कॅथार्सिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅथार्सिसचा सिद्धांत साहित्य व सौंदर्यशास्त्रातील महत्त्वाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत इ.स. पूर्व २०० वर्षापूर्वी ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्याने त्याच्या पोएटिक या ग्रंथात मांडला होता. शोकांतिकेच्या आस्वादाच्या प्रक्रियेचे सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण हा सिद्धांत करतो.[१][२][३] [४]

पार्श्वभूमी[संपादन]

कॅथार्सिसच्या सिद्धांताला ग्रीक तत्त्ववेत्ता व ॲरिस्टॉटलचा गुरू प्लेटो याच्या विचारांची पार्श्वभूमी आहे. प्लेटोने त्याच्या रिपब्लिक या राज्यशास्त्र विषयावरील ग्रंथात आदर्श राज्याची कल्पना मांडली. या कल्पनेनुसार, प्लेटो कवी-कलावंत यांच्याबाबत नैतिक आक्षेप नोंदवत त्याच्या आदर्श राज्यातून त्यांना हद्दपार करतो.

प्लेटोचे कलेबद्दल आक्षेप[संपादन]

प्लेटोने आपल्या रिपब्लिक या ग्रंथात ललित कलेवर आणि शोकांतिकेवर आक्षेप घेतले आहेत. ‘कलावंत सत्य रेखाटत नाहीत तर सत्याबद्दलचे भास रेखाटतात’; हा ललित कलेवर; तर ‘शोकांतिकेच्या दर्शनाने माणसाच्या मनातील भीती आणि करुणा या भावना जागृत होतात, म्हणून भितीमुळे नागरिक दुबळा व करुणेमुळे नागरिक अविवेकी बनतो.’ हे ते आक्षेप असून ते प्लेटोने नैतिक भूमिकेतून घेतले. यापैकी शोकांतिकेवरील आक्षेपाचे खंडन करण्यासाठी ॲरिस्टॉटलने हा सिद्धांत मांडला आहे. प्लेटोने नैतिक भूमिकेतून घेतलेल्या या आक्षेपांना ॲरिस्टॉटलने आपल्या या सिद्धांतातून साहित्यशास्त्रीय मुद्द्यांच्या आधारे उत्तर दिले आहे.

ॲरिस्टॉटलच्या ग्रंथाचे भाषांतर[संपादन]

ॲरिस्टॉटलने हा सिद्धांत त्याच्या ‘पोएटिक’ या ग्रीक भाषेत लिहिलेल्या ग्रंथात मांडला असून त्याचे इंग्रजी भाषांतर बूचर आणि रिचर्डस यांनी इंग्रजीत केले आहे. या इंग्रजी ग्रंथाचे मराठीत भाषांतर गो. वि. करंदीकर यांनी ‘ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’ या नावाने केले आहे.[१]

ॲरिस्टॉटलचा सिद्धांत[संपादन]

प्लेटोचे शोकांतिकेबाबतचे म्हणणे खोडून ॲरिस्टॉटल आपला सिद्धांत मांडला आहे. ‘शोकांतिकेच्या दर्शनामुळे नागरिकाच्या मनातील ‘भीती’ व ‘करुणा’ या कॅथार्सिस (विरेचन) होते. त्यामुळे भीतीचे विरेचन होऊन नागरिक ‘समर्थ’ बनतो व करुणेचे विरेचन होऊन नागरिक ‘विवेकी’ बनतो.’ असा हा सिद्धांत असून ॲरिस्टॉटल शोकांतिकेचे समर्थन करतो आणि आदर्श राज्यातील कलावंतांचे स्थान अबाधित राखतो.

ॲरिस्टॉटलच्या मते, करुणा व भीती हे दुःखाचेच प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीवर आलेल्या अयोग्य अशा विपत्तीमुळे करुणा निर्माण होते आणि आपल्यासारख्याच अशा व्यक्तीवर आलेल्या संकटामुळे भीती निर्माण होते. ही व्यक्ती उत्कटत्वाने चांगली व न्यायी नसते आणि तरीसुद्धा जिच्यावरील विपत्ती दुर्गुणांमुळे न ओढवता एखाद्या प्रमादामुळे अथवा स्खलनशीलतेमुळे ओढवते- अशी प्रसिद्ध, वैभवसंपन्न व्यक्ती ती असावी असे ॲरिस्टॉटलने म्हटले आहे. करुणा ही भावना शत्रूने शत्रूला मारले तर किंवा तटस्थ लोकांच्या बाबतीत निर्माण होऊ शकत नाही असेही ॲरिस्टॉटलने स्पष्ट केले आहे.

कॅथार्सिस, त्याची प्रक्रिया, शोकांतिका, तिचा नायक, तिचा आस्वाद यांबद्दल ॲरिस्टॉटल बोलत असला तरी कॅथार्सिस म्हणजे काय याचे अधिक स्पष्टीकरण वा अर्थ त्याने दिलेला नाही.     

कॅथार्सिस म्हणजे काय : विविध अर्थ[संपादन]

ॲरिस्टॉटलने कॅथार्सिस हा ग्रीक शब्द वापरला आहे. त्याचा पर्यायी शब्द ‘विरेचन’ असा आहे. मात्र त्याचा अर्थ वा अधिक स्पष्टीकरण त्याने केले नाही. त्यामुळे कॅथार्सिस या संकल्पनेचा नेमका अर्थ काय, ॲरिस्टॉटलला अभिप्रेत असलेली ही प्रक्रिया नेमकी कशी घडून येते, याबद्दल नंतरच्या अभ्यासकांनी व भाष्यकारांनी धार्मिक, नैतिक, होमिओपॅथी, मानसशास्त्रीय, सौंदर्यवादी, ज्ञानात्मक, संगीतप्रधान असे विविध अर्थ सांगितले आहेत. 

कॅथार्सिस म्हणजे धार्मिक कल्पना[संपादन]

गिल्बर्ट मरी यांच्या म्हणण्यानुसार, ॲरिस्टॉटलला कॅथार्सिस मधून एक धार्मिक कल्पना अभिप्रेत आहे. मरी यांच्या मते, शोकांतिकेचे मूळ डायोनिसस् या देवतेच्या उत्सवात आहे. हा उत्सव ग्रीक देशात दरवर्षी होई. यात लोक सामुदायिकरीत्या आपल्या पापाचे परिमार्जन करीत. त्यामुळे अशा पाप परीमार्जनाचीच प्रक्रिया कॅथार्सिस मधून ॲरिस्टॉटलला अभिप्रेत आहे. त्यामुळे कॅथार्सिस हा धार्मिक संस्कार होय, असे मरी यांचे म्हणणे आहे.

कॅथार्सिस म्हणजे नैतिक विशुद्धीकरण[संपादन]

राबर्टेली, कार्नेल आणि लेसिंग यांच्या म्हणण्यानुसार, कॅथार्सिस मधून नैतिक विशुद्धीकरणाचा अर्थ सांगितला आहे. राबर्टेली यांच्या मते, भीती आणि करुणा यांचा पुनःपुन्हा अनुभव घेतल्याने माणसाचे मन छोट्या छोट्या प्रसंगाने भावनावश होईनासे होते. ते खंबीर आणि संयमी बनते. त्यामुळे कॅथार्सिस म्हणजे वज्रीकरण (कठोरपणा) होय.

कार्नेल यांच्या मते, विकारांच्या अधीन झाल्यामुळे शोकांतिकेच्या नायकाच्या जीवनात घडलेल्या भीषण घटना पाहून प्रेक्षकाला स्वतःच्या जीवनाबद्दल भय वाटू लागते. म्हणून तो या विकारांना आवर घालण्यासाठी प्रवृत्त होतो. त्यामुळे त्याच्यात नैतिक शक्तीची वाढ होते.

लेसिंगच्या मते, एखाद्याबद्दल करुणा वाटणे ही भावनाच मुळात नैतिक आहे. शोकांतिकेतील नायकाबद्दल आपल्याला करुणा वाटते, म्हणजेच आपल्यातील नैतिक प्रवृत्तीची वाढ होते. त्यामुळे भावनांचे नैतिक शुद्धीकरण हीच कॅथार्सिसची प्रक्रिया होय, असे राबर्टेली, कर्नेल आणि लेसिंग यांचे म्हणणे आहे.

कॅथार्सिस म्हणजे वैद्यकीय होमिओपॅथी प्रक्रिया[संपादन]

मिल्टन आणि बर्नेस या समीक्षकांना कॅथार्सिसची प्रक्रिया म्हणजे होमिओपॅथी या क्षेत्रातील विरेचनसदृश्य प्रक्रिया वाटते. मिल्टनच्या मतानुसार, प्रक्षुब्ध भावनांचा निचरा करण्यासाठी शोकांतिकेच्या द्वारा भीती आणि करुणा या भावना कृत्रिमरीत्या निर्माण केल्यास आपल्या मनाला निरोगी व शांत अवस्था प्राप्त होते. होमिओपॅथी औषध योजनेत आधी आजाराचा कृत्रिम प्रक्षोभ आणि नंतर विरेचन असा क्रम असतो. शिवाय होमिओपॅथीत कॅथार्सिस म्हणजे आधी कृत्रिम प्रक्षोभ व नंतर उपाय असाच अर्थ होतो, असे मिल्टन आणि बर्नेस यांचे म्हणणे आहे.

कॅथार्सिस म्हणजे मानसशास्त्रीय प्रक्रिया[संपादन]

फ्रेटॅग आणि गॅस्नेर यांनी कॅथार्सिसची प्रक्रिया मानसशास्त्रीय मानली आहे. फ्रेटॅगच्या मते, नायकावरील भीषण संकट पाहून प्रेक्षकांच्या मनात आपल्या सुरक्षिततेची सुखद भावना निर्माण होते. ही भावना म्हणजेच कॅथार्सिस होय. तर गॅस्नेरच्या मते, शोकांतिकेच्या दर्शनाने वाचकाच्या सुप्त व दडपलेल्या मनःप्रवृत्तींचे जाणीवपूर्वक प्रकटीकरण होते. त्यातून मनाला जो निकोपपणा प्राप्त होतो, तो अर्थ ॲरिस्टॉटलला अभिप्रेत आहे.

शोकांतिकेमुळे आधी असुरक्षितता वाटते आणि नंतर सुरक्षितता वाटते, ही मानसिक प्रक्रियाच कॅथार्सिस मध्ये आहे, असे फ्रेटॅग आणि गॅस्नेर यांचे म्हणणे आहे.

फ्रेटॅग आणि गॅस्नेर यांनी कॅथार्सिसची प्रक्रिया मानसशास्त्रीय मानली आहे. फ्रेटॅगच्या मते, नायकावरील भीषण संकट पाहून प्रेक्षकांच्या मनात आपल्या सुरक्षिततेची सुखद भावना निर्माण होते. ही भावना म्हणजेच कॅथार्सिस होय. तर गॅस्नेरच्या मते, शोकांतिकेच्या दर्शनाने वाचकाच्या सुप्त व दडपलेल्या मनःप्रवृत्तींचे जाणीवपूर्वक प्रकटीकरण होते. त्यातून मनाला जो निकोपपणा प्राप्त होतो, तो अर्थ ॲरिस्टॉटलला अभिप्रेत आहे.

शोकांतिकेमुळे आधी असुरक्षितता वाटते आणि नंतर सुरक्षितता वाटते, ही मानसिक प्रक्रियाच कॅथार्सिस मध्ये आहे, असे फ्रेटॅग आणि गॅस्नेर यांचे म्हणणे आहे.

कॅथार्सिस म्हणजे सौंदर्यशास्त्रीय प्रक्रिया[संपादन]

इंग्रजी भाषांतरकार बूचर आणि रिचर्डस यांना  कॅथार्सिसचा अर्थ सौंदर्यवादी दृष्टीने अभिप्रेत आहे. बुचरच्या मते, ‘कलेच्या संदर्भात येणारा भावानुभव हा काल्पनिक, विश्वात्मक असल्याने शोकांतिकेच्या दर्शनाने निर्माण होणारी भीती व करुणा यांच्यातील दुःखाचा अंश नष्ट होतो. म्हणजेच व्यावहारिक, लौकिक पातळीवरील भीतीचे ‘शुद्ध’ भावनांमध्ये रूपांतर होते. त्यामुळे कॅथार्सिस माणसाच्या मनातील खालच्या पातळीवरील भावनांचे वरच्या पातळीवर उन्नयन होणे होय, असे बूचर यांचे म्हणणे आहे.

रिचर्डच्या मते, करुणेमुळे वाटणारे आकर्षण आणि भीतीमुळे वाटणारे प्रतिकर्षण यांचा कलात्मक तोल सावरल्यामुळे येणारी ‘समधातता’ (Ballence) म्हणजेच कॅथार्सिस होय.

म्हणजे शोकांतिकेच्या दर्शनाने भावनांचे एकाचवेळी आकर्षण आणि प्रतिकर्षण यांमुळे समतोल साधला जातो. ही सौंदर्यशास्त्रीय प्रक्रियाच कॅथार्सिस मध्ये अभिप्रेत आहे, असे या सौंदर्यवादी भाष्यकरांचे म्हणणे आहे.

कॅथार्सिस ज्ञानात्मक  प्रक्रिया[संपादन]

गोल्डन आणि हार्डिसन या अभ्यासकांनी ‘कॅथार्सिस’ ही ज्ञानात्मक  प्रक्रिया मानली आहे. त्यांच्या मते, शोकांतिकेच्या संरचनेतच तिच्यातील शोकात्म घटनांची संभवनियता वा अपरिहार्यता आणि विश्वात्मकता स्पष्ट होत असते. त्यामुळे शोकांतिकेतील सदोषता नाहीशी होते. म्हणून शोकात्मकृतीचे विशुद्धीकरण म्हणजे कॅथार्सिस होय.

कॅथार्सिसचा संगीतप्रधान अन्वय[संपादन]

मराठी भाषांतरकार गो. वि. करंदीकर यांनी  कॅथार्सिसचा अन्वय संगीतप्रधान लावला आहे. त्यांच्या मते, धार्मिक उन्मादाने पछाडलेल्या माणसावर भावना प्रक्षोभक संगीताचा मारा केल्यास त्याच्या प्रक्षुब्ध भाववृत्तीला वाट फुटून  त्याला पुन्हा आनंदमय अशा शांत मन;स्थितीचा लाभ होतो, त्याचे भावना विरेचन होते. ही संगीतप्रधान प्रक्रियाच कॅथार्सिस म्हणजे विरेचन होय.[१]

करंदीकरांच्या मते, शोकांतिकेचे नैतिक प्रयोजन व सामाजिक स्थान सिद्ध करण्यासाठीच मुख्यत्वेकरून कॅथार्सिचा सिद्धांत मांडला आहे.[१]

कॅथार्सिसचा म्हणजे विरेचनाची प्रक्रिया कशी घडते?[संपादन]

म. सु. पाटील यांच्या मते ‘शोकात्मिका ही विश्वाची अनुकृती असल्यामुळे’ तिच्यातील पात्रे प्रातिनिधिक असल्यामुळे व जीवनदर्शन तत्त्वसूचक असल्यामुळे प्रेक्षक शोकात्मिकेच्या नायकाशी तादात्म्य पावतो, स्वार्थनिरपेक्ष अशा उत्कट व व्यापक भावविश्वात प्रवेश करतो आणि त्यामुळे करुणा व भीती यातील दुःखद भाव नाहीशा होऊन प्रेक्षकाला एक प्रकारचे उदात्त भावनात्मक समाधान मिळते.

सारांश[संपादन]

ॲरिस्टॉटलचा कॅथार्सिसचा सिद्धांत हा प्लेटोच्या ललितकलेवरील नैतिक आक्षेपांचे सौंदर्यशास्त्रीय उत्तर असून प्लेटो कलेवर नैतिक आक्षेप घेतो, तर ॲरिस्टॉटल सिद्धांताचा कलात्म विचार करतो. कॅथार्सिस ही शोकांतिकेच्या आस्वादाबद्दलचे विश्लेषण असून त्याचे अधिक स्पष्टीकरण व विविध अर्थ त्याच्या विविध भाष्यकारांनी लावलेले आहेत. 

संदर्भ ग्रंथ[संपादन]

-         ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र : गो. वि. करंदीकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९९९    

-         मराठी वाङ्मय कोश- समीक्षा संज्ञा (खंड चौथा) समन्वयक, राजाध्यक्ष विजया, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संकृती मंडळ, मुंबई, २०००, पृ. ३३७-३३८ 

-         म.सु. पाटील, विरेचन, संज्ञा-संकल्पना कोश, संपा. प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके, ग. रा. भटकळ फाउंडेशन, मुंबई, २००१

-         प्रा. देवानंद सोनटक्के, एम. ए. भाग १, व्याख्यान, क. भा. पा. महाविद्यालय, पंढरपूर, १९, २० सप्टें., २०१३  

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ a b c d ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र : गो. वि. करंदीकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९९९
  2. ^ मराठी वाङ्मय कोश- समीक्षा संज्ञा (खंड चौथा) समन्वयक, राजाध्यक्ष विजया, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संकृती मंडळ, मुंबई, २०००, पृ. ३३७-३३८
  3. ^ म.सु. पाटील, विरेचन, संज्ञा-संकल्पना कोश, संपा. प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके, ग. रा. भटकळ फाउंडेशन, मुंबई, २००१
  4. ^ प्रा. देवानंद सोनटक्के, एम. ए. भाग १, व्याख्यान, क. भा. पा. महाविद्यालय, पंढरपूर, १९, २० सप्टें., २०१३