डुकरकंद, मटाळू किंवा करांदा ( शास्त्रीय नाव:Dioscorea bulbifera ) ही आशिया तसेच आफ्रिका खंडात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदीक औषधी/भाजी आहे. वेलीवर येणाऱ्या वरच्या कंदासोबत या वेलीचा जमिनीत पण मोठा कंद असतो ज्याला सर्व बाजूंनी बारीक मुळे असतात. हे दोन्ही कंद सोलून उकडून खाल्ले जातात. तसेच त्याची बटाट्यासारखी कोरडी भाजी पण बनवतात. डुकरकंद उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय जंगलामध्ये एक हजार मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये उगवते. संस्कृतमध्ये याला वराह कंद किंवा वराहि असेही म्हणतात. याची लागवड मुख्यकरून प्रकलिका(bulbils) किंवा धनाकंदाद्वारे(corm) केली जाते.
या वेलाची फुलेही फांदीच्या काखेत किंवा बगलेत गुच्छाच्या स्वरूपात उगवतात व त्यांचा रंग पांढरट असून आकाराने ती लहान असतात.फळे लहान गोलाकार असून यांची बीजे पंखयुक्त असतात. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा लैंगिक वासना उद्दीपित करणारे औषध म्हणून मुख्य उपयोग केला जातो. तसेच खवखवणारा घसा, मुळव्याध , अतिसार यावरही त्याचा उपयोग केला जातो. शरीरावर आलेल्या गाठींवर देखील ते प्रभावी ठरते.