गणेश वासुदेव जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका (जुलै २०, इ.स. १८२८ - जुलै २५,इ.स. १८८०) हे मराठी समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते होते.

जीवन[संपादन]

गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म सातारा येथे वडिलोपार्जित घरात जुलै २० इ.स. १८२८ रोजी झाला. सर्व भावंडात ते धाकटे होते. त्यांचे बालपण सातारा या शहरी गेले. प्राथमिक शिक्षण,मुंज,लग्न हेही सातारी येथेच झाले. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत ते सातारा येथे होते. इ.स. १८४८ साली ते पुण्यास आले आणि त्यांनी नाझर कोर्टात नोकरी धरली. यानंतर आयुष्यभर पुणे हेच त्यांच्या वास्तव्याचे क्षेत्र होते. त्यांना एकूण ५२ वर्षांचे आयुष्य लाभले. इ.स. १८४८ ते इ.स. १८६९ हा सुमारे बावीस वर्षांच्या काळात त्यांनी नोकरी, ती सोडल्यावर वकिली आणि सार्वजनिक कार्यातील उमेदवारी केली. यानंतरची १० वर्षं त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची ठरली.

शेतकी व आरोग्य हे त्यांचे आवडते विषय होते. शास्त्रीय ज्ञानाची जोड देऊन शेतीत नवे प्रयोग करावेत व संशोधन करावे असे त्यांना वाटत असे.

'पुणे सार्वजनिक सभे'च्या स्थापनेत पुढाकार घेऊन या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक व समाजोपयोगी कामे केली, त्यामुळे त्यांना 'सार्वजनिक काका' ही बिरुदावली लाभली. राजकारणाचे आद्यपीठ किंवा कांग्रेसची जननी म्हणता येईल अशी 'सार्वजनिक सभा' ही जनतेची गार्‍हाणी सरकारदरबारी आणि वेशीवर टांगणारी क्रियाशील संस्था होती. इ.स. १८७० ते इ.स. १९२० या पन्नास वर्षांच्या काळात, विशेषतः इ.स. १८९६-९७ पर्यंत सार्वजनिक सभेचा राजकीय क्षेत्रावर चांगला प्रभाव होता. या संस्थेचे पालनपोषण पहिली दहा वर्ष मुख्यतः सार्वजनिक काकांनी केले. तिच्यामार्फत विविध उपक्रम करून त्यांनी लोकजागृती केली. सभेचे कार्य घटनानियमांनुसार जरी चालू होते तरी तिच्या सर्व कार्यामागे काकांची प्रेरक शक्ती होती.

वासुदेव बळवंत फडक्यांच्या खटल्यांचे वकीलपत्र घेणारे गणेश वासुदेव उर्फ सार्वजनिक काका जोशी हे न्या.रानडे यांचे चांगले स्नेही होते..

अधिक वाचन[संपादन]

  • वासुकाका जोशी व त्यांचा काल - त्र्यं.र.देवगिरीकर
  • सार्वजनिक काका - म.श्री.दीक्षित

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.