किशोर (मासिक)
किशोर | |
---|---|
प्रकार | |
भाषा | मराठी |
संपादक | किरण केंद्रे |
माजी संपादक | वसंत शिरवाडकर, वसंत सबनीस,
ज्ञानदा नाईक, माधव राजगुरू |
प्रकाशक | विवेक उत्तम गोसावी, नियंत्रक
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, प्रभादेवी, मुंबई. |
सशुल्क खप | ७४,००० |
एकूण खप | ७४,००० |
स्थापना | १९७१ |
पहिला अंक | १४ नोव्हेंबर १९७१ |
कंपनी | महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ |
देश | भारत |
मुख्यालय | पुणे |
संकेतस्थळ | http://kishor.ebalbharati.in/Archive/index.aspx |
किशोर हे ८ ते १४ ह्या वयोगटातील मुलांसाठी बालभारतीच्या वतीने चालवण्यात येणारे मासिक आहे. १९७१ पासून आजवर हे मासिक प्रसिद्ध होत आहे. पुण्याचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे मासिक प्रकाशित करते. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही ह्या मासिकाची उद्दिष्टे आहेत.[१] किशोरवयीन शालेय विद्यार्थी ह्या वाचकवर्गासाठी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन मासिकाची मांडणी केलेली असते. मराठी किशोरवयीन मुलांमध्ये हे आवडीचे मासिक आहे.
एकेकाळी दहा ते पंधरा वयोगटातल्या मुलांचं मनोरंजन करेल असे मासिक उपलब्ध नव्हते. मुलांसाठीची महत्त्वाची नियतकालिके बंद पडली होती. पाठ्यपुस्तकांइतकंच विद्यार्थ्यांना पूरक वाचन साहित्य देणे गरजेचे होतं. पूरक वाचनासाठी पुस्तके प्रसिद्ध करण्यात अनेक मर्यादा होत्या. मासिकाद्वारे हा उद्देश साध्य करणे शक्य होतं. त्यातून ‘किशोर’ची निर्मिती झाली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांंनी कृृृृषी, ग्रामीण विकास, उद्योग क्षेेेत्रावर भर देेत असतांनाच शिक्षण क्षेत्रावर प्रकर्षाने भर देत अनेेेक क्रांतिकारी निर्णय त्यांच्या कारकिर्दीत झाले. 'बालभारती' या संस्थेसह 'किशोर' व 'जीवनशिक्षण'मासिक देखील याच काळात निर्मिती झाली.
८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी, १४ नोव्हेंबर १९७१ रोजी वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत ह्या मासिकाचे प्रकाशन सुरू झाले. ‘किशोर’च्या पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी काढलेले नेहरूंचे चित्र होते. “तुमच्या बुद्धीला, तरल अशा कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला सतत काहीतरी हवे असते. काही अद्भुतरम्य विलक्षण असे पहावे, ऐकावे याकडे तुमचे मन सारखे झेपावते. या तुमच्या सर्वांगाने, सर्वांशाने फुलण्याच्या काळात तुम्हांला काही मदत करता आल्यास ती करण्याचा ‘किशोर’चा विचार आहे,' असे तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनी आपल्या मनोगतात म्हणले होतं. पहिल्या अंकाच्या प्रती शाळांमध्ये मोफत वाटण्यात आल्या आणि विद्यार्थी-शिक्षकांची प्रतिक्रिया अजमावण्यात आली. ‘किशोर’ची नियमित छपाई जानेवारी १९७२ पासून सुरू झाली. पहिल्यांदा दहा हजार प्रती छापण्यात आल्या. सहा महिन्यांनंतर ‘किशोर’ची विक्री दरमहा २५ ते ३० हजार प्रती आणि दिवाळी अंकाची विक्री ३५ ते ४० हजार प्रतींपर्यंत गेली. आता दरमहा सरासरी ६५ हजार प्रती वितरित होतात. किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे. ‘किशोर’ला कलात्मक मांडणी आणि आशय संपन्नतेचे अधिष्ठान दिले ते पहिले कार्यकारी संपादक वसंत शिरवाडकरांनी. ‘किशोर’ने कटाक्षाने काही पथ्ये पाळली. विद्यार्थी वाचकांमध्ये सम्यक, विवेकी, तर्कशुद्ध, विज्ञाननिष्ठ विचार-दृष्टिकोन रुजावा; त्यांच्या मनात धार्मिक, जातीय, आर्थिक, लैंगिक भेदाभेदाच्या विचारांचा प्रभाव पडू नये, यासाठी काळजी घेण्याचे धोरण ‘किशोर’नं स्वीकारले. अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे, जुन्या रूढी परंपरा, कर्मकांडांना प्रोत्साहन देणारे लिखाण मासिकात नसेल असे पाहिले गेले. विज्ञान, तंत्रज्ञान, भूगोल, सामाजिक इतिहास यासारख्या विषयांना विशिष्ट पाने राखीव ठेवण्यात आली. या विषयावरचे लेखन सोपे-सुटसुटीत असेल याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी होमी भाभा सायन्स एज्युकेशन सेंटरची मदत घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे ‘शंका-समाधान’ हे सदर व शिरवाडकर यांची ‘असे हे विलक्षण जग!’ ही लेखमाला खूप गाजली. गोष्टी, कवितांसोबत रंगीत चित्रे, रेखाटनं वापरण्याची प्रथा ‘किशोर’ने पहिल्या अंकापासून पाडली.
श्री. वसंत शिरवाडकरांनंतर हरहुन्नरी लेखक वसंत सबनीस आणि त्यानंतर ज्ञानदा नाईक या कार्यकारी संपादकांनी ‘किशोर’ची ध्वजा आणखी उंचावली. या तिघांचाही मराठी साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी गाढा संपर्क. त्यामुळे उत्तमोत्तम कविता, कथा, ललित लेखन, प्रवासवर्णने, स्थलचित्रं, व्यक्तिचित्रे यांनी ‘किशोर’चे अंक समृद्ध झाले. सोबत विज्ञान, तंत्रज्ञान, नवनवे शोध, पर्यावरण, प्रदूषण आदी विषय ‘किशोर’ने मुलांच्या भाषेत मांडले. मराठीतल्या बहुतांश लेखक-कवींनी किशोरसाठी लेखन केले आहे. अनेक प्रतिभावान चित्रकारांनी मासिकाला सजवले. त्याचे श्रेय या तीनही कार्यकारी संपादकांचे आहे. ज्ञानदा नाईक यांच्यानंतर २००८ ते २०११ या कालावधीत बालभारतीचे विशेषाधिकारी आणि प्रभारी कार्यकारी संपादक माधव राजगुरू यांनी समर्थपणे ही परंपरा पुढे सुरू ठेवली. शाळाशाळांमध्ये 'किशोर मंच' स्थापन करून जास्तीत जास्त विद्यार्थी किशोरचे लाभधारक व्हावेत, यासाठी प्रयत्न केले.‘किशोर’चे 2014 पासून कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनीही नवीन सदरे आणि रंजक उपक्रमांची ही परंपरा कायम राखली आहे.
किशोरनं दिग्गज चित्रकारांकडून चित्रे काढून तर घेतलीच, शिवाय सामाजिक भान ठेवून कला महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांनाही संधी दिली. त्यामुळे ‘किशोर’मधील चित्रे ताजीतवानी राहिली. तरुण कलाकारांच्या कुंचल्यांतून साकारलेल्या वेगवेगळ्या शैलीतल्या चित्रांनी मुखपृष्ठे सजली.
‘किशोर’ला देखणे करण्यात संपादक-चित्रकारांइतकाच निर्मिती विभागाचाही वाटा आहे. १९८४ च्या दिवाळी अंकासाठी शांताराम पवार यांनी फुलपाखरे, मुले आणि फुले यांचे प्रतीकात्मक चित्र केले होते. या मुखपृष्ठाला मोठा अवकाश हवा होता. तेव्हाचे नियंत्रक शं. वा. वेलणकर यांनी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाला दुमडता येईल असे एकेक पान जोडून भव्य कव्हर केले. या अंकासाठी गंगाधर गाडगीळ, शंकरराव खरात, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, अरुण साधू, राजा मंगळवेढेकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, वा.रा. कांत, संजीवनी मराठे, मंगेश पाडगावकर, शान्ता शेळके, शंकर वैद्य अशा मातब्बर लेखक-कवींनी लिहिलं होतं. याच वर्षी उन्हाळी सुट्टीचा विशेषांक काढण्यास सुरुवात झाली. नंतर नाट्य, लोककथा, स्वातंत्र्य, कारगिल युद्ध, स्वच्छता अशा वेगवेगळ्या विषयांवर विशेषांक काढण्याची प्रथा ‘किशोर’नं सुरू केली.
‘किशोर’साठी दुर्गा भागवत, पंढरीनाथ रेगे, ग. दि. माडगूळकर, वसंत सबनीस, ज्योत्सना देवधर, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, श्रीपाद जोशी, व्यंकटेश माडगूळकर, विंदा करंदीकर, सरिता पदकी, महावीर जोंधळे यांनीही लेखन केलं. राजन खान, प्रवीण दवणे, राजीव तांबे, संजय भास्कर जोशी, अरुण म्हात्रे, दासू वैद्य या आताच्या लेखकांपर्यंत हा प्रवास सुरू आहे. अन्यत्र प्रसिद्ध झालेलं साहित्य न स्वीकारण्याच्या भूमिकेमुळं मुलांना नेहमी कोरं-करकरीत वाचायला मिळालं. चित्रकार मुरलीधर आचरेकर, राम वाईरकर, प्रभाशंकर कवडी, पद्मा सहस्रबुद्धे, श्रीधर फडणीस, मारिओ मिरांडा, अनंत सालकर, रवी परांजपे, शांताराम पवार, अनंत कुलकर्णी, श्याम फडके, मुकुंद तळवलकर, अरुण कालवणकर, भालचंद्र मोहनकर, रेश्मा बर्वे, घनश्याम देशमुख, प्रभाकर काटे, रमेश मुधोळकर आदींनी रंगवलेल्या जादुई दुनियेत मुलं हरवून गेली. ‘माझे बालपण’, ‘सुटीचे दिवस’, ‘माझा गाव’, ‘चित्रकथा’, ‘फास्टर फेणे’, देशोदेशींच्या कथा मुलांपर्यंत पोचवणारं ‘देशांतर’ ही या मासिकातली काही गाजलेली सदरं. ‘माझे बालपण’ या सदरात यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर, विजय तेंडुलकर, सुनील गावसकर, जयंत नारळीकर ते नव्या पिढीचे सचिन तेंडुलकर, अमृता सुभाष यांनी लेखन केलं.
‘किशोर’ वाचकाभिमुख व्हावा म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. मुलांना गोष्टी, चित्रं, कोडी, विनोद असं हलकंफुलकं, चटपटीत वाचन हवं असतं. त्यानुसार बदल करण्यात येतात. विद्यार्थ्यांनी लिहितं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी साहित्याचा आणि चित्रांचा विभाग सुरू केला. विद्यार्थ्यांमधून लेखक घडावेत म्हणून ‘किशोर’नं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, वाड्यावस्त्यांवर, साखर शाळांमध्ये, दगडखाण कामगारांच्या मुलांच्या शाळांमध्ये, आदिवासी पाड्यांत लेखन कार्यशाळा घेतल्या. कविता, कथा, लेख कसे लिहावेत याचं मार्गदर्शन वसंत बापट, यदुनाथ थत्ते, महावीर जोंधळे, माधव वझे, अनिल तांबे, बाळ सोनटक्के, विजया वाड, प्रवीण दवणे आदींनी केलं. सर्वोत्तम ते देण्याची धडपड मासिकात प्रतिबिंबित होत असल्यानं ‘किशोर’ विविध व्यासपीठांवर नावाजला गेला. तीन अंकांना राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संघाची बक्षीसं मिळाली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्च १९७३ आणि नोव्हेंबर १९७६ च्या अंकांना छपाई आणि सजावटीसाठी अनुक्रमे श्रेष्ठता प्रमाणपत्र आणि प्रथम पुरस्कार देऊन गौरवलं. ही परंपरा आजतागायत कायम आहे. २००९ मधील दिवाळी अंकाला पत्रसारांश प्रतिष्ठान इंदूर (मध्यप्रदेश) चा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते मिळाला, तर २०१६ दिवाळी अंकालाही महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जानकीबाई केळकर उत्कृष्ट बालसाहित्य पारितोषिक मिळाले. आजपर्यंत मासिकाला वेगवेगळी ४५ पारितोषिकं मिळाली आहेत.
‘किशोर’चं वितरण ‘बालभारती’च करते. शाळा आणि देणगीदारांना पोस्टामार्फत सवलतीच्या दरात अंक वितरित केला जातो. सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यापासून ‘किशोर’मध्ये चार इंग्रजी पानं देण्यात येतात.
निवडक किशोर
[संपादन]मराठी साहित्यातल्या मातब्बर लेखक-कवींनी ‘किशोर’साठी लिहिलं. ‘किशोर’चा दिवाळी अंक तर मुलांसाठी खजिनाच. ही कलात्मक, साहित्यिक श्रीमंती जतन व्हावी, पुढील पिढ्यांपर्यंत पोचावी, म्हणून ‘बालभारती’नं ‘निवडक किशोर’चा उपक्रम हाती घेतला. निवडक कथा, कविता, कादंबरिका, दीर्घ कथा, गंमतगाणी, ललित, छंद, चरित्र आदी चौदा खंड प्रकाशित झाले. शांता शेळके आणि नंतर महावीर जोंधळे संपादन समितीचे अध्यक्ष होते.
संपादक : संचालक बालभारती (पदसिद्ध)
[संपादन]कार्यकारी संपादक : किरण केंद्रे
प्रकाशक
[संपादन]विवेक उत्तम गोसावी, नियंत्रक
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती
मंडळ, प्रभादेवी, मुंबई
किशोरचे अंक महाजालावर
[संपादन]किशोर मासिकाचे १९७१ ते २०१७ ह्या ४५ वर्षांतील सर्व अंक पीडीएफ स्वरूपात बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे अंक विनामूल्य संगणकीकृत करून देण्याचा प्रस्ताव 'बुकगंगाचे संचालक मंदार जोगळेकर ह्यांनी बालभारतीपुढे ठेवला होता. तो बालभारतीने मान्य केला.[२]
संदर्भ
[संपादन]संदर्भसूची
[संपादन]- "किशोरविषयी". 2017-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- "बातमी : दिव्य मराठी". २६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- किशोर मासिकाचे १९७१ पासूनचे अंक Archived 2017-11-29 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |