जयेंद्र सरस्वती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयेंद्र सरस्वती (जन्म : १८ जुलै १९३५; - २८ फेब्रुवारी २०१८) [१]

जयेंद्र सरस्वती यांचे मूळ नाव महादेव सुब्रमण्यम होते. शंकराचार्य झाल्यानंतर ते जयेंद्र सरस्वती झाले. वेदांवर त्यांचे प्रभुत्व होते.[ संदर्भ हवा ] (वेदांचा अभ्यास असल्याखेरीज शंकराचार्य होताच येत नाही!)

हे कांचीपुरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. १९५४ मध्ये ते चंद्रशेखरेन्द्र सरस्वती यांच्यानंतर शंकराचार्य बनले.

कांचीपुरम वरदराज पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकरारमन यांनी मठातील गैरव्यवहार आणि गुन्हेगारी कारवायांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे शंकररामन यांची हत्या जयेंद्र सरस्वती यांनी केल्याचा आरोप केला गेला होता. शंकररामन यांनी अनेक पत्रे कांची कामकोटी मठाला आणि हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संस्था विभागाला पाठवून मठातील गैरव्यवहार समोर आणायचा प्रयत्न केला होता. त्यांनी लिहिलेल्या शेवटच्या पत्रात मठाविरुद्ध न्यायालयात जाण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तीन दिवसांनी शंकररामन यांची हत्या करण्यात आली. पुरावे आणि साक्षीदारांचा तपास घेत शंकराचार्यांना अटक केली.[२] शंकाराचार्य दोन महिने कारावासात होते.[३]

जयेंद्र सरस्वती हे २०११ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'तृतीय संघ शिक्षा वर्गा'ला उपस्थित होते.

कांचीपुरम कामकोटी धर्मपीठ[संपादन]

आदि शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या चार पीठांमधील कांची कामकोटी हे पीठ नाही. त्या अर्थाने इतर शंकराचार्य कांची कामकोटी पीठाला बरोबरीचे स्थान देत नाहीत. पण या पीठालाही शेकडो वर्षांची परंपरा आहे. जयेंद्र सरस्वती यांचे गुरू चंद्रशेखरेन्द्र सरस्वती हे अनेक शास्त्रांचे गाढे अभ्यासक होते. त्यांचा विविध तत्त्वज्ञानांचा सखोल अभ्यास होता. तसेच, ते जन्मभर चालत भारतभ्रमण करीत राहिले. त्यांच्या या क्रियाशील पुढाकाराने कांची कामकोटी पीठाला भारतात आदराचे स्थान प्राप्त झाले.[ संदर्भ हवा ]

समाजकार्य[संपादन]

कांची कामकोटी पीठाचे परमाचार्य जयेंद्र सरस्वती हे आधुनिक काळात धर्माला समाजाभिमुख बनविणाऱ्या तसेच सेवाकार्यांचा प्रचंड पसारा उभा करणारे एक द्रष्टे पुरुष होते. या पीठाचे शंकराचार्य हे स्थान जयेंद्र यांनी अनेक बाबतीत पुढाकार घेऊन उंचावले. केवळ तामिळनाडूतच नव्हे तर देशभरात अनेक ठिकाणी विविध सेवाकार्ये चालू करण्यात जयेंद्र यांचे मोठे योगदान होते. कांची कामकोटी पीठातर्फे सर्व जातींतील वधू-वरांचा सामूहिक विवाह लावून द्यायचा आणि त्यावेळी वधूची सोन्याची सौभाग्यलेणी मठाने द्यायची, हा उपक्रम तर कमालीचा यशस्वी झाला. तो एकतर जातिभेदाच्या विरोधात होता आणि दुसरीकडे मुलीच्या पालकांना सोन्यासाठी त्रास देऊ नका, असे सांगणारा होता. जयेंद्रांनी शिक्षण संस्थांचे जे विस्तृत जाळे उभारले, त्यात हजारो गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात आले. आजही मिळत आहे. आदि शंकराचार्यांची परंपरा म्हणजे 'ब्राह्मणी' परंपरा नाही. ती साऱ्या हिंदूंची परंपरा आहे, हे कायावाचामने आणि कृतीने अधोरेखित करण्याचा प्रयत्न जयेंद्रांनी जन्मभर केला. त्यासाठी सनातन्यांच्या शिव्याही खाल्ल्या. आदिवासी, अनुसूचित जाती, भटके यांच्या लोकधर्मपरंपरांचा आदर करून त्यांनाही मुख्य समाजप्रवाहात स्थान हवे, यावर त्यांचा कटाक्ष होता. जयेंद्रांमुळेच परंपरेने आलेले सोवळेओवळे आणि भेदाभेद गळून पडले.[ संदर्भ हवा ]

आज तामिळनाडूत अनेक देवस्थानांमध्ये सर्वजातीय पुजारी दिसतात, यामागेही जयेंद्र सरस्वतींची प्रेरणा होती. आध्यात्मिक प्रेरणा आणि सामाजिक दृष्टी यांचे स्वामी विवेकानंदांनी जोडलेले नाते विसाव्या शतकात ज्या पारमार्थिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींनी पुढे नेले त्यात जयेंद्र सरस्वती यांचे नाव महत्त्वाचे होते. आपल्या मनासारखे काम करता आले नाही की, जयेंद्र सरस्वती कोपत. त्यांच्यावरचा खुनाच्या कटातील समावेशाचा आरोप खरा होता की, एक राजकीय डाव होता, यावर चर्चा होत राहील. पण त्यांनी धर्माला समाजासमोर नेऊन उभे केले.[ संदर्भ हवा ]


(अपूर्ण)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "कोण होते शंकराचार्य जयेंद्र सरस्वती? -Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-02-28. 2018-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "BEHIND THE ARREST". www.frontline.in. 2018-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Sankaracharya acquitted: 'Who killed my father', asks temple manager's son". NDTV.com. 2018-04-06 रोजी पाहिले.