Jump to content

पागोटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पाग या पानावरून पुनर्निर्देशित)

पागोटे हे एक प्रकारचे शिरवेष्टन आहे.

संस्कृतमध्ये याला उष्णीष म्हणतात. उष्णीष म्हणजे मस्तकाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बांधावयाचे वेष्टन. कालांतराने या वेष्टनाला पागोटे, पटका, फेटा इत्यादी नावे मिळाली. विशिष्ट पद्धतीनी कायम बांधून ठेवलेल्या बसक्या पागोटयाचे पगडी असे नामाभिधान झाले आणि ही पगडी महाजन-संस्कृतीचे अविभाज्य लक्षण होऊन बसली. फेटा, रुमाल, साफा, कोशा, मंदिल, मुंडासे हे पागोट्यांचे विविध प्रकार होत.

सवाई माधवराव तसेच नाना फडणवीस यांच्या पगड्यांमध्ये सोन्या-मोत्याचे अलंकार असत. राजघराण्यातील लोकांच्या शोभिवंत पगड्यांना मंदिल म्हणत.

पेशवेकालीन पुणेरी ब्राह्मणी पगडीत शिरोभागी चोचदार उंचवटा असे. कापडाचे पट्टे मात्र सरळसपाट गुंडाळलेले असत, त्यांना पीळ नसे.

जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी लाड, त्यांचे बंधू डॉ. नारायण दाजी हे मोठाल्या पगड्या घालीत तर त्यानंतर आलेल्या काशिनाथ त्र्यंबक तेलंगांच्या पिढीतले लोक छोटेखानी पगड्या वापरत.

मुंबईतील पाठारे प्रभु एक वेगळीच पगडी घालीत. तसली पगडी संशयकल्लोळ नाटकातील फाल्गुनरावाच्या डोक्यावर दिसते.

महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतातील पगड्यांना गायकवाडी, शिंदेशाही, होळकरी, अशी नावे होती. त्यांत बहुतेक पिळाच्या पगड्या असत. मारवाड्यांमध्ये उदयपूरची उमराव पगडी, जयपूरचा शाही साफा, जोधपूरचा जसवंतशाही पेच वगैरे प्रसिद्ध आहेत. याशिवाय, कलकत्ती, जालोरी, जेसलमेरी, टोंकी, धौलपुरी, बाडमेरी, सामोदी, वगैरे भेद आहेतच. हे सर्व भेद पगडी बांधण्याच्या पद्धतीवरून पडले आहेत. पट्टीदार (सपाट पट्ट्याची), मोरणदार (पीळ घातलेल्या पट्ट्याची), बारीदार (पागोट्याला खिडक्या असलेली) पगडी हे त्यांतले मुख्य प्रकार होत. राजस्थानात पगडीला पाग म्हणतात.

क्षात्रधर्मीय मराठ्यांनी डोईला घट्ट बांधलेल्या पागोट्याला मुंडासे म्हणतात. शेतकरीही डोक्याला मुंडासे बांधीत.

पागोट्याचा एक पृष्ठभाग एका बाजूला उंच व दुसऱ्या बाजूला उतरलेला असला की तो झाला पटका. पटक्याच्या दोन्ही बाजू उंच व मधला भाग खोलगट असला की तो झाला फेटा. पोवाडे म्हणणारे शाहीर पटका बांधत. पटक्याला पाठीवर रुळणारी हातभर लांबीची निऱ्यांची पट्टी असते. फेट्यांना डोक्यावर तुरा असतो.

चक्राकार पागोटे

[संपादन]

केरुनाना छत्रे आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर व त्यांचे सुपुत्र विष्णूशास्त्री चिपळूणकर हे या मोठ्या 'चक्राकार' पागोट्याचे प्रतिनिधी होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]