धर्माजी प्रताप मुंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धर्माजी प्रतापराव मुंडे किंवा धर्माजी प्रतापराव गर्जे राजे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य आद्य क्रांतीकारक होते. काळोखातील मशाली या पुस्तकानुसार ते गर्जे होते. वंजारी समाजाच्या प्रतापराव या कुळी मध्ये गर्जे व मुंडे हे वाडेभाऊ आहेत. प्रताप नव्हे तर प्रतापराव हे कुळ आहे. [१] इंग्रज व निजाम सरकारविरुद्ध राज्यातील पहिला उठाव परळी तालुक्यातील डाबी गावात झाला. धर्माजी प्रतापराव मुंडे नामक निधडय़ा तरुणाने इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यप्राप्तीचे पहिले रणशिंग फुंकले. मात्र, राष्ट्रीय उठावाच्या (१८५७) ३९ वर्षे आधी झालेला हा लढा दुर्लक्षितच राहिला. असे असले, तरी राज्यातील पहिले आद्यक्रांतिकारक म्हणून धर्माजी मुंडे डाबी गावात या लढाईचा स्मृतिस्तंभ आजही त्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

राष्ट्रीय उठावाच्याही ३९ वर्षे आधी परळी तालुक्यातील डाबी गावात, ३१ जुलै १८१८ रोजी इंग्रज-निजाम व स्थानिक सैन्य आणि धर्माजी प्रतापराव मुंडे यांच्यात निकराची लढाई लढली गेली. निजामाने इंग्रजांशी हातमिळवणी केल्यावर शेतसारा पद्धत बदलली. धान्याऐवजी पैशांच्या स्वरूपात शेतसारा घेतला जाऊ लागला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. या असंतोषातून धर्मराज मुंडे याने तरुण शेतकऱ्यांना एकत्रित करून बंड पुकारले. निजामांच्या नाक्यावर सशस्त्र हल्ले चढवून शस्त्रे गोळा केली व त्यांना सळो की पळो करून सोडताना स्वातंत्र्याचे बीजारोपण केले. निजाम-सिकंदरजहाँने हा उठाव मोडून काढण्याचे प्रयत्न केले. पण ते फसले. त्यामुळे कंपनी सरकारला तातडीने या उठावाची माहिती देऊन इंग्रज व निजाम राजवटीला धोका असल्याचे सांगण्यात आले होते. स्थितीचे गांभीर्य ओळखून कंपनी सरकारने लेफ्ट. स्टूथरलँडच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याची बटालियन पाठवली. ही बटालियन १० जुलै १८१८ ला बीड जिल्ह्य़ात येऊन धडकली. त्यांच्यासोबत परळी भागातील जमादार शादीखान हाही होता. नवाब मुर्तुजा हाही लढाईत सहभागी झाला होता. स्टूथरलँडने नियोजनबद्धपणे गढीवजा असलेल्या डाबीतील बुरुजावर धर्मराज व त्याच्या सहकाऱ्यांना घेरले आणि क्रूरपणे त्यांना ठार मारले. पावसाळ्याचे दिवस असल्याने रक्ताचा पाट वाहिला. गढीवरून वाहत आलेले रक्त जेथे थांबले ते ठिकाण व दगड या जाज्वल्य लढाईची ओळख म्हणून आजही आदरभावाने पूजले जातात. ‘बुरटॉन ए हिस्ट्री ऑफ हैदराबाद कॉन्टीजन्ट’ ग्रंथात या लढाईत वंजारी समाजाचे लोक मोठय़ा प्रमाणात होते, असा उल्लेख आहे.

राज्य सरकारने १९६९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या बीड जिल्ह्य़ाच्या गॅझेटमध्ये धर्माजी प्रतापराव यांचा स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा पहिला लढा म्हणून नोंद आहे. संशोधनात डाबी हे गाव स्पष्ट झाल्यानंतर धर्माजी यांचे आडनाव मुंडे होते, हे उघड झाले. आजही डाबी गावात या लढाईचा स्मृतिस्तंभ पाहावयास मिळतो. [२]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]