काळाराम मंदिर
काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात नियमित पूजाअर्चा होत असते. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात. राममंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राममंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहात असत. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती अंतरा-अंतरावर सापडल्या जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड, सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय. या मूर्ती स्वंयभू म्हणून ओळखल्या जातात. गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतर पायी चालत जाण्याइतके आहे. हा भाग जुन्या नाशकात येत असल्याने येथे वाहनतळाचा (पार्किंगचा) प्रश्न आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे श्रेयस्कर आहे.
सत्याग्रह
[संपादन]भारतातील दलित चळवळीच्या इतिहासात या मंदिराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २ मार्च, १९३० रोजी या मंदिरात दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मंदिराबाहेर मोठे आंदोलन उभे राहिले होते. या सत्याग्रहाचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केले होते. त्याचा परिणाम म्हणून आज दलितांना मंदिर प्रवेश करता येतो. हे मंदिर प्राचीन असून खूप सुंदर आहे.[ संदर्भ हवा ]