Jump to content

जीभ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मानवी जीभ

जीभ हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला लालसर गुलाबी रंगाचा एक अवयव आहे. जीभ ही ५ ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे. हा अवयव पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असतो. बहुतेक सर्व पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये जीभ अन्न गिळण्यासाठी, चवीच्या जाणीवेसाठी मदत करते. जीभ, दात, ओठ, कंठ, टाळू व घसा यांच्या साहाय्याने मनुष्य निरनिराळे आवाज (ध्वनी) काढू शकतो. मानवी जिभेची सरासरी लांबी सुमारे १० सें.मी. असते. रोगनिदान करण्यासाठी जिभेचा रंग , स्वरूप आणि ओलसरपणा याबाबी लक्षात घेण्यात येतात.

संरचना[संपादन]

जीभ कंकाल/ ऐच्छिक स्नायूनी बनलेली असते. त्यामुळे तिचे इच्छेनुसार नियंत्रण करणे सोपे जाते. जिभेचे स्नायू तीन वेगवेगळ्या प्रतलामध्ये रचलेले असतात. जिभेचे स्नायू कंठिका अस्थि खालचा जबडा आणि शंख अस्थिपासून उगम पावलेले आहेत. या स्नायूमुळे जीभ वेगवेगळ्या दिशेने वळवता येते. जिभेचे टोक शरीराच्या इतर भागापेक्षा अधिक स्पर्शसंवेदी असते. जिभेवर श्लेषमल पटलाचे आवरण असते. तिच्या वरील पृष्ठ्भागावर गोल , शंकूच्या आकाराचे अंकुरक असतात. हे अंकुरक संख्येने अधिक असल्याने जीभ खरखरीत भासते. या अंकुरकात चार प्रकारच्या रुचि कलिका असतात ज्याद्वारे गोड, आंबट, खारट, आणि कडू पदार्थांची चव समजते. जिभेच्या खालचा भाग मऊ असून त्या भागातेल अंतःत्वचा पातळ असते. या त्वचेखाली रक्तवाहिन्यांचे जाळे असते. हृदयविकारात रुग्णाच्या छातीमध्ये दुखायला लागल्यावर सॉर्बिट्रेट्ची गोळी जिभेखाली ठेवल्यास काहीं सेकंदात रक्तप्रवाहात मिसळून परिणामकारक ठरते.[ संदर्भ हवा ] जिभेला त्रिशाखी आननी आणि जिव्हाग्रसनी या तीन कर्परचेतामिळालेल्या असतात. या चेतांमार्फत जिभेचे नियमन होते.

उपयोग[संपादन]

मानवी जीभेवरील चवीनुसार भाग १ कडू, २ आंबट, ३ खारट, ४ गोड

जिभेद्वारे अन्न तोंडात फिरवून दाताखाली आणले जाते आणि अन्नाचे गोळ्यात रूपांतर केले जाते. दातामध्ये , गालफडामध्ये साचलेले अन्न जिभेने काढून तोंड स्वच्छ ठेवले जाते. जिभेमुळे अन्न घशात ढकलले जाते. अन्न गिळताना जीभ टाळूवर दाबली जाते आणि आतील बाजूना पसरते. परिणामी तोंडातील अन्न बाहेर न पडता घशाकडे सरकवले जाते. अन्य सस्तन प्राण्यापैकी कुत्रा, मांजर, जिभेने अंग साफ करतात. त्यामूळे अंगावरील तेल आणि परजीवी दूर होतात. कुत्र्याची जीभ त्याच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी उपयोगी पडते. सरडगुहि (शॅमेलिऑन), बेडूक, खवल्या मांजर इत्यादी प्राणी जिभेने अन्न तोंडात घेतात. साप जीभ बाहेर काढून भक्ष्याचे गंधकण गोळा करतो. गंधकणांच्या ज्ञानावरून त्याला भक्ष्य पकडणे सोपे जाते. सुतार पक्ष्याची जीभ अतिशय संवेदी असते. जिभेच्या सहाय्याने तो झाडाच्या सालीखालील कीटक गोळा करतो. व्हेल, आणि मुशी यासारख्या काहीं प्राण्यांची जीभ अचल असते. जिभेवर ठरावीक ठिकाणी विशिष्ट चवीची जाणीव होते असे एकेकाळी समजले जात होते. प्रत्यक्षात जीभेवर असलेल्या रुचिकलिकामध्ये सर्व चवी ओळखल्या जातात[ संदर्भ हवा ]. पदार्थ पाण्यामध्येविद्राव्य असल्यास चव लगेच समजते.