Jump to content

दुसरे इंग्रज-मैसूर युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)
पहिल्या व दुसऱ्या इंग्रज-मैसूर युद्धांची व्याप्ती दर्शवणारा आधुनिक नकाशा

दुसरे इंग्रज-मैसूर युद्ध (मराठी नामभेद: दुसरे ब्रिटिश-मैसूर युद्ध ; इंग्रजी: Second Anglo-Mysore War, सेकंड ॲंग्लो-मायसोर वॉर) हे म्हैसूरच्या राज्याचा शासक हैदरअली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये इ.स. १७७९ ते इ.स. १७८४ या कालखंडात घडलेले युद्ध होते.

कारणे

[संपादन]

इ.स. १७७२ मध्ये मराठ्यांनी हैदरअलीवर आक्रमण केले असता मद्रासच्या तहात ठरल्याप्रमाणे ब्रिटिश हैदरअलीच्या मदतीला न आल्याने हैदरअली संतापला. इ.स. १७७८ मध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात फ्रांस अमेरिकन वसाहतीच्या बाजूने युरोपियन आघाडीत ब्रिटिशांविरूद्ध सामील झाला त्यामुळे ब्रिटिशांनी फ्रेंचांच्या भारतातील सर्व वसाहती ताब्यात घेतल्या. या वसाहतींपैकी माहे बंदर ही फ्रेंचाची वसाहत म्हैसूर राज्याच्या अधिपत्याखाली होती. माहे हे बंदर मैसूर राज्याच्या दृष्टीने हैदरअलीसाठी महत्त्वाचे होते कारण समुद्री व्यापारासाठी व बाहेरून येणाऱ्या मालासाठी माहे बंदर हे मोक्याचे ठिकाण होते त्यामुळे माहेमध्ये हस्तक्षेप करू नये अशी सूचना हैदरअलीने ब्रिटिशांना केली परंतु ब्रिटिशांनी हैदरअलीच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मार्च, इ.स. १७७९ मध्ये माहे बंदराचा ताबा घेतला त्यामुळे इंग्रजांविरूद्ध युद्ध पुकारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय हैदरअलीसमोर उरला नाही.

युद्धादरम्यानच्या घटना

[संपादन]

ब्रिटिशांचा सूड उगवण्यासाठी हैदरअलीने मराठ्यांची व फ्रेंचाचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला. जुलै, इ.स. १७८० मध्ये ८३,००० फौजेसह हैदरअलीने कर्नाटकावर स्वारी केली त्यावेळी त्याच्याकडे युरोपियन इंजिनियर्सनी बनवलेल्या शंभर अवजड मैदानी तोफाही होत्या. मार्गात येणारी खेडी व शहरे त्याने जाळून, लुटून उद्ध्वस्त केली. कर्नल बेरीच्या नेतृत्वाखालील ४००० च्या ब्रिटिश फौजेला हैदरअलीने कोंडीत पकडले व तिला पोलिलोर येथे सप्टेंबर, इ.स. १७८१ मध्ये शरण येण्यास भाग पाडले. ऑक्टोबरमध्ये अर्काटही हैदरअलीच्या हातात पडले. बक्सार येथे विजय मिळविणारा सर हेक्टर मन्रो हासुद्धा हैदरअलीसमोर टिकाव धरू शकला नाही. हेक्टर मन्रोने त्याच्याकडील अवजड तोफखाना कनिवेरम तलावात बुडवून टाकला व मद्रासकडे माघार घेतली. हैदरअलीकडून ब्रिटिश फौजा जागोजागी पराभूत होत आहेत हे कळाल्यावर वॉरन हेस्टींग्जने बंगाल येथील ब्रिटिश लष्कराचा सरसेनानी सर आयर कूटला ताबडतोब दक्षिणेत चिंगलपेट आणि वॉंदिवॉश येथील वेढ्यात अडकून पडलेल्या ब्रिटिश फौजेच्या मदतीसाठी पाठवले. १ जुलै, इ.स. १७८१ रोजी पोर्टोनोव्हो येथे हैदरअलीची सर आयर कूटशी पहिली चकमक झाली. या लढाईत हैदरअलीचे एक हजार सैनिक कामी आले व त्याला माघार घ्यावी लागली. हैदरअली व ब्रिटिश यांच्यात दुसरी लढाई तिकोल्लमच्या मैदानात झाली पण तिचा कोणताही निर्णय लागू शकला नाही. तिसरी मोठी लढाई २७ सप्टेंबर, इ.स. १७८१ रोजी शोलींघूर येथे झाली. या लढाईत हैदरअलीचे ५००० सैनिक ठार झाले. आत्तापर्यंतच्या बऱ्याच आघाड्यांवर ब्रिटिशांना विजय मिळाला असला तरी रेंगाळलेल्या युद्धात त्यांचे बरेच मनुष्य आणि वित्तबळ खर्ची पडले होते. हैदरअलीचा मुलगा टिपू सुलतान याने ब्रेथवेटच्या २००० ब्रिटिश फासैजेचा तंजावर येथे पराभव केल्याने व इंग्रजांच्या ताब्यातील कडलोर हे ठिकाण जिंकल्याने हैदरअलीच्या आशा परत पल्लवित झाल्या. तशातच डे सफ्रेनच्या नेतृत्वाखालील फ्रेंच आरमारातील २००० सैनिक हैदरअलीच्या मदतीला आले पण ७ डिसेंबर, इ.स. १७८२ रोजी हैदरअली एका लष्करी तळावर गंभीर आजाराने मृत्यू पावला. अशा परिस्थितीत हैदरअलीचा विश्वासू मंत्री पूर्णय्या याच्या सल्ल्यावरून टिपूच्या आगमनापर्यंत हैदरअलीच्या मृत्यूची बातमी गुप्त ठेवण्यात आली. टिपू आल्यानंतर त्याने आपल्या वडिलाचे शव श्रीरंगपट्टणम येथे आणून दफन केले. त्यानंतर टिपू हा टिपू सुलतान या नावाने गादीवर आला व त्याने ब्रिटिशांशी लढण्यासाठी एक योजना तयार केली. तोपर्यंत ब्रिटिशांनी मराठ्यांबरोबर सालबाईच्या तहाद्वारे युद्धविराम केला होता. इ.स. १७८३ च्या व्हर्साय तहाद्वारे फ्रेंच आणि इंग्रज यांच्यातही शांतता नांदू लागली होती. परंतु टिपूने ब्रिटिशांशी एकाकी संघर्ष चालूच ठेवला. मार्च, इ.स. १७८४ च्या मंगलोर तहाने दुसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध संपुष्टात आले.

मंगळूरचा तह

[संपादन]

या तहाद्वारे दोन्ही पक्षांनी जिंकलेला मुलुख आणि युद्धकैदी परस्परांना परत केले. वॉरन हेस्टींग्जच्या दृष्टीने हा तह ब्रिटिशांना कमीपणा आणणारा असला तरी त्याला तो मान्य करावा लागला. या तहामुळे दोन्ही पक्षात मैत्रीसंबंध निर्माण झाल्यामुळे मैसूर राज्यात कंपनीला व्यापार करण्याची परवानगी वॉरन हेस्टींग्जने टिपूकडे मागितली पण टिपूने ती मान्य केली नाही.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

अधिक वाचनासाठी

[संपादन]
  • घोलम, मोहम्मद. द हिस्ट्री ऑफ हैदर शाह अलाइस हैदरअली खान बहादुर (इंग्रजी भाषेत). १४ फेब्रुवारी, २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  • ब्राऊन, चार्ल्स फिलीप. मेमरीज ऑफ हैदर अँड टिपू, रूलर्स ऑफ श्रीरंगपट्टम (इंग्रजी भाषेत). १४ फेब्रुवारी, २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)