क्ष-किरण शैली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्ष-किरण शैली : (एक्स-रे स्टाइल) हे आपल्या साध्या डोळ्यांना दिसणाऱ्या घटना, वस्तू, सचेतन प्राणिसृष्टी आदींची दृक्कक्षा बाह्य भौतिक घनाकारांच्या पृष्ठभागापुरती सीमित असते. ही त्रिमितीय वास्तवतेची दृक्कक्षा मानली जाते. या त्रिमितीय घनाकारात्मक बाह्य पृष्ठभागाला आरपार भेदून त्याच्या आत अदृश्य असलेल्या अंतर्रचनेचे, अंतर्बांधणीचे स्वरूप दृश्यमान करणाऱ्या दृष्टीला ‘क्ष-किरण दृष्टी’ असे संबोधले जाते आणि या अंतर्दृष्टीच्या साहाय्याने कलानिर्मिती करणाऱ्या कलावंताच्या शैलीस ‘क्ष-किरण शैली’ असे संबोधले जाते. विसाव्या शतकात जर्मन भौतिकीविज्ञ ⇨ व्हिल्हेल्म कोनराट राँटगेन (१८४५–१९२३) याने ⇨ क्ष-किरणांचा शोध लावल्यानंतर या प्रकारच्या तत्त्वदृष्टीला व कलाशैलीला ‘क्ष-किरण’ हे नामाभिधान प्राप्त झाले. त्यापूर्वी मानवी विकासक्रमातील कलाव्यवहारात मानवी प्रतिभेद्वारे विवक्षित विभेदनशील दृष्टीचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकटीकरण झालेले दिसून येते. क्ष-किरण शैलीचे प्राथमिक कलारूप प्रागैतिहासिक कालखंडातील आदिमानवाने त्याच्या शिकारी अवस्थेत चितारलेल्या काही प्राण्यांच्या आकृतिबंधांत दिसून येते. मध्याश्मयुगीन व्याधाने प्राण्यांचे चित्रण करताना त्यांच्या शरीरातील प्रत्यक्षतः न दिसणारे अवयव क्ष-किरणांनी पहावेत, तसे दाखविले हा क्ष-किरण शैलीचा उगम म्हणता येईल. मध्याश्मयुगीन (मेसोलिथिक) क्ष-किरण शैलीतील चित्रणांचे अनेक नमुने उत्तर यूरोप, सायबीरिया, आर्क्टिक परिसर, उत्तर अमेरिका, पूर्व न्यू गिनी, न्यू आयर्लंड, मलेशिया, भारत आदी भागांत उपलब्ध झाले आहेत. कृषिपूर्व शिकारी अवस्थेतील सांस्कृतिक टप्प्यात सूक्ष्म अश्मास्त्र, त्यांतील वैविध्य व त्यांचे संयुक्त उपयोग, संघटित व स्थायी आयुष्याचा प्रारंभ, पशू माणसाळविण्याची पद्धती इ. वैशिष्ट्यांचा तत्कालीन कलाव्यवहाराशी जैवसंबंध राहिला आहे. या कालखंडात आदिमानवानेे प्राण्यांच्या शरीराच्या आतील हाडांच्या सांगाड्यांचे, अंतर्गत अवयवांचे जे प्राथमिक शरीरशास्त्रीय ज्ञान प्राप्त केले, त्या निरीक्षणांच्या आधारे गुहेतील शिलांवर वा निवाऱ्याच्या खडकांवर विवक्षित प्राण्यांची स्थूल चित्रणे काढली आहेत. या प्रारंभिक द्विमितीय चित्रणात प्राण्यांच्या बाह्य शरीराबरोबरच शरीराच्या आतील भागामधील हाडांच्या आणि अवयवांच्या रचनांचे स्थूल रेषीय विभेदनशील दर्शन घडते. क्ष-किरण शैलीच्या प्राथमिक आद्य रूपांतूनच पुढे अलंकरणात्मक व अमूर्त नानाविध, असंख्य आकार उत्क्रांत झाले.

सद्यकाळात क्ष-किरण शैलीचा पारंपरिक संदर्भ उत्तर ऑस्ट्रेलियातील पूर्व ऑर्नमलँडमधील आदिवासी कलेशी (ॲबॉरिजिनल आर्ट) जोडला जातो. ही क्ष-किरण शैली इ. स. पू. २००० च्या दरम्यान विकसित झाली असून वर्तमानकाळातही तिच्यात एक प्रकारचे विकासमान सातत्य राहिले आहे. पारंपरिक ऑस्ट्रेलियन आदिवासी कलेत क्ष-किरणशैली अधिक विकसित स्वरूपात दिसते. शिला-प्रस्तर, झाडांच्या सालीचे (बार्क) पृष्ठभाग आदींवरील स्थानिक प्राण्यांच्या रेखीव, प्रमाणबद्ध रेखांकनामध्ये व रंगचित्रणामध्ये, तसेच सौंदर्यपूर्ण बिंदुचित्रांमध्ये (डॉट पेंटिंग्ज) क्ष-किरण शैली जोरकसपणे प्रकटलेली आहे. मासे, मगर, कांगारू व इतर पशुपक्षी आदींच्या चित्रणात त्यांच्या शरीराच्या आतील हाडांच्या सांगाड्याची, पाठीच्या कण्याची, बरगड्यांची तसेच हृदय, पोट यांसारख्या अंतर्गत अवयवांची सुबक रचना साकारलेली आहे. त्यात बारीक बिंदूंची वरेषांची गतिमान लयबद्धता, परस्परछेदकता आणि त्यातील पारदर्शकता निदर्शित करण्याचा कलात्मक प्रयत्न लक्षवेधक आहे. उत्तरकालीन कला-वंतांनी पशुपक्ष्यांच्या आकृत्या, पांढऱ्या रंगातील बाह्य रेषांनी छायाकृती दाखविल्याप्रमाणे रेखाटताना आतील रचना लाल व पिवळ्या या नैसर्गिक रंगांत रंगविलेल्या आहेत. आदिम क्ष-किरण कलाशैलीच्या विकासक्रमात प्राण्यांच्या व्यतिरिक्त मानवाच्या शरीराकृतीच्या हाडे, अवयव, स्नायू, मेद, मज्जातंतू आदी अंतर्रचनेचे दर्शन घडविणाऱ्या कलाकृती उत्तरकालीन कलाकारांनी निर्माण केल्या. मानवाच्या क्ष-किरण-आकृतिचित्रणात लैंगिक व प्रजननविषयक शरीरशास्त्रीय मानीव धारणांची प्रातिभ अभिव्यक्तीहीही दिसू लागली. उदा., स्त्रीच्या गर्भाशयातील अर्भक, स्तनयुग्माच्या आतील दूध आदींचे काल्पनिक चित्रणही त्यांत दिसून येते. प्राणी व मानवी शरीराकृतीमधील हाडे व अवयवरचनेचे अंतर्चित्र साकारताना कलाकार त्या शरीराकृतीच्या आतील रिकामी जागा म्हणजेच ऋण-अवकाश छायाचित्राच्या ऋण-पट्टाप्रमाणे (निगेटिव्ह फिल्म) काळ्या-पांढऱ्या उलटसुलट बाजूंच्या स्वरूपात निदर्शित करू लागले. पशुपक्ष्यांच्या अंतर्चित्रणामध्ये ही रिकामी जागा बहुधा पारंपरिक नक्षीकामाने व्यापलेली राहिली, तरी नक्षीकामाच्या सुबकतेत आणि सूक्ष्मतेत गुणात्मक वृद्धीही झाली. अर्थात ऑस्ट्रेलियात यूरोपियनांचा संपर्क वाढल्यानंतर तेथील आदिवासी क्ष-किरण शैलीत विकासाभिमुख परिवर्तन झालेले आहे.

आदिम क्ष-किरण शैलीतील कला कोणत्याही विशिष्ट धार्मिक प्रतीकांनी वा चिन्हांनी ओळखली जात नाही. ती धर्मपूर्व शिकारी जीवनाशी आणि वन्योपजीवी आदिम सांस्कृतिक जीवनहेतूंशी अविभाज्यपणे निगडित आहे व त्यातील यातुविधीसंबद्ध उपयुक्तता आणि सुलभता ही निसर्ग- विषयक आदिम जाणिवा आणि अतिमानवी अतींद्रिय शक्तीवरील विश्वास यांतील द्वंद्व अभिव्यक्त करते. आधुनिक कलेमध्ये अनेकविध माध्यमांद्वारे परस्परविरोधी तात्त्विक भूमिका अंगीकारत क्ष-किरण शैलीचा विकास झाला आहे. राँटगेनप्रणीत क्ष-किरण शोधानंतर समकालीन विज्ञानाभ्यास-शाखा आणि तत्त्वज्ञान यांच्या द्वंद्वातून क्ष-किरण शैलीवादी कलावंतांनी काही महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्या. त्यामुळे गेल्या शंभर वर्षांतील क्ष-किरण शैलीही पारंपरिक आदिवासी क्ष-किरण कलाशैलीच्या तुलनेत आधुनिक दृक्संवेदनांनी संस्कारित, तसेच तात्त्विक व तांत्रिक दृष्ट्या भिन्न भिन्न दृक्-अनुभव-विश्वाचे व्यामिश्र संदर्भ प्रकट करणारी शैली म्हणून पुढे आली आहे.

पहिल्या महायुद्धापूर्वीच्या कालखंडात क्ष-किरण यंत्राचा वापर कॅमेरा म्हणून करीत. क्ष-किरण शैलीवादी कलाकारांनी क्ष-किरणांच्या द्वारे तरंगरूपी ऊर्जेच्या स्वरूपात वस्तू, निसर्ग, प्राणी, मनुष्य आदींमधील आंतरिक रचना व अवकाश यांचे अनेकविध दृक्-आविष्कार साकार केले. विसाव्या शतकामध्ये दुसऱ्या दशकात उदयाला आलेल्या ⇨ नवकालवाद (फ्यूचरिझम), ⇨ दादावाद (दादाइझम) यांसारख्या आधुनिक पाश्चात्त्य कलाचळवळींतील कलावंतांनी छायाचित्रण, कालिक-छायाचित्रण (क्रोनो-फोटोग्राफी) अशा तंत्रांद्वारे आधुनिक क्ष-किरण शैलीवादी दृश्यभाषेची पायाभरणी केली आणि समकालीन प्रत्यक्षार्थवादी दृक्प्रमाण-दृष्टिचौकटीला आव्हान दिले. मार्सेल द्यूशाँ, फ्रान्सिस्क कुप्का, आरॉन स्कार्फ, गेरमानो सेलन्ट, शिल्पकार ?नायूम गाब आदी कलावंतांनी या शैलीतील कलाविष्कार सादर केले आणि अप्रत्यक्ष वास्तवातील सूक्ष्मातिसूक्ष्म दृक्-वास्तवतेचा, तसेच वास्तवतेच्या अना-कलनीय अदृश्य परिमाणांचा जोरकसपणे पुरस्कार केला. व्यक्तिचित्र, नग्नाकृतिचित्र (न्यूड), स्थलचित्र, स्थिरवस्तुचित्र यांसारख्या प्रचलित कलाप्रकारांचेही क्ष-किरणात्मक विभेदन-चित्रण या कलावंतानी केले. घनवादी कलासंप्रदायाने घनाकाराच्या त्रिमितीच्या प्रातिभ पृथक्करणातून बहुपृष्ठत्व अधोरेखित केले तर क्ष-किरण शैलीने आधुनिक विज्ञान-–तंत्रज्ञानाच्या आधारे त्रिमितीय दृश्य वा वास्तवाच्या अंतर्गत रचनाबंधाच्या दृक् स्वरूपाच्या आविष्काराला महत्त्व दिले.

विसाव्या शतकात तिसऱ्या दशकातील छायाचित्रकार, कलावंत डेन टास्कर हा क्ष-किरण कलाशैलीचा प्रणेता मानला जातो. त्याने पान-फुलांसारख्या निसर्गवस्तूंतील सौंदर्याविष्कार क्ष-किरण छायाचित्रणाद्वारे केला. या शैलीतील अत्याधुनिक कलाविष्कार सातत्याने अनेकविध प्रयोगांतून आजही केले जात आहेत. स्टीव्हन मेयर्स, निक व्हिसेय, लॉरा फर्ग्युसन, ह्यूज तर्वे, किरिल कुलेटस्की, कई-हुंग-फुंग, विम डेल्वॉय यांसारखे अनेक कलावंत, छायाचित्रकार समकालीन क्ष-किरण शैलीत कलात्मक योगदान देत आहे.
या आधुनिक तंत्राधिष्ठित कलाशैलीने विज्ञान आणि कला यांचा समन्वय साधण्याचा प्रयास केला, असे प्रतिपादन काही कलाभ्यासक करतात. दृश्यवस्तूच्या अंतर्गाभ्यातील आकार-निराकार रचना व अवकाशातील सूक्ष्मता दर्शविणे, हे उच्च प्रतीचे वास्तवरूपी सौंदर्य आहे, अशी क्ष-किरण शैलीवाद्यांची भूमिका आहे. या भूमिकेने प्रचलित विवेकवादी दृष्टिचौकटीला छेद देणाऱ्या गूढ सौंदर्यजाणिवांचा परिपोष केला.
विज्ञानवादी कलासमीक्षक या शैलीचा विचार चौथ्या मितीच्या संदर्भात करतात. त्रिमितीय दृश्यविश्व आणि वास्तव यांच्या दर्शनी बाह्य पृष्ठतेला भेदून त्याच्या आतील गाभ्याला दृश्यतम स्तरावर प्रक्षेपित करणारीचौथ्या मितीची भौमितिक संकल्पना, किंबहुना प्रावरणांच्या अंतर्गत लहरींतील सहेतूक, कल्पक मांडणी क्ष-किरण शैलीद्वारे केली जात आहे.