पश्चिम बर्लिन
पश्चिम बर्लिन (जर्मन: Westberlin) हा १९४९ ते १९९० दरम्यान अस्तित्वात असलेला बर्लिन ह्या शहराचा एक भाग होता (दुसरा भाग: पूर्व बर्लिन). दुसऱ्या महायुद्धानंतर बर्लिन शहराचे चार हिस्से करण्यात आले, ज्यापैकी सर्वात मोठा व पूर्वेकडील हिस्सा (पूर्व बर्लिन) सोव्हिएत संघाच्या ताब्यात राहिला व कालांतराने पूर्व जर्मनी देशाची राजधानी घोषित करण्यात आला. बर्लिनचे उर्वरित तीन भाग फ्रान्स, युनायटेड किंग्डम व अमेरिकेची संयुक्त संस्थाने ह्या देशांच्या ताब्यात होते. ह्या भागांचे एकत्रीकरण करून पश्चिम बर्लिन शहराची स्थापना करण्यात आली. पश्चिम बर्लिन हा कायदेशीर रित्या पश्चिम जर्मनी देशाच्या अखत्यारीखाली कधीच नव्हता परंतु अनेक बाबतीत त्याला पश्चिम जर्मनीचे साहाय्य मिळत असे.
१३ ऑगस्ट १९६१ ते ९ नोव्हेंबर १९८९ दरम्यान पूर्व बर्लिन व पश्चिम बर्लिन हे भाग बर्लिनच्या भिंतीने विभाजले गेले होते. १९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर बर्लिन शहर पुन्हा एकसंध बनले.