Jump to content

तेरीज पत्रक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खातेवही मध्ये असणाऱ्या सर्व खात्यांच्या नावे आणि जमा असणाऱ्या शिल्लक रकमांची यादी म्हणजे तेरीज होय. (इंग्लिश: Trial Balance). तेरीज म्हणजे विशिष्ट तारखेस एखाद्या व्यापाऱ्याच्या खातेवहीतील सर्व खात्यांची जमा आणि नावे शिलकांची यादी दाखवणारे विवरणपत्र होय.[१]

व्याख्या[संपादन]

तेरीज म्हणजे खातेवहीतील सर्व खात्यांच्या शिल्लक अथवा जमा रकमेचा सारांश आहे. याचा उपयोग नोंदवण्यात आलेल्या सर्व नावे आणि जमा रकमांची समानता निर्धारित करणे आणि अंतिम लेखे तयार करण्यासाठी एक सारांश तयार ठेवणे हा असतो – एरिक कोहलर.

आवश्यकता[संपादन]

तेरीज पत्रक का तयार केले जाते याची करणे खालील प्रमाणे

१) सर्व व्यावसायिक व्यवहार लेखापुस्तकात बरोबर नोंदवले गेले आहेत याची खात्री करणे.

२) प्रत्येक खात्याची अंकगणितीय शुद्धता तपासणे. जमा नावे रकमांची बेरीज वजाबाकी योग्य प्रकारे करून शिल्लक रकमेची योग्य प्रकारे गणना केली गेली आहे हे पाहणे.

३) खातेवाहीतील खात्यांची अंतिम शिल्लक रक्कम जाणणे.

४) सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद लेखा पुस्तकात द्विनोंदी लेखा पद्धतीची तत्त्वे पाळून झाली आहेत याची खात्री करणे.

५) अंतिम लेखा विवरणे तयार करण्यासाठी आधार पुरवणे.

तेरीज जुळणे म्हणजे अचूकतेची खात्री आहे का ?[संपादन]

जमा आणि नावे खात्यांच्या शिल्लक रकमांची बेरीज समान येणे म्हणजे ‘तेरीज जुळणे’ होय. तेरीज जुळणे म्हणजे लेखा , नोंदी, खतावण्या योग्य प्रकारे लिहिल्या गेल्या असल्याचे मानले जाते. चुका असूनही तेरीज जुळू शकते उदा. चुकीची रक्कम जमा आणि नावे बाजूस लिहिणे, व्यवहाराचे लेखांकन करताना चुकीच्या खात्यांना परिणाम दर्शवणे. परिणामांची नोंद उलट करणे ( खाते जमा करण्याच्या ऐवजी नावे करणे आणि नावे करण्या ऐवजी जमा करणे).

लेख पुस्तकांची केवळ गणितीय अचूकता पाहण्यासाठी तेरीज केली जाते.

तेरीज पत्रकाचा नमुना / प्रारूप[संपादन]

तेरीज पत्रक तयार करण्यासाठी खालील प्रारूपे वापरली जातात.[२]

१) विवरण पत्र प्रारूप - संगणकीकरणाच्या आजच्या दिवसात विवरण पत्र प्रारूप जास्ती प्रमाणत वापरले जाते. यालाच रोजकीर्द प्रारूप असेही म्हटले जाते.

विवरण खातेपान क्र. नावे शिल्लक

रक्कम रु.

जमा शिल्लक

रक्कम रु.

श्री अ यांचे खाते ३२ १५००० --
श्री क्ष यांचे खाते ७७ -- ५२०००
फर्निचर खाते १२६ ३५००० --
...... .. ..... .....
एकूण XXXX XXXX

२) खातेवही प्रारूप - यालाच टी प्रारूप असेही म्हटले जाते. इंग्रजी टी या आद्याक्षरा प्रमाणे तेरीज पत्रकाची मांडणी केली जाते.डाव्या बाजूस नावे शिल्लक आणि उजव्या बाजूस जमा शिल्लक दर्शवली जाते.

नावे शिलका खातेपान क्र. रक्कम रु. जमा शिलका खातेपान क्र. रक्कम रु.
श्री अ यांचे खाते ३२ १५००० श्री क्ष यांचे खाते ७७ ५२०००
फर्निचर खाते १२६ ३५००० ..... .. .....
एकूण XXXX एकूण XXXX

तेरजेचे प्रकार[संपादन]

तेरीज खालील दोन प्रकारे केली जाते .[३]

१) ढोबळ तेरीज

– प्रत्येक खात्याच्या दोन्ही बाजूंच्या रकमांची बेरीज करून ती वेगवेगळी जमा आणि नावे स्तंभामध्ये लिहिली जाते. म्हणजेचप्रत्येक खात्याच्या जमा आणि नावे बाजूला काही रक्कम असू शकते. या पद्धतीची तेरीज सध्या वापरली जात नाही.

२) शुद्ध तेरीज

– वापरल्या जाणाऱ्या शुद्ध तेरीज प्रकारात प्रत्येक खात्याची एकूण शिल्लक रक्कम (जमा आणि नावे रकमेतील निव्वळ फरक ) तेरीज पत्रकात लिहिला जातो.

खातेनिहाय निरीक्षणे[संपादन]

१) वैयक्तिक खाती – या प्रकारची खाती जमा किंवा नावे शिल्लक दाखवू शकतात. जर खात्यामध्ये जमा शिल्लक असेल तर ते खाते धनकोचे आणि नावे शिल्लक असेल तर हे खाते ऋणकोचे असते.

२) मालमत्ता खाती - या खात्यांमध्ये नेहेमीच नावे रक्कम शिल्लक असते.

३) देयता खाती – या प्रकारच्या खात्यांमध्ये नेहेमीच जमा रक्कम शिल्लक असते.

४) नामधारी खाती – खर्चाशी संबंधित खाती नावे शिल्लक दाखवतात . उत्पन्न किंवा लाभाशी संबंधित खाती जमा रक्कम दर्शवतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://www.investopedia.com/terms/t/trial_balance.asp
  2. ^ http://content.moneyinstructor.com/1499/trialbalance.html
  3. ^ http://www.accountingexplanation.com/trial_balance.htm