Jump to content

चर्चा:चायना एरलाइन्स

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठीत दीर्घ ए असायची गरज नाही. Airlines हा शब्द मराठी 'एअर लाइन्स' अशा दोन शब्दांत लिहिला जातो. air, spare, bear, store, door, boar, near, there या शब्दांचे मराठी लिखाण अनुक्रमे एअर, स्पेअर, बेअर, स्टोअर, डोअर, बोअर, निअर आणि देअर असे केले जाते. आणि मराठीत दीर्घ ए आणि दीर्घ ओ नाहीत असे नाही. उदा० Gate, Caught या शब्दांचे उच्चार मराठीत अनुक्रमे गेऽट् आणि कॉऽट् असे लिहून दाखवता येतात. कानडी माणसांचे मराठी उच्चार लिहिताना दीर्घतर ई, ए आणि ओ वापरावेच लागतात. आणि शिवाय साऽ रेऽ गऽ मऽ....नीऽ, साऽ आहेच.

स्टोअर शब्द पंजाबी-बिहारी भाषांत कसे लिहितात ते नक्की माहीत नाही पण त्यांचे उच्चार अनुक्रमे इस्टोऽरऽ आणि सटोऽर असे होतात. कोणत्याही भाषेचे उच्चार दर बारा कोसांवर बदलतात अशी मराठी म्हण आहे. तिला इंग्रजी अपवाद नाही. हिंदीतली समांतर म्हण : चार कोस पे पानी बदले, आठ कोस पे बानी !

आणखी एक निरीक्षण : " Concrete" या नामाचे वेगवेगळ्या कोशांत भिन्न-भिन्न उच्चार मिळाले. Con चे कन्, कङ्, कंक्, कंग् कॉन्, कॉङ्, काँक् आणि काँग् असे आठ उच्चार सापडले. शिवाय accent mark च्या स्थानावरून आणखीही उच्चार झालेले आढळले. पण या दहा बारा उच्चारांतल्या कोणत्याही उच्चारात क्री र्‍हस्व मिळाली नाही. (कोणत्यातरी कोशात सापडेलही, पण मला सापडली नाही.) असे असता काँ'क्री'ट हे पान पुनर्निर्देशित करून ते काँ'क्रि'टकडे नेण्याचे प्रयोजन समजले नाही.

air, spare, bear, store, door, boar, near, there या शब्दांचे मराठी लिखाण अनुक्रमे एअर, स्पेअर, बेअर, स्टोअर, डोअर, बोअर, निअर आणि देअर असे केले जाते.
air, spare, bear, store, door, there आणि near यांच्यात मूलभूत फरक आहेत. त्यांना एकात तराजूत तोलू नये.
bear, bare, baire आणि ber यांच्या मराठी उच्चारातील फरक दाखवावा म्हणजे कदाचित तुमचे म्हणणे मला नीट समजेल.
उदा० Gate, Caught या शब्दांचे उच्चार मराठीत अनुक्रमे गेऽट् आणि कॉऽट् असे लिहून दाखवता येतात
दाखवता येतात पण जातात का? ऽ हे संस्कृतमध्ये सर्रास वापरले जाते पण प्रमाण मराठीत हे ग्राह्य आहे कि नाही याबद्दल मला माहिती नाही.
gate आणि gait मधील उच्चारफरक कसा दाखवणार? cot आणि caught किंवा wrought, rot? देवनागरीत अनेक भाषांतील उच्चारफरक सहीसही उठवता येत नाहीत. त्यासाठी नसलेले वर्ण शब्दांमध्ये घुसडवण्यापेक्षा वाचकाला contextवरून त्याचा अर्थ लावू देणे बरे.
माझ्या मते काँक्रीट हा उच्चार बरोबर आहे परंतु काँक्रिट पंप हा लेख नरसीकरांनी तयार केला. ते या विषयातील तज्ज्ञ असल्याने मी त्यांच्या लिखाणास काट दिला नाही पण लेखनभेद असलेल्या काँक्रीट पंप पासून पुनर्निर्देशन केले.
अभय नातू १६:३७, २८ सप्टेंबर २०११ (UTC)

Cot आणि Caught हे शब्द इंग्रजी-मराठी शब्दकोशांत कॉट् आणि कॉऽट् असे लिहून दाखवले जातात. शब्दकोशाच्या बाहेर लिहून दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. मराठीत शब्दाच्या अंती येणार्‍या अक्षराचा पाय मोडता येत नाही, आणि तशी गरजही नसते, त्यामुळे हे शब्द अगदी आवश्यकच असेल तर, कॉट असे लिहितात. Wrought आणि Rot यांच्या उच्चारांत फरक नसल्याने दोन्ही रॉट् असेच दाखवावे लागतात. Bear आणि Bare दोघांचे उच्चार बेअर आणि Berचा बेर. Baire हा शब्द शब्दकोशात मिळाला नाही. Gait हा शब्द हिंदीत गेइट असा लिहितात, मराठीत Gate आणि Gait दोन्ही गेट असे(शब्दकोशात मात्र गेऽट्.) सापडतील. मराठीत अवग्रह आणि हलन्त चिन्हे वापरायची प्रथा नाही. गवत हा शब्द गवऽत् असा न लिहिताही तसा उच्चारला जातो. चमचा लिहिले तरी त्याचा उच्चार च्यमच्या असा न होता च़मचा़ असा होतो. पण एरलाइन्स लिहिले की उच्चार एअर लाइन्स होणार नाही, ना काँक्रिट लिहिले की काँक्रीट.

इंग्रजी शब्दांचे उच्चार देशांदेशांत बदलतात. Poorचा मद्रासी उच्चार पूर, तर मराठी पुअर. Withdrawaचा तामीळ उच्चार विदड्-ड्राअल तर मराठीत विद्-ड्रॉवल. Sureचा हिंदी उच्चार स्योर, तर मराठी शुअर. हा मराठी विकिपीडिया आहे, त्यामुळे या संस्थळावर एअर लाइन्स, काँक्रीट असले मराठी उच्चार आणि मराठी लिखाणच पाहिजे.

मराठीत एकाक्षरी शब्द दीर्घ असतात. त्यामुळे इंग्रजी मुळाक्षरे बी, सी, डी, यू वगैरेतले इकार-उकार दीर्घ लिहिले जातात. (अपवाद, लघुरूपांत येणार्‍या आद्याक्षरांचा. उदा० चि.=चिरंजीव, वि.वि.=विनंती विशेष, यु.स्टे.= युनायटेड स्टेट्स, वगैरे. पण म्हणून यू.एस. ओपन स्पर्धा हे यु.एस. असे लिहिता येणार नाही. येथे यू हे इंग्रजी मुळाक्षर आहे, लघुरूप नाही. गूगलवर शोधले असतां यु.एस्.ची ६४६० पाने मिळाली(त्यांतली बहुतेक खासगी ब्लॉग्जची, थोडी मराठी विकिपीडियाची आणि एक-दोन महाराष्ट्र टाइम्सची---महाराष्ट्र टाइम्स अशुद्धलेखनाने बुजबुजलेला असतो हे सर्वांना विदितच असावे.). यू.एस्.ची पाने तब्बल २२,१००. असे असताना यू.एस. ओपन स्पर्धा हे पान यु.एस. ओपनकडे का वळवले, समजले नाही....J १८:१०, २८ सप्टेंबर २०११ (UTC)

शब्दकोशांत कॉट् आणि कॉऽट् असे लिहून दाखवले जातात
आणि विक्शनरीवर ते तसेच लिहिले जावेत. व्यावहारिक भाषेत कसे लिहिले जाते?
पण एरलाइन्स लिहिले की उच्चार एअर लाइन्स होणार नाही
पण एअर चा उच्चार ए-अ-र असाही होईल? आणि म्हणूनच माझा मुद्दा की एर आणि ए-अ-र अशा उच्चारांच्या मधील स्वर (ऽ न वापरता) मराठी/देवनागरीत नाही. तरी नसलेले स्वर का घुसवा? कानडीमध्ये दीर्घ ए आणि दीर्घ ओ असल्याने त्यांना हा प्रश्न पडत नाही. मराठी/देवनागरीतही अशी सोय हवी (किंवा ऽ ला प्रमाण बाराखडीत...तेराखडीत? घातले जावे).
Wrought आणि Rot यांच्या उच्चारांत फरक नसल्याने
चूक. rotचा उच्चार करताना र स्पष्ट असतो. wroughtचा उच्चार करताना ओठांचा किंचित चंबू होतो. right आणि wrightमध्येही तेच.
Bear आणि Bare दोघांचे उच्चार बेअर....Gate आणि Gait दोन्ही गेट असे...
पण दोन्हीच्या उच्चारात नक्कीच फरक आहे. आणि get पण गेटच?
इंग्लिश शब्दांचे तमिळ लोक काय उच्चार करतात याच्याशी मराठीचे काय घेणेदेणे?
असले मराठी उच्चार आणि मराठी लिखाणच पाहिजे
मराठी शब्दांचे आणि मराठीकरण झालेल्या शब्दांचे उच्चार आणि लिखाण मराठीच झाले पाहिजे यात वाद नाही. पण परभाषेतील शब्दांना नको तेथे ठोकाठोक करुन मराठी बनविण्यात काय हशील? विशेषतः अशी ठोकाठोक करताना मूळ भाषेतील अर्थच्छटांचा र्‍हास होत असेल तर असे न करणे हाच सुज्ञपणा.
यु.एस. ओपन मधील यु. हे मूळाक्षर नसून युनायटेड स्टेट्स ओपन या शब्दाचे लघुरुपच आहे आणि म्हणून यु.एस. ओपन हेच बरोबर नाही का?
महाराष्ट्र टाइम्स अशुद्धलेखनाने बुजबुजलेला असतो हे सर्वांना विदितच असावे.
+१. इतर लेखनमाध्यमे आणि विशेषतः दूरचित्रवाणी सुद्धा हे दिवे लावण्यात मागे नाहीच.
अभय नातू १८:२०, २८ सप्टेंबर २०११ (UTC)
ता.क. यु.एस. ओपन मधील यु.चा तुमचा मुद्दा मला (थोडासा उशीरा) कळला. म्हणताना यु.एस. ओपन असेच म्हणल्यामुळे गल्लत झाली.
अभय नातू १९:०३, २८ सप्टेंबर २०११ (UTC)

उत्तरे

[संपादन]

>>पण एअर चा उच्चार ए-अ-र असाही होईल? << नाही होणार. संस्कृतमधून न आलेल्या मराठी शब्दांतला अन्त्य अकार नेहमी हलन्त उच्चारला जातो. म्हणूनच गवत चा उच्चार ग-व-त असा न होता गवऽत् असा होतो. एअर चा उच्चार एकर किंवा भाकर यांच्याप्रमाणे एऽअर् असा होईल, आणि तो मूळ उच्चाराशी सर्वात जवळचा असेल.

>>शब्दकोशांत कॉट् आणि कॉऽट् असे लिहून दाखवले जातात आणि विक्शनरीवर ते तसेच लिहिले जावेत.<< नक्की, काही हरकत नसावी. >> ते व्यावहारिक भाषेत कसे लिहिले जाते?<< हलनत आणि अवग्रह लिहायची पद्धत व्यावहारिक भाषेत नसल्याने दोन्ही शब्द कॉट असेच लिहिले जातात. संदर्भाप्रमाणे वाचकाने वेगळे उच्चार करणे अपेक्षित असते.

>>wroughtचा उच्चार करताना ओठांचा किंचित चंबू होतो. right आणि wrightमध्येही तेच.<< अगदी कबूल. हे उच्चार मराठीत लिहून दाखवताना व्रॉट आणि व्राइट असे लिहावे लागतील, जे मुळापासून फारच दूर जातात. म्हणून नाईलाजाने रॉट आणि राइट असे लिहिणे भाग आहे.

>>Gate आणि Gait दोन्ही गेट असे... >>पण दोन्हीच्या उच्चारात नक्कीच फरक आहे. आणि get पण गेटच?<< काय करणार? दुसरा मार्ग नाही. गेइट लिहिला तर मराठीत उपान्य इकार दीर्घ उच्चारले जातात, म्हणून लोक गे-ई-ट करतील, त्यापेक्षा गेट लिहिण्यात किरकोळ गलती आहे. Better to make error on safer side. इंग्रजांनी भारतीय विशेष नामांचे स्पेलिंग करताना हेच केले.

>>यु.एस. ओपन मधील यु. हे मूळाक्षर नसून युनायटेड स्टेट्स ओपन या शब्दाचे लघुरुपच आहे<< नाही. लघुरूप यु.स्टे. होईल, हे मी वर लिहिलेच आहे. यास्तव, यू हे मुळाक्षरच आहे. बी.बी.सी. मधली तिन्ही मुळाक्षरे आहेत. लघुरूप ब्रि.ब्रॉ.कॉ. होईल. लघुरूपात 'ब्रि' हे र्‍हस्व अक्षर लिहिता येईल; म्हणजे लिहावेच लागेल.

>>इतर लेखनमाध्यमे आणि विशेषतः दूरचित्रवाणी सुद्धा हे दिवे लावण्यात मागे नाहीच.<< शंभर टक्के सहमत. दूरचित्रवाणीच्या पडद्यावरून धावणार्‍या चलपट्ट्यांतील एकतरी पट्टी शुद्ध मराठीत आहे असे कळवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा, अशी स्पर्धा ठेवायला हरकत नाही. संस्थळांपैकी हिंदी-मराठी विकी, मनोगत आणि उपक्रम याला अपवाद आहेत. इथले लिखाण वाचणे नक्कीच सुसह्य असते. मायबोली आणि मिसळपाव यांतलेही शुद्धलेखन आता बरेच चांगले झाले आहे.

>>:ता.क. यु.एस. ओपन मधील यु.चा तुमचा मुद्दा मला (थोडासा उशीरा) कळला. म्हणताना यु.एस. ओपन असेच म्हणल्यामुळे गल्लत झाली>> वाचून बरे वाटले, धन्यवाद....J ०६:५६, २९ सप्टेंबर २०११ (UTC)