जंगल सत्याग्रह
चिरनेर हे रायगड जिल्ह्यतील उरण तालुक्यातले एक गाव आहे. हा , आगरी,कोळी,आदिवासी शेतकरी, कातकरी, कष्टकऱ्यांचा परिसर आहे. या परिसरात पारंपरिक शेती चालत असते. २५ सप्टेंबर १९३० रोजी इंग्रज राजवटीत इंग्रजांनी चिरनेर परिसरातील चिरनेरसह, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे आदी गावातील हक्काच्या जंगलावरील लाकडे तोडण्यास गावकऱ्यांस विरोध केल्याने गावांतील शेतकरी, कातकरी वर्गाने काठ्या, कोयते, कुऱ्हाड, विळा इत्यादी लाकडी, लोखंडी अवजारे हातात घेऊन इंग्रजांचा जंगल कायदा तोडून सत्याग्रह केला. ह्यासाठी लोक घरांतून रस्त्यावर आले होते. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, त्या चळवळीला पाठिंबा देत उरणमधील शेतकऱ्यांनीही आपल्या जिवाची पर्वा न करता सत्याग्रह करून इंग्रजांप्रती आपला रोष व्यक्त केला होता.
यावेळी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारामुळे व मारहाणीमुळे अनेक जण अपंग झाले तर ह्या गोळीबाराला विरोध करणारे मामलेदार केशव महादेव जोशी ह्यांनाही पोलिसांनी गोळ्या घालून मारले त्याशिवाय महादू कातकरी (चिरनेर, अक्कादेवी वाडी), धाकू गवत्या फोफेरकर, रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या वीरपुरुषांना जीव गमवावा लागला, आणि ते हुतात्मे झाले.
२५ सप्टेंबर१९३० रोजी हा जंगल सत्याग्रह झाला, या सत्याग्रहाला चिरनेरचा जंगल सत्याग्रह म्हणतात.