पर्ल हार्बरवरील हल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पर्ल हार्बरवरील हल्ल्यास सुरुवात झाल्यानंतर काही काळातच जपानी पाणतीरांनी बंदरात उभ्या असलेल्या अमेरिकन नौकांना लक्ष्य केल्याचे, त्या वेळी आकाशात असलेल्या जपानी लढाऊ विमानातून घेतलेले दॄश्य

७ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी जपानाने अमेरिकेच्या पर्ल हार्बर, हवाई येथील नाविक तळावर आकस्मिक हल्ला चढवला. अमेरिकेच्या पॅसिफिक नौदलाने जपानाच्या आग्नेय आशियातील साम्राज्यविस्तारासाठी ब्रिटन, नेदरलॅंड्स् आणि अमेरिकेच्या ताब्यातील प्रांतांविरुद्ध आखण्यात आलेल्या लष्करी कारवायांत अडथळा आणू नये, म्हणून शाही जपानी नौदलाने ७ डिसेंबर, इ.स. १९४१ च्या सकाळी (जपानी प्रमाणवेळेनुसार ८ डिसेंबर, इ.स. १९४१) हा हल्ला केला.

३५३ जपानी लढाऊ विमाने, बॉंब आणि टॉर्पेडो विमाने यांचा वापर करून तळावर हल्ला केला. अमेरिकन नौदलाच्या आठही लढाऊ जहाजांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांपैकी चार जहाजे बुडाली. या आठपैकी सहा जहाजे पुन्हा मिळवून्, दुरुस्त करून त्यांचा वापर पुढे युद्धात करण्यात आला. जपानी नौदलाने तीन क्रूझर, तीन विनाशिका, एक विमानविरोधी प्रशिक्षण नौका आणि एक सुरूंगनौका यांचेही नुकसान केले. अमेरिकेची १८८ विमाने नष्ट झाली, २,४०२ अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले, १,२८२ अमेरिकन लोक जखमी झाले. वीजकेंद्र, गोदी, इंधन व टॉर्पेडो साठवण्याची गोदामे तसेच, पाणबुडीचे धक्के आणि मुख्यालय (जे हेरखात्याचे केंद्र होते) यांवर हल्ला केला गेला नाही. अमेरिकेच्या तुलनेत जपानाचे कमी नुकसान झाले: २९ विमाने आणि ५ लहान पाणबुड्या नष्ट झाल्या, ६५ सैनिक कामी आले वा जखमी झाले व केवळ् एक जपानी सैनिक पकडला गेला.

ह्या अनपेक्षित हल्ल्याने अमेरिकन जनतेला प्रचंड धक्का बसला व त्याने अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात उतरण्यास भाग पाडले. ८ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी अमेरिकेने अधिकृतरीत्या जपानाविरुद्ध युद्ध पुकारले व ती ब्रिटनाच्या बाजूने युद्धात उतरली. यापुढील अमेरिकन कारवायांमुळे जर्मनीइटली यांनी ११ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले ज्याला अमेरिकेने तसेच प्रत्युत्तर दिले.

या आकस्मिक जपानी हल्ल्यामागे बराच पूर्वेतिहास होता, परंतु, सामोपचाराने बोलणी चालू असताना, कुठलीली पूर्वसूचना न देता झालेल्या ह्या हल्ल्यामुळे तत्कालीन अमेरिकन साष्ट्रपती फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट यांनी ७ डिसेंबर, १९४१ या दिवसाबद्दल 'अ डेट विच विल लिव्ह इन इन्फेमी' (बदनाम, असंतोषजनक दिवस) [१] असे उद्गार काढले आहेत.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ इंग्लिश: A date which will live in infamy; उच्चार: अ डेट व्हिच विल लिव्ह इन इन्फेमी; अर्थ: दारूण म्हणून कायम स्मरणात राहील असा दिवस