नीला सत्यनारायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नीला सत्यनारायण
जन्म ५ फेब्रुवारी १९४९
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १६ जुलै २०२०
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, प्रशासकीय अधिकारी
भाषा मराठी
साहित्य प्रकार आत्मचरित्र, ललित लेख, कथा, कविता
वडील वासुदेव आबाजी मांडके
आई सुशीला मांडके
पुरस्कार महात्मा गांधी पुरस्कार - १९८६,


नीला सत्यनारायण (जन्म : मुंबई, ५ फेब्रुवारी १९४९, मृत्यू: १६ जुलै २०२०,मुंबई[१]) या १९७२ च्या बॅचच्या (आता निवृत्त) सनदी अधिकारी असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या. याशिवाय त्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.

जन्म[संपादन]

नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबईत झाला.

कौटुंबिक माहिती[संपादन]

त्यांच्या आईचे नाव सुशीला आणि वडिलांचे नाव वासुदेव आबाजी मांडके होते. ते पोलिस खात्यात होते.

शिक्षण[संपादन]

नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मुंबई, पुणे, नाशिक येथे झाले. त्यांनी शालान्त परीक्षा दिल्ली बोर्डातून दिली. त्या परीक्षेत त्या १९६५ साली संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. १९७२ साली त्या पहिल्याच प्रयत्नात आय.ए.एस.ची परीक्षा पास झाल्या.[२]

कारकीर्द[संपादन]

नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले .

प्रकाशने[संपादन]

नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. ‘सत्यकथा’ हे त्यांचे पुस्तक उद्योजकतेबाबत आहे आणि ‘एक दिवस (जी)वनातला’ हे त्या वन विभागात सचिव असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे.[३]

पुस्तके[संपादन]

  • आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर)
  • आयुष्य जगताना
  • एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन)
  • एक पूर्ण - अपूर्ण (आत्मचरित्रपर)
  • ओळखीची वाट (कवितासंग्रह)
  • जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव)
  • टाकीचे घाव
  • डेल्टा १५ (प्रवासवर्णन)
  • तिढा (कादंबरी)
  • तुझ्याविना (कादंबरी)
  • पुनर्भेट (अनुभवकथन)
  • मी क्रांतिज्योती (अनुभवकथन)
  • मैत्र (ललित लेख)
  • रात्र वणव्याची (कादंबरी)
  • सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन)

प्रसिद्ध कविता[संपादन]

  • आकाश पेलताना (कविता)
  • आषाढ मेघ (कविता)
  • मातीची मने (कविता)

पुरस्कार[संपादन]

नीला सत्यनारायण यांना मिळालेले निवडक वाङ्मयीन आणि सांस्कृतिक पुरस्कार :

  • असीम (हिंदी कवितासंग्रह) या पुस्तकाला केंद्र शासनाचा अहिंदी भाषी लेखक पुरस्कार
  • अमेरिकेतल्या मेरीलॅंड येथील 'इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ पोएट्री'चे इंग्रजी कवितेसाठीचे एडिटर्स ॲवॉर्ड (इ. स. २०१५)[४]
  • चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार
  • टाकीचे घाव या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार (इ.स. २०१५)
  • निर्माण पुरस्कार- १९८७
  • सांस्कृतिक योगदानाबद्दल केंद्र शासनाचा अहिंदी भाषिक लेखक पुरस्कार - १९८५
  • मनोविकास विशेष बाल शिक्षण सोसायटी (अमरावती)चा, आशीर्वाद पुरस्कार २००९
  • महात्मा गांधी पुरस्कार - १९८६
  • महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २००७
  • मातृवंदन पुरस्कार २००९
  • महाराष्ट्र हिंदी साहित्य संस्था पुरस्कार २००८
  • लोकसत्ता वुमन ऑफ द इयर पुरस्कार २००८
  • संकल्प प्रतिष्ठान (कल्याण) जीवनगौरव पुरस्कार २००९

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Neela Satyanarayan: माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे करोनामुळे निधन". Maharashtra Times. 2020-07-16 रोजी पाहिले.
  2. ^ "समाजाला आपल्या परीने समृद्ध करा". Maharashtra Times. 2020-07-16 रोजी पाहिले.
  3. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/neela-satyanarayan/articleshow/19668880.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ सत्यनारायण, नीला (२०१४). एक पूर्ण - अपूर्ण. मुंबई: ग्रंथाली प्रकाशन.