Jump to content

दर्यावसिंह ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दर्यावसिंह ठाकूर या क्रांतीकारकांचा जन्म इ.स. १७९५ मध्ये फतेहपूर (उत्तर प्रदेश)चे रहिवासी मर्दानसिंहजी ठाकूर यांच्या इथे झाला. गर्भश्रीमंत घरात जन्म झाला असला तरी सर्वसामान्यांप्रती असलेल्या विलक्षण सहानुभूतीने व माणूसकीने आचरण करणाऱ्या दर्यावसिंहाना युद्धशास्त्रातही आवड होती.

इंग्रजाविरोधात लढाई

[संपादन]

१८५५ पासून इंग्रजांच्या अतिरेकी आणि अत्याचारी कारभाराविरोधात जनमानसात अंगार पेटला होता. सेनापती तात्या टोपे यांच्या कार्याने आणि विचारांनी प्रभावीत होऊन ठाकूर दर्यावसिंहांनी तात्या टोपेंना सर्वतोपरी सहाय्य करायचे कबूल केले होते. ठाकूर दर्यावसिंहांनी इंग्रजांच्या विरोधात संघर्ष पेटविला. दर्यावसिंहाचे तीन भाऊ निर्मलसिंह ठाकूर, बख्तावरसिंह ठाकूर, रघुनाथसिंह ठाकूर व दर्यावसिंहांचा पुत्र सुजनसिंह ठाकूर हे सर्वजण इंग्रजांच्या विरोधातील लढ्यात सहभागी झाले होते. ११ जुलै १८५७ रोजी दर्यावसिंह ठाकूर आणि इंग्रज सेनेत घनघोर लढाई झाली. त्या काळातील आधुनिक शस्त्राने सज्ज असलेल्या इंग्रज सेनेच्या विरोधात दर्यावसिंह परंपरागत शस्त्रांनी लढत होते. परिणामतः दर्यावसिंह ठाकूरांचा पराभव झाला.

अटक व मृत्यू

[संपादन]

इंग्रज अधिकारी दर्यावसिहांना पकडण्यास उत्सुक होते. ५ मार्च १८५८ दर्यावसिंहांचा द्वेष करणाऱ्या त्यांच्याच एका सहकाऱ्याने गद्दारी करून दर्यावसिंह व त्यांच्या कुटुंबियांना पकडून दिले. इंग्रज अधिकाऱ्यांनी दर्यावसिंह ठाकूरांना त्यांचा भाऊ आणि पुत्र सुजनसिंह यांच्यासह ६ मार्च १८५८ रोजी फाशी दिली.