरिनाम सप्ताहाची स्थापना होते आणि हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सांगता होते. वारकरी संप्रदायातील रत्न म्हणून ओळखले जाणारे अण्णा बाबा यांचे येथे वास्तव्य होते.

श्री इंदुवासिनी देवी मंदिर

[संपादन]

गावाच्या पूर्व दिशेला जेथे सिंधफणा नदीचा उगम (सांडा) होतो, तेथे हे मंदिर आहे. महान तपस्वी स्वामी गणेशानंद महाराज यांनी येथे तपश्चर्या केली होती. सध्या महामंडलेश्वर १००८ श्री विक्रम शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्राचा विकास होत आहे. नवरात्रीमध्ये येथे मोठा हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो.

श्री मलिक साहेब मंदिर (कुलदैवत)

[संपादन]

मलिक साहेब हे गावाचे कुलदैवत असून येथे दोन दिवसांची मोठी यात्रा भरते. पहिल्या दिवशी पैठण येथून गंगेचे पवित्र पाणी आणून देवाला अभिषेक केला जातो आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा भव्य आखाडा भरतो.

श्री लक्ष्मी मंदिर (बारा गाड्यांची यात्रा)

[संपादन]

गावात लक्ष्मी देवीचे मंदिर असून येथे यात्रेनिमित्त 'बारा गाड्या' ओढण्याची अनोखी परंपरा आहे. एकच व्यक्ती श्रद्धेच्या बळावर बारा गाड्या ओढते, जे पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक येतात.

वाघेश्वर मंदिर

[संपादन]

गावाशेजारील डोंगरामध्ये वाघेश्वराचे मंदिर असून श्रावण महिन्यात येथे अखंड हरिनाम सप्ताह होतो.

भौगोलिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • गायमुख: गावाजवळील डोंगरावर एक नैसर्गिक गायमुख आहे. पावसाळ्यात या मुखातून पाणी पडते, जे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.
  • नद्या: गावातून बेलपरा नदी वाहते आणि पूर्वेला सिंधफणा नदीचे उगमस्थान आहे.
  • वाहतूक: गावातून नुकताच अमळनेर ते रायमोह हा नवीन महामार्ग (Highway) गेला आहे.

सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन

[संपादन]

गावातील तरुण नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर असले तरी यात्रा, उत्सव आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव असलेल्या या गावात धार्मिक सलोखा आणि एकता पाहायला मिळते.

.