Jump to content

चित्तोडगढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चितोडगड या पानावरून पुनर्निर्देशित)

चित्तोडगढ भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपूरजवळचे एक शहर आहे.

हे शहर चित्तोडगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

येथे जवळच चित्तोडगड नावाचाच किल्ला आहे. संत मीराबाईपासून राणी पद्मिनीपर्यंत अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तिंचे स्थान असलेला हा रम्य किल्ला अतिषय प्रेक्षणीय आहे. चित्तोडगढ भोवती सात मोठे दरवाजे असलेली प्रचंड भिंत आहे.

बाप्पा रावल ने हा गढ जिंकण्यापूर्वी तो मोरी घराण्याकडे होता. इ.स. ७३४मध्ये बाप्पा रावल ने हा गड जिंकला आणि मेवाडचे राज्य स्थापन केले.त्याने चित्तोडला आपली राजधानी बनवली. एक धारणा अशीही आहे, की बाप्पा रावलने शेवटच्या सोळंकी राजकन्येशी लग्न केले,तेव्हा हुंड्यामध्ये हा गड मिळाला. येथून अजमेर पासून गुजरात पर्यंत मेवाडचे राज्य पसरले. १६ व्या शतकापर्यंत चित्तोडगढ हे बलाढ्य राज्य होते. हा गढ़ जिंकण्यासाठी बरीच मोठमोठी युद्धे झाली. साधारण ८३४ वर्षे ही मेवाडची राजधानी होती

हा गड जिंकण्यासाठी मोगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या, पण प्रत्येकवेळी राजपुतांनी या परतवून लावल्या. तीन वेळा राजपुतांची हार झाली, त्या त्या वेळी राजपूत स्त्रियांनी मोठ्या संख्येने जोहर (अग्निसमर्पण) केला.

इ.स. १३०३ साली दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने हा गड काबीज केला. पुढे १३२६ साली गहलोत घराण्याच्या हमीर सिंगने तो परत मिळवला.

राणा कुंभा (१४३३-१४६८) या हुशार, संगीतकार, कवी राजपूत राजाने मेवाडच्या सैन्याची पुनर्बांधणी केली. त्याचवेळी त्याने ३० किल्ल्यांची शृंखला तयार करून मेवाडचे राज्य बळकट केले.

१६ व्या शतकात मेवाड एक प्रसिद्ध रजपूत राज्य बनले. पुढे राजपूत राजा राणा सांगा ने मुघल सुलतान बाबरच्या विरोधात सर्व रजपुतांना एकजूट केले. रजपूत आणि मोघल यांच्यातील घनघोर युद्धात सांगाचा दारुण पराभव झाला. तेव्हा गडावरील रजपूत राणी कर्णावती हिने इतर स्त्रियांसोबत जौहार केला. हा दुसरा जौहार होता.