Jump to content

दमयंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दमयंती आणि राजहंस

दमयंती ही महाभारतातील वन पर्व किंवा अरण्य पर्वातील एक पौराणिक पात्र आहे. ती विदर्भ राज्याची राजकुमारी होती, जिचे लग्न निषद देशाचा राजा नल याच्याशी झाले. अनेक भारतीय भाषांतील लेखकांनी हिंदूंच्या इतर ग्रंथांमध्येही हे पात्र आढळून आले आहे. संस्कृती वाङ्मयातील श्रीहर्षाने लिहिलेल्या पाच महाकव्यांपैकी एक असलेल्या १२ व्या शतकातील नैषधीय चरित यात नलासह ती देखील मुख्य पात्र आहे. आपला पती नल याच्यासमवेत हिने भोगलेल्या हालअपेष्टांची सविस्तर कथा महाभारत आरण्यक पर्वान्तर्गत 'नलोपाख्याना'मध्ये दिली आहे.

जन्म[संपादन]

दमयंतीचा पिता भीम दीर्घकालपर्यंत निपुत्रिक होता. आपल्या हृदयीची ही व्यथा भीमाने सहजवश राजवाड्यात आलेल्या दमन ऋषींना सांगितली. त्या ऋषींच्या कृपाप्रसादाने हिचा आणि दम, दांत आणि दमन नामक हिच्या तीन भावांचा जन्म झाला. (महा.आर.पर्व ५०.९)

स्वयंवर[संपादन]

स्वयंवरात दमयंतीने नलराजास ओळखले

आपल्या प्रमदावन नामक वनात ही बसली असता एका सुवर्णहंसाद्वारा निषधाधिपती नलाचे गुणवर्णन हिने ऐकले, आणि तत्काल ही त्याच्या प्रेमात पडली. याच हंसाकरवी हिने आपली प्रणयभावना नलाला विदीत केली.

हिच्या स्वयंवरसमयी नाना देशांचे राजे उपस्थित होते. नलाविषयीची हिची प्रणयभावना जाणून इंद्र, अग्नि, वरुण आदि पाच देवहि नलाचेच रूप धारण करून स्वयंवरमंडपात उपस्थित झाले. परंतु अखेरीस देवतांच्या कृपाप्रसादाने हिने खरा नल ओळखला आणि त्यास वरमाला घातली.

वनवास[संपादन]

नल-दमयंती वनवासात - राजा रवी वर्मा

यानंतर थोड्याच दिवसांनी नलाचे सारे राज्य आणि वैभव द्यूतामध्ये गमावले आणि निषध देशाची ही महाराणी एका वस्त्रानिशी आपल्या पतीसमवेत वनवासास गेली. तेथे या उभयतांवर अनेक संकटे आली. त्यामुळे त्रस्त होऊन ही निद्रावस्थेत असता नल हिला सोडून गेला.

ही वनात एकाकी अवस्थेत हिंडत असता एका अजगराने हिला गिळले. तेव्हा एका भिल्लाने हिला सोडवले. पापवासना जागृत होऊन तो हिच्यावर बलात्कार करू लागताच आपल्या पातिव्रत्यप्रभावाने हिने त्यास दग्ध केले.

कालांतराने एका व्यापारी तांड्यासोबत (सार्थवाह) ही चेदीपुरास गेली, आणि तेथे आपली मावशी राजमाता सुनंदा हिचा हिने आश्रय घेतला. तेथून ही आपल्या माहेरी विदर्भराज भीमाकडे गेली, आणि वनवासी नलाला हरप्रयत्नाने शोधून काढण्याची प्रार्थना हिने त्यास केली. भीमाने नलाच्या शोधार्थ देशोदेशी ब्राह्मण रवाना केले.

द्वितीय स्वयंवर[संपादन]

नलाच्या शोधार्थ अयोध्या देशास गेलेल्या पर्णाद नामक ब्राह्मणानो तेथील ऋतुपर्ण राजाकडे बाहुक नामक सारथ्याच्या रूपाने नल रहात असल्याची वार्ता आणली. या वार्तेची सत्यासत्यता अजमाविण्यासाठी आपल्या पित्याच्या नकळत हिने स्वयंवराच्या मिषाने ऋतुपर्णास पाचारण केले. बाहुकाच्या अप्रतिम सारथ्य कौशल्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रातःकालीच ऋतुपर्ण विदर्भराजधानीस येऊन पोहोचला. यावरून बाहुक म्हणजेच नल होय अशी हिची खात्री पटली.

दुसऱ्या दिवशी दमयंतीने बाहुकास आपल्या महालात बोलावून घेतले व नलाविषयी त्याचेकडे पृच्छा केली. कलिप्रभावामुळे हा सारा अनर्थ घडल्याचे सांगून नल आपल्या वास्तवरूपात प्रकट झाला. वायुदेवतेने आकाशवाणीद्वारा ही सच्चरित्र असल्याचे सांगताच त्याने हिचा स्वीकार केला.

कालांतराने ऋतुपर्णा राजाने शिकविलेल्या द्यूतविद्येच्या साह्याने नलाने आपले विगत राज्य परत मिळविले, आणि ही पुन्हा एकवार निषध देशाची महाराणी बनली.

परिवार[संपादन]

हिला इंद्रसेन नामक पुत्र आणि इंद्रसेना नामक कन्या अशी दोन अपत्ये होती. आपल्या वनवासकाळी हिने त्यांस आपल्या पित्याकडे पाठविले होते.

संदर्भ[संपादन]

[१]

  1. ^ चित्राव, सिद्धेश्वरशास्त्री. भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश खंड १.