गो.ना. दातार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गो.ना. दातार तथा गोविंद नारायण दातारशास्त्री (इ.स. १८७३ - इ.स. १९४१) हे एक मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या सुरुवातीच्या मनोरंजक किंवा बोधपर कादंबऱ्या या आंग्ल कादंबरीकार रेनॉल्ड्स याच्या कादंबऱ्यांची रूपांतरे होती. चतुर माधवराव या कादंबरीपासून दातारांनी स्वतंत्र कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली.

कौटुंबिक माहिती[संपादन]

दातारांचे घराणे हे पडेल गावातून निघून राजापूरजवळच्या धोपेश्वर गावात कूळ म्हणून स्थायिक झाले होते. त्यांचे आजोबा प्रथम पडेल येथे रहात. गो.ना. दातारांच्या पत्नीचे माहेरचे कुटुंब पोंभुर्ले येथील करंदीकर होते. मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या गो.ना. दातारांना एक मुलगी (काशीबाई) व ६ मुलगे अशी अपत्ये होती. काशीचे लग्न दत्तात्रय मराठे यांच्याशी झाले.

ग्रंथसंग्रह[संपादन]

दातारांकडे संस्कृत साहित्य, वेद, खगोल व आयुर्वेद आदी क्षेत्रातील ग्रंथांचा मोठा होता. वि.का. राजवाडेयांची पुस्तके, समग्र मोरोपंतरामायणाचे मराठी भाषांतर तसेच रेनॉल्ड्स व आर्थर कॉनन डॉईल यांची पुस्तके त्यांच्या संग्रही असून शिळाप्रेसवर छापलेली सुमारे १५० वर्षे जुनी पुस्तके त्यांनी जपून ठेवली होती.

आयुर्वेदिक औषधांची निर्मिती[संपादन]

गो.ना. दातार हे कादंबरीकार होण्यापूर्वी घरी औषधे बनवत. त्यासाठी त्यांनी रसायनशाळा हा कारखाना काढला. त्यातून त्यांनी तापावरील नारायणज्वरांकुश या औषधाची निर्मिती केली. या आपल्या वडिलांचे नाव दिले होते.

राजकीय आणि सामाजिक जीवन[संपादन]

दातारांवर शालेय जीवनापासून टिळकांची विचारधारा, त्यांचा राजकीय दबदबा यांचा प्रभाव असल्याने टिळक-गांधी यांच्या विचारधारेमुळे ते काँग्रेसवासी होऊन प्रचारक म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. ते राजापूर तालुका काँग्रेसचे काही काळ अध्यक्ष होते. ते आपल्या घराशेजारी असणाऱ्या हिरण्यकेशीय वेदपाठशाळेचे विश्वस्त आणि पदाधिकारीही होते.

लिखाण[संपादन]

२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातारांचे लेखन लोकप्रिय होते. त्यांनी प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याची रचना केली. त्या काळात ते स्वतःच काही आख्यायिकांचा विषय बनले होते.[ दुजोरा हवा]

दातारांचे अगदी सुरुवातीचे लेखन हे भारतात प्रचलित असणाऱ्या आख्यायिकांवर आधारित होते. ते लिखाण चालू असतानाच त्यांनी रेनॉल्ड्स या इंग्रजी लेखकाच्या सर्व कादंबऱ्यांचे मराठीत भाषांतर करणे सुरू केले. या कादंबऱ्यांमध्ये त्यांनी भारतीय वातावरण व इतिहास यांचा अत्यंत कौशल्याने वापर केला.

कादंबऱ्या छापण्यासाठी छापखाना[संपादन]

आपल्या कादंबऱ्या छापण्यासाठी दातारांनी स्वतःचा छापखाना सुरू केला होता. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री त्यांनी मुंबईतील प्रख्यात बाटलीबॉय कंपनीनिर्णयसागर यांच्याकडून मिळवली. छपाईची सर्व कामे हाताळताना लेखनापासून प्रकाशनापर्यंतची कामे ते स्वतःच करीत असत.

अशा प्रकारे छोटी-मोठी पुस्तके, लग्नपत्रिका, मुंजपत्रिका, दुकानांची विविध पावती पुस्तके आदी मुद्रित साहित्य राजापूरच्या घरच्या पडवीतील छापखान्यात चालत असे. एकनाथी भागवत, रंगनाथी योगवासिष्ठ, ज्ञानेश्वरांची गाथा, रामदास स्वामींचे समग्र ग्रंथ यांचे टिपांसह त्यांनी संपादन केले. या शिवाय मोरेश्वर भट्ट लिखित वैद्यामृत, शिवस्वरोदय, रामगीता, अध्यात्म रामायण, मुहूर्तमार्तंड, गणेशपुराणपद्मपुराण यांची भाषांतरे त्यांनी सरळ, सोप्या भाषेत केली होती.

कादंबऱ्या व अन्य पुस्तके[संपादन]

  • अधःपात
  • अध्यात्म रामायण (अनुवादित)
  • इंद्रभुवन गुहा (गुहेतील खजिन्याचे चित्तथरारक वर्णन असलेली कादंबरी)
  • एकनाथी भागवत (संपादित)
  • कालिकामूर्ती (कालिकामूर्तीच्या तळघरात दडलेल्या भयंकर सत्याचे रहस्यवर्णन)
  • गणेशपुराण (अनुवादित)
  • चतुर माधवराव (शेरलॉक होम्सच्या कथांवर आधारित मुंबई-कोकणातील घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा वेध घेणारी कादंबरी)
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र
  • पद्मपुराण (अनुवादित)
  • प्रवाळद्वीप (या कादंबरीत शापमुक्ततेसाठी मंडलेश्वराच्या बेटावर घडलेले रहस्यमयी अनुष्ठानाचे कथन आहे)
  • बंधुद्वेष
  • मानसिक यातना (मुंबईतील कामगार कुटुंबाचे पारदर्शी चित्रण केलेली कादंबरी)
  • मोलकरीण (मोगल काळातील कट-कारस्थाने व शह-प्रतिशहाने रंगलेले भयानक कथानक असलेली कादंबरी)
  • मुहूर्तमार्तंड (अनुवादित)
  • रंगनाथी योगवासिष्ठ (संपादित)
  • रहस्यभेद
  • रामगीता (अनुवादित)
  • रामदास व रामदासी ग्रंथ (संपादित)
  • शिवस्वरोदय (अनुवादित)
  • विलासमंदिर (विलास मंदिरात रचल्या जाणाऱ्या कट-कारस्थानांची रहस्यमय कहाणी)
  • विश्वनाथ
  • वैद्यामृत (अनुवादित)
  • शापविमोचन (पौराणिक काळातील भयंकर शाप-उःशापावर आधारित कादंबरी)
  • शालिवाहन शक (२००० वर्षापूर्वीच्या काळातील अंगावर शहारे आणणाऱ्या गूढ रहस्यांचे वर्णन)
  • श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर
  • ज्ञानेश्वरांची गाथा (संपादित)