लेखांकन (वाणिज्य )

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखांकन ही पुस्तपालनात नोंदवल्या गेलेल्या माहितीचे वर्गीकरण, सादरीकरण आणि सारांशीकरण करण्याची क्रिया होय. पुस्तपालन जिथे संपते तिथे लेखांकन चालू होते.

व्याख्या[संपादन]

व्यापारिक माहितीचे एकत्रीकरण, सारांशीकरण व विश्लेषण करून छापील स्वरूपात माहितीचा अहवाल देणारी प्रत्येक व्यापाराची स्वतःची लेखांकीय पद्धत असते - प्रो. रॉबर्ट एन. अँथनी

फरक[संपादन]

पुस्तपालन आणि लेखांकन यांमध्ये गल्लत होण्याची शक्यता आहे. दोन्ही संकल्पानातील फरक खालीलप्रमाणे

पुस्तपालन लेखांकन
व्यवहारांचे वर्गीकरण आणि नोंदणी व्यवहारांचे संक्षिप्तीकरण आणि विश्लेषक नोंदी केल्या जातात
व्यवहार घडला की लगेच नोंदी केल्या जातात पुस्तपालनानंतर लेखांकन केले जाते
प्राथमिक स्वरूपाची माहिती पुरवणे आणि नोंद ठेवणे हे उद्दिष्ट नफा / तोटा शोधणे आणि व्यापाराची आर्थिक स्थिती दर्शवणे हा उद्देश
पुस्तपालनानंतर रोजकीर्द आणि खाते पुस्तक बनते. नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद याची निर्मिती लेखांकनानंतर होते
द्विनोंदी पद्धतीने व्यवहारांची नोंद म्हणजे पुस्तपालन लेखांकन म्हणजे वित्तीय माहितीवर प्रक्रिया आणि विश्लेषण
पुस्तपालन ही संकुचित संज्ञा आहे लेखांकन ही व्यापक संज्ञा आहे. हिच्यात पुस्तपालनाचा अंतर्भाव होतो

लेखांकीय माहितीची गुणात्मक वैशिष्ट्ये[संपादन]

  1. विश्वसनीयता - लेखांकीय माहिती विविध पुराव्यांवर आधारित हवी. हिच्याधून समजणारी तथ्ये निरपेक्ष असावीत म्हणजे व्यक्तीनुसार त्यांचा अर्थ बदलता येऊ नये इतकी सुस्पष्ट असावीत. माहितीची सत्यता भविष्यात पडताळून पाहता येईल अशी असावी.
  2. माहितीची समर्पकता - लेखांकीय माहिती ही समर्पक आणि आणि वास्तव असावी. उपयुक्त, महत्त्वाची, सुसंबद्ध आणि निरपेक्ष माहितीच शाश्वत असते.
  3. सुगमपणा - माहिती मुद्देसूद, स्पष्ट, संक्षिप्त आणि जशीच्या तशी असावी. अशी माहिती समजण्यास सुगम असते. अनेक प्रकारचे लोक उदा० कर अधिकारी, व्यवस्थापक, ग्राहक, भाग भांडवलदार ही माहिती वापरत असतात. क्लिष्ट किंवा अगम्य माहिती या लोकांमध्ये गोंधळ उडवू शकते.
  4. माहितीची तुलनात्माकता - व्यवसायात मागील वर्षांच्या माहितीशी तुलना करण्याची गरज वारंवार पडते त्यामुळे एकदा लेखांकित केली गेलेली माहिती आणि पद्धत वारंवार बदलली जाऊ नये. जर लेखांकानाची पद्धत आणि माहिती साचा बदलला गेला तर तुलना अशक्य होईल. उदा० घसाऱ्याची पद्धत दर वर्षी बदलली तर दर वर्षीचा घसारा किती वाढला हे ठरवता येणार नाही.

लेखांकनाचा आधार[संपादन]

लेखांकन हे व्यवसायातील व्यवहारांचे व्हायचे असते. आता असे व्यवहार कधी नोंदवायचे आणि कधी लेखांकित करायचे याला काही घटना या आधारभूत धराव्या लागतात. खालील दोन प्रकाराने लेखांकन होऊ शकते.

  1. रोख आधार - वस्तू रोखीत विकली गेली किंवा रोखीत खरेदी केली गेली तरच लेखांकन केले जाते. रोख प्राप्त होते तेव्हा उत्पन्नाची नोंद करणे आणि रोख दिली जाईल तेव्हाच खर्चाची नोंद करणे हा या लेखांकन पद्धतीचा आधार आहे. काही व्यवसायात जिथे दिलेला किंवा घेतलेला माल कधीही परत केला जाऊ शकतो तिथे रोख आधार घेऊनच लेखांकन केले जाते.
  2. उपार्जित आधार ( इंग्लिश : Accrual Basis) - रोखीने तसेच उधारीनेही झालेली विक्री आणि खरेदी व्यवहारांचे लेखांकन उपार्जित आधारावर केले जाते. या प्रकरच्या लेखांकनात धनको तसेच ऋणको यांची खातीसुद्धा नोंदावी लागतात. उधारीत व्यवहाराची नोंद करत असल्याने कुणाला किती देणे आहे किंवा येणे आहे याची नोंद ठेवावी लागते. एकूण खरेदी-विक्री आणि रोख रक्कम यांतील फरक धनको आणि ऋणको यांच्या खात्यांमध्ये परावर्तित होतो.

शाखा[संपादन]

  1. आर्थिक लेखांकन - आर्थिक घडामोडींमधून व्यवसायाला मिळणाऱ्या प्राप्तीची पद्धतशीर नोंद करून ठेवणे आणि उत्सुकता असणाऱ्या लोकांना ही माहिती उपलब्ध करून देणे हा या लेखांकीय शाखेचा उद्देश आहे. खालील पुस्ते तसेच आर्थिक पत्रके यांधून वर्षभरात घडलेल्या आर्थिक घटनांची ओळख वाचकास करून घेता येते. रोजकीर्द ( इंग्लिश : Journal), खातेवही ( इंग्लिश : Ledger), तेरीज पत्रक (इंग्लिश : Trial Balance) , अंतिम लेखे (इंग्लिश : Final Accounts), ताळेबंद (इंग्लिश : Balance sheet)
  2. परिव्यय लेखांकन ( इंग्लिश : Cost Accounting) - वस्तूच्या निर्मितीसाठी होणारा व्यय आणि त्याचा हिशोब, तसेच हा व्यय नियंत्रित करून आणि अंतिमतः कमी करून नफा वाढवण्यासाठीचे विश्लेषण यांचा समावेश या शाखेत होतो. परीव्यय लेखांकनात परीव्यय विवरण ( इंग्लिश : Cost Sheet ), धंदा आणि ठेका परिव्यय ( इंग्लिश : Job and Contract Costing ), विधा परिव्यय ( इंग्लिश : Process Costing ) , परिचालन परिव्यय ( इंग्लिश : Operating Costing ) या संकल्पनांचा अंतर्भाव होतो.
  3. प्रबंधकीय लेखांकन ( इंग्लिश : Management Accounting) - व्यवस्थापनाला, धनकोला विविध प्रकारचे निर्णय घेण्यासाठी आर्थिक माहितीचे विश्लेषण करून हवे असते. ताळेबंदात दिसणाऱ्या विविध आकड्यांचा अर्थ काय हे सांगण्याचे काम प्रबंधकीय लेखांकन सहजरीत्या करते. व्यवस्थापनाला माहिती पुरवणे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम काय झाले याची अंकीय स्वरूपात कल्पना देणे हा प्रबंधकीय लेखांकनाचा उद्देश असतो.

अनुपात विश्लेषण (इंग्लिश : Ratio Analysis), सम विच्छेदन बिंदू विश्लेषण (इंग्लिश : Break even Point) , प्रमाप परिव्यय ( इंग्लिश : Standard Costing) , वित्तीय विवरणांचे विश्लेषण ( इंग्लिश : Analysis Of Financial Statements) असे विविध प्रकार या लेखांकनात आढळतात.

लेखांचे प्रकार[संपादन]

लेखा म्हणजेच सामान्य भाषेत खात्यांचे अनेक प्रकार असतात. झालेले व्यवहार योग्य लेखांमध्ये उतरवून व्यवसायाची माहिती नोंद केली जाते. लेखांचे प्रकार खालील प्रमाणे.

  1. वैयक्तिक लेखा (इंग्लिश : Personal Account)- व्यक्ती किंवा व्यक्ती समूहासोबत झालेल्या व्यवहारांची नोंद वैयक्तिक लेखांमध्ये केली जाते. यांचे उपप्रकार खालील प्रमाणे
    1. नैसर्गिक वैयक्तिक लेखा - हे व्यक्तिगत व्यवहाराशी संबंधित लेखे आहेत. जिवंत व्यक्तीसाठी असणारे लेखा या प्रकारात मोडतात. उदा. श्री अ ब क यांचा लेखा, कुमारी क्ष या ज्ञ यांचा लेखा.
    2. कृत्रिम वैयक्तिक लेखा - कायदेशीर दृष्ट्या काही संस्था तसेच कंपन्यांना कृत्रिम कायदेशीर व्यक्तीचा दर्जा प्राप्त होतो. या संस्था तसेच व्यावसायिक प्रबंधनासाठी कृत्रिम वैयक्तिक लेखा उघडले जातात. कंपनी कायद्या अंतर्गत नोंदवल्या गेलेल्या कंपन्या, क्लब, असोसिएशन, ट्रस्ट इत्यादी.
    3. प्रातिनिधिक वैयक्तिक लेखा - हे लेखा व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाशी संबंधित प्रातिनिधिक व्यावसायिक घडामोडी नोंदवण्यासाठी वापरले जातात. उदा. वेळे आधी भरलेला विम्याचा हफ्ता. आता विमा कंपनी हे वैयक्तिक खाते आहे पण वेळे पूर्वी भरलेला हफ्ता नोंदवणे ही प्रातिनिधिक घटना असल्याने ती वैयक्तिक खात्यात नोंदवली गेली नाही.
  2. वास्तविक लेखा (इंग्लिश : Real Account)- दृश्य वस्तू किंवा व्यापारी माल या संबंधीचे व्याय्वाहर नोंदवण्यासाठी वास्तविक लेख वापरले जातात. या लेखांमधून व्यवसायातील संपत्तीचे गणन करता येते. वास्तविक लेखांचे उपप्रकार खालीलप्रमाणे
    1. मूर्त वास्तविक लेखा (इंग्लिश : Tangible Real Account) - मोजता येण्यासारख्या, स्पर्श करता येण्यासारख्या माल किंवा व्यापारी वस्तूच्या व्यवहारांच्या नोंदी साठी मूर्त वास्तविक लेख वापरले जातात.उदा. रोख लेखा, इमारत लेखा, यंत्र सामुग्री लेखा इत्यादी.
    2. अमूर्त वास्तविक लेखा (इंग्लिश : Intangible Real Account) - काही संपत्ती ही डोळ्याने दिसत नाही किंवा तिचे वस्तुमान काळात नाही अशा गोष्टींसाठी अमूर्त वास्तविक लेखा वापरले जातात. उदा. एखाद्या संशोधनाचे हक्क मिळवण्यासाठी व्यवसायाने काही खर्च केला असेल.हे हक्क डोळ्याने दिसत नाहीत पण व्यवसायाला फायदा मिळवून देऊ शकतात. पेटंट लेखा, नाममुद्रा लेखा(इंग्लिश : Brand), पुस्तक प्रकाशन हक्क लेखा इत्यादीचा समावेश अमूर्त वास्तविक लेखा म्हणून केला जातो.
  3. नामधारी लेखा (इंग्लिश : Nominal Account) - खर्च आणि नुकसान , उत्पन्न आणि फायदा यांच्या नोंदी साठी नामधारी लेख वापरले जातात. हे लेखे प्रत्यक्ष दृश्य स्थितीत दाखवता येत नाहीत तर केवळ नावाने संबोधले जातात म्हणून यांना नामधारी लेखा म्हणतात.

लेखा पुस्तकांचे प्रकार[संपादन]

व्यवसायाच्या स्वरूप प्रमाणे आणि व्यापाप्रमाणे लेखापुस्ताकांचे प्रकार बदलतात. परंतु खालील काही लेखा पुस्तके सर्व उद्योगात दिसून येतात.

प्राथमिक पुस्तके[संपादन]

मूळ रोजकीर्द ( इंग्लिश : Journal Proper )

विशेष रोजकीर्द ( इंग्लिश : Special Journal )

१) खरेदी पुस्तक

२) विक्री पुस्तक

३) खरेदी परत पुस्तक

४) विक्री परत पुस्तक

५) रोख पुस्तक

६) प्राप्य विपत्र पुस्तक ( इंग्लिश : Receivable Journal )

७) देय विपत्र पुस्तक ( इंग्लिश : Payable Journal )

अंतिम नोंदीची पुस्तके[संपादन]

१) खातेवही ( इंग्लिश : Ledger )

इतर माहिती[संपादन]

आंतरराष्ट्रीय लेखांकन दिन[संपादन]

दर वर्षी १० नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लेखांकन दिवस म्हणून साजरा केला जातो. द्विनोंदी लेखांकन पद्धतीची सूत्रे ठरवणारे लुका डी पासिओली या लेखकाच्या 'समा दि अरीथमॅटीका' या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त (१० नोव्हेंबर १४९४ ) हा दिवस लेखांकन दिन म्हणून पाळला जातो.

लॅटीन भाषेचा प्रभाव[संपादन]

लेखान्कनात वापरले जाणारे अनेक शब्द मूलतः लॅटीन भाषेतून आले आहेत. नावे या साठी वापरला जाणारा 'डेबिट' या शब्दाचा लॅटीन भाषेतील अर्थ 'तो देणे लागतो' असा होतो तर जमा साठी वापरला जाणारा 'क्रेडीट' हा शब्द म्हणजे 'त्याचा विश्वास आहे' तर 'अकौंटंट' म्हणजे मोजणारा.

प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

लेखांकन शिकलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तीमध्ये रोलिंग स्टोन या समुहाचे गायक मिक जॅगर, जॅनेट जॅक्सन, कादंबरी लेखक जॉन ग्रिशम यांचा समवेश होतो.[१] .

बबलगमचा संशोधक एक लेखापाल[संपादन]

वॉल्टर डीमर या लेखापालाने बबलगमचा शोध १९२८ मध्ये लावला. वाल्टर ने आपल्या नावावर एकस्व अधिकार घेतला नसला तरी चावण्यायोग्य बबलगमचे श्रेय वॉल्टर डीमर याला दिले जाते. [२]

लेखापालांचा प्रतिपालक संत[संपादन]

ख्रिस्ती धर्मातील समजुतीनुसार प्रभू येशूच्या प्रमुख बारा शिष्यातील एक , संत मत्तय हा लेखापाल, पुस्तलेखक , कर संकलक आणि सरकारी अधिकाऱ्यांचा प्रतिपालक संत मानला जातो. प्रभू येशूचा शिष्य होण्यापूर्वी संत मत्तय हा कॅपरनम या शहरात कर संकलक अधिकारी म्हणून कार्यरत होता.

हॉलीवूड मध्ये लेखांकन[संपादन]

खालील हॉलीवूड चित्रपटांमध्ये लेखापाल ही महत्त्वाची व्यक्तिरेखा दर्शवली आहे.

क्रमांक चित्रपट व्यक्तिरेखा अभिनेता
शिंडलर्स लिस्ट यित्झाक स्टर्न बेन किंग्सले
शॉशँक रिडेम्प्शन ॲन्डी ड्युफ्रेन टीम रॉबिन्स
द अनटचेबल्स ऑस्कर वॅलेस चार्ल्स मार्टिन स्मिथ
द अपार्टमेंट बड बॅक्सटर जॅक लेमॉन
द अकौंटंट ख्रिस्तियन वोल्फ बेन ॲफ्लेक





  1. ^ https://www.icas.com/education-and-qualifications/they-were-once-accountants-student-blog[permanent dead link]
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2018-01-28. 2018-03-12 रोजी पाहिले.