निहाली भाषा
language | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | प्राकृतिक भाषा, modern language | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
| |||
निहाली ही भारतात महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्हातल्या जळगाव जामोद तालुक्यात बोलली जाणारी एक भाषा आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार जवळपास २००० लोक ही भाषा बोलतात. निहाली भाषेचे वैशिष्ट्य असे की ती जगातल्या इतर कुठल्याही भाषाकुळात न मोडणारी अशी स्वतंत्र भाषा आहे. यामुळे ती जगातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असण्याचा संभव आहे. स्पेनमधील बास्क भाषा निहालीप्रमाणेच स्वतंत्र भाषा आहे.
निहाली भाषा सुरुवातीला ऐकण्यास थोडी क्लिष्ट, किचकट वाटत असली तरी ती लवकर आत्मसात होऊ शकते. निहाली भाषा केवळ बोली स्वरूपात आहे. तिची स्वतंत्र लिपी नाही. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जामोद, चालठाणा, सोनबर्डी, कुॅंवरदेव, उमापूर, रायपूर तसेच संग्रामपूर तालुक्यातील शेंबा, चिचारी, वसाडी या आदिवासीबहुल गावांमध्ये पाचशेच्या जवळपास निहाल कुटुंबीयांची वस्ती आहे. त्यांची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात आहे. त्यापैकी काही जणांवर कोरकू भाषेचा परिणाम होऊन त्यांच्या दैनंदिन जीवनात 'निहाली'भाषेऐवजी 'कोरकू' भाषेने स्थान मिळविले आहे. परिणामी निहाली भाषा अस्तंगताकडे वाटचाल करीत आहे. भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात देशातील ४२ भाषा-बोलीभाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले आहे. या अहवालात 'निहाली' भाषेचाही समावेश आहे.[१]
रहिवास
[संपादन]निहाल हे जंगलामध्ये रहात असल्याचा उल्लेख मोगल व मराठे काळात आहे. इंग्रजांनी त्यांना गुन्हेगार घोषित केले होते.यांची जीवनपद्धती ही हिंदू आहे. खेडा मुठवा, हनुमान व महादेव या देवतांची ते पूजा करतात.
निहाल ही कोरकुंची उपजमात आहे.ते स्वतःला कोलटा असे म्हणतात.
निहाली भाषेतील काही शब्द
[संपादन]या भाषेत ६ स्वर व २७ व्यंजने आहेत.
- पाकीण (मोर)
- घोटारी (हरीण)
- चोगम (रानडुक्कर)
- बोल्ग (अस्वल)
- टेमऱ्या (वाघ)
- चारको (माकड)
- बोटोर (ससा)
- कोगो (साप)
- बादरा (आकाश)
- खारा (जमीन)
- मांडो (पाऊस)
- खोश (हवा)
- आड्डो (झाड)
- सिडू (दारू)
- कोंबा (कोंबडा)
निहाली भाषेतील काही संवाद
[संपादन]- 'बोइस्कोल का' (शाळेत चल)
- 'मी गाचल्ले' (कुठे चालले?)
- 'प्या हिंगा की' (इकडे ये)
- 'न जुमो नान' (तुझे नाव काय?)
- 'ऐंगे जुमो तोमाराम निहाल' (माझे नाव तोताराम निहाल आहे)
- 'ने छोकरा टे की बेटे' (तुम्ही जेवण केले की नाही?)
- 'ओलान नांजी डां' (भाजी काय होती?)
- 'ने पिवर मानस' (तुम्ही चांगले माणूस आहात)
- 'बो निंडो का (निंदायला चला)
- 'जप्पा डेलन की नान (पाणी पिता का?)
इतर
[संपादन]सोनबर्डी येथील भावजा बाटू जामूनकर यांचेकडे या बोलीभाषेतील साहित्याचा साठा आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ मंजितसिंग शीख. सातपुड्यातली निहाली अस्ताकडे? -Maharashtra Times. महाराष्ट्र टाइम्स. 15-03-2018 रोजी पाहिले.
केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात देशातील ४२ भाषा-बोलीभाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आहे आहे. या अहवालात 'निहाली' भाषेचा समावेश आहे.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)