Jump to content

गोविंद पानसरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोविंद पानसरे
जन्म २४ नोव्हेंबर १९३३
कोलहार, अहमदनगर
मृत्यू २० फेब्रुवारी, २०१५

गोविंद पानसरे (जन्म : कोल्हार, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, २४ नोव्हेंबर १९३३; - मुंबई, २० फेब्रुवारी २०१५) हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते होते. इ.स. १९५२ पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कामगारांसाठी तसेच घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते कोल्हापूर टोलविरोधी आंदोलनातही अग्रभागी होते. कोल्हापूरमध्ये १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपचारादरम्यान त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले..

जीवन

[संपादन]

गोविंद पानसरे यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३३ रोजी जिल्हा अहमदनगर, तालुका राहता मधील कोल्हार या गावी झाला. गरीब कष्टकऱ्यांच्या परिवारात ते वाढले. कोल्हार येथून प्राथमिक शिक्षण व राहुरी येथून माध्यमिक शिक्षणानंतर ते उच्चशिक्षणासाठी कोल्हापूरला गेले, जिथे त्यांनी बी.ए. (ऑनर्स) व एल.एल.बी. पूर्ण केले. सुरुवातीला वर्तमानपत्र विक्रेता, नगरपालिकेत शिपाई, माध्यमिक शाळा मंडळात प्राथमिक शिक्षक अशा अनेक नोकऱ्या केल्या आणि  नंतर ते शिवाजी विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. सोबत ते कामगार वकीलीसुद्धा करू लागले. पुढे ते कोल्हापुरमधील एक नावाजलेले वकील झाले व अनेक वर्षे कोल्हापुरातील वकीलांच्या संघटनेचे अध्यक्ष राहिले.

चळवळ

[संपादन]

कॉ. पानसरे शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळींकडे आकर्षित झाले होते. सुरुवातीला राष्ट्र सेवा दल व त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. दहा वर्षांसाठी ते भाकपचे महाराष्ट्र सेक्रेटरी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळगोवा मुक्ती चळवळीत ते सहभागी होते. तडजोड न करता समाजातील सर्वांत जास्त शोषित तबक्क्यांच्या हक्कांसाठी लढणारे ते कार्यकर्ता होते. ते कष्टकऱ्यांच्या शेकडो संघर्षांमध्ये सहभागी झाले व अनेकांचे नेतृत्वदेखील केले, विशेषतः असंघटित क्षेत्रांतील कामगार, शेतमजूर, घरकामगार, ऑटोरिक्षा युनियन, दूध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी, इत्यादी. कोल्हापुरमधील टोलविरोधी आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते या आंदोलनात अग्रभागी होते.

साहित्य

[संपादन]

कॉ. पानसरे हे एक लेखकसुद्धा होते व त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या अभियानांमध्ये ते अथकपणे कार्यरत होते. "शिवाजी कोण होता?" हे त्यांच्या अनेक लेखनांपैकी सर्वांत प्रसिद्ध लेखन आहे. अथक परिश्रमाअंती त्यांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहचवून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ह्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे व १.५ लाखाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या वाङ्मयाचे डॉ. अशोक चौसाळकर आणि डॉ. रणधीर शिंदे यांनी संपादित केलेले दोन खंड प्रसिद्ध झाले आहेत. लोकवाङ्मय गृहाने ते प्रकाशित केले आहेत.

कॉ.गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता हे पुस्तक आपल्याला शिवाजींचे दर्शन घडवते.

गोविंद पानसरे यांनी लिहिलेली काही पुस्तके

[संपादन]
  1. अजून न स्वीकारलेला मंडल आयोग
  2. अवमूल्यन : कळ सोसायची कुणी?
  3. काश्मिरबाबतच्या कलम ३७०ची कुळकथा
  4. कामगारविरोधी कामगार धोरणे
  5. काही कामगार कायद्यांची तोंडओळख
  6. धर्म जात वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा
  7. पंचायत राज्याचा पंचनामा
  8. मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम
  9. मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न
  10. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी: पर्यायी दृष्टिकोन
  11. मार्क्सवादाची तोंड ओळख
  12. मुस्लिमांचे लाड
  13. राजर्षी शाहू : वसा आणि वारसा
  14. शिवाजी कोण होता?
  15. शेतीधोरण परधार्जिणे

अन्य पुस्तके

[संपादन]
  1. कॉ. गोविंद पानसरे - समग्र वाड्मय (२ खंड, संपादक अशोक चौसाळकर))

मृत्यू

[संपादन]

पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. नंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून भरधाव वेगाने निघून गेले. ह्या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. पानसरे यांच्या छातीला आणि पोटाला इजा झाली होती आणि त्यांच्या पत्नीला डोक्याला इजा झाली होती. उपचारादरम्यान गोविंद पानसरे यांचे २० फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईमध्ये निधन झाले.[]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • २००३ साली भारतीय पोस्टाने त्यांचे छायाचित्र असलेले तिकिट प्रकाशित केले.
  • पानसरे यांच्या नावाने ’कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली आहे.[ संदर्भ हवा ] ३ जून, इ.स. २०१५ रोजी पहिला 'कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार' मुक्ता मनोहर यांना देण्यात आला.

संदर्भ

[संपादन]