चंदन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंदनाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र

चंदन (इंग्लिश: Santalum album, सांटालम आल्बम ; इंग्लिश: Indian sandalwood, इंडियन सॅंडलवूड ;) हा छोट्या आकारमानाचा उष्ण कटिबंधीय वृक्ष आहे. याचे खोड सुगंधी आणि थंड असते. मूलतः भारतीय उपखंडातून उद्भवलेला हा वृक्ष आता भारतीय उपखंड, चीन, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपिन्स व वायव्य ऑस्ट्रेलिया या प्रदेशांत याची लागवड केली जाते. हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या काहीशा नाजूक, खाली झुकलेल्या असतात.

भारतातील आढळ[संपादन]

कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो.

याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकारमानाची लाकडे आता आढळत नसल्यामुळे फर्निचरांसाठीच्या लाकूडकामासाठी याचा वापर संपला असला, तरीही सुवासिक तैलार्कासाठी याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते.

झाडाचे वर्णन[संपादन]

चंदनाचा वृक्ष सुमारे १५ ते २० मीटर उंच वाढतो. पाने समोरासमोर, लांबट, पातळ व टोकदार असतात. चंदनाच्या फांद्यांना लहान आणि गंधहीन फुलांचे गुच्छ येतात. चंदनाचे खोड कठीण व तेलयुक्त असते. खोडाचा आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. चंदनाचे झाड जसे वाढत जाते तसे त्यातील सुगंधित तेलाचा अंशही वाढत जातो.

आगीपासून आणि कीटकांपासून धोका[संपादन]

चंदनाच्या वृक्षाला आग लगेच लागते. त्यामुळे वणव्यात ही झाडे पटकन पेट घेतात. चंदनाला सर्वात जास्त नुकसानकारक असा ‘कणिश' (स्पाइक) रोग होतो. या रोगाशिवाय अमरवेलीमुळे झाडाचे नुकसान होते, तर काही चंदनाच्या झाडांचे कीटकांमुळे नुकसान होते.

चंदनाचे पराबलंबित्व[संपादन]

झाडे जवळजवळ लावली तर नीट वाढत नाहीत असा एक सर्वसाधारण समज आहे. याला अपवाद आहे चंदनाचे झाड. चंदन नेहमी मोठय़ा वृक्षांच्या जवळच जोमाने वाढते. त्याला कारण आहे त्याचे अंशिक परावलंबित्व. चंदन हा अर्धपरोपजीवी वृक्ष समजला जातो. कारण हा वृक्ष स्वतःचे अन्न पूर्णपणे तयार करू शकत नाही. हा वृक्ष दुसऱ्या वनस्पतींच्या मुळांतून आपल्या मुळांच्या साहाय्याने अन्नशोषण करतो.

वापर[संपादन]

चंदन उगाळून याचा लेप शरीराला लावण्याची पद्धत आहे. याचा वापर औषध म्हणूनही करतात. माणसांना व देवाच्या मूर्तीला चंदनाच्या खोडाचा तुकडा उगाळून बनलेले गंध लावतात.

चंदनाची पाने
चंदन वृक्षाच्या बिया

चंदनाचे चारोळीसारखी असणारे फळ पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. चंदनाच्या बियांपासून लवकर सुकणारे कोरडे तेल (ड्रॉइंग ऑईल) मिळते. हे तेल इन्सुलेशन टेप व वॉर्निश बनविण्यासाठी वापरले जाते. त्याची पेंड जनावरांचे खाद्य व खत बनविण्यासाठी व अगरबत्तीला लागणारा लगदा म्हणून वापरतात. खोड आणि बियांप्रमाणेच चंदनाच्या मुळांमध्येही तेलाचा अंश असतो. चंदनाच्या तेलात असणाऱ्या सॅटॅलॉल या रसायनामुळे त्याला सुगंध आणि औषधी गुणधर्म प्राप्त होतात.

श्‍वेतचंदन[संपादन]

श्‍वेतचंदन चंदनाचाच उपप्रकार असून याचा वापर आयुर्वेदिक औषधे तयार करण्यात होतो.

रक्तचंदन बियाणे फोटो[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत