Jump to content

कांचन सोनटक्के

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कांचन सोनटक्के तथा कांचन कीर्तिकर या अंध, अपंग, मूक-बधिर आणि मानसिक वाढ न झालेल्या मुलांना नृत्य शिकविणाऱ्या कार्यकर्त्या आहेत.

शिक्षण आणि प्रशिक्षण[संपादन]

कांचन सोनटक्के या मूळच्या मुंबईच्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सेंट कोलंबा शाळेत झाले. मॅट्रिकनंतर त्या आधी एलफिन्स्टन कॉलेजात दाखल झाल्या. पुढे विल्सन कॉलेजमधून त्यांनी बी.एस्‌सी.पदवी प्राप्त केली.

कथ्थक नृत्याचे धडे त्यांनी सीता जव्हेरी ह्यांच्याकडे घेतले, भरतनाट्यमचा अभ्यास रमेश पुरव व पार्वतीकुमार ह्यांच्याकडे केला. त्यांचा लोकनृत्याचा अभ्यासही रमेश पुरव ह्यांच्याकडेच झाला.

कांचन सोनटक्के यांनी नाट्यकलेचा ‘अमृतनाट्य भारती’चा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तेथील गुरुवर्यांशी (कमलाकर सोनटक्के यांच्याशी) त्या विवाहबद्ध झाल्या.

नृत्य-नाट्यशास्त्राचे अध्यापन[संपादन]

कमलाकर सोनटक्के हे औरंगाबाद येथे विद्यापीठात प्राध्यापक असताना कांचन यांनी औरंगाबादमध्ये काही वर्षे ‘नृत्यभारती’ ही नृत्यशाळा चालवली आणि मग सोनटक्क्यांचे कुटुंब मुंबईला आले, म्हणून त्या मुंबईत परतल्या. मुंबईत त्यांच्याच सेंट कोलंबा शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती परेरा ह्यांच्या आग्रहावरून त्या शाळेत, सृजनशील नाट्य (Creative Dramatics) हा विषय, अर्धवेळ शिक्षिका म्हणून शिकवू लागल्या.

त्या ‘सेंट कोलंबा’बरोबर आणखी दोन शाळांत शिकवू लागल्या. शाळांमध्ये शिकवत असतानाच त्यांचे शिक्षणविषयक व कलाविषयक विचार विकसित झाले व त्यांनी ते कृतीत आणले. त्यातून त्यांची उपचारपद्धत आकार घेऊ लागली. सेंट कोलंबो शाळेत सर्वसामान्य मुलांबरोबर, कर्णबधिर मुलेही त्यांच्या वर्गात होती. तेथे त्यांनी स्वतःच्या कल्पना व क्षमता आणि मुलांचा उत्साह व उत्स्फूर्तता ह्यांचा मेळ घालत नवनवीन कलाकृती सादर केल्या. पारंपरिक भारतीय नाट्यकलेची मूलभूत तत्त्वे आणि पाश्चात्त्यकलेची आधुनिक तंत्रे ह्यांची सांगड घालून त्यांनी 'नाट्यकला- एक उपचारपद्धत' ही नवीन संज्ञा जन्माला घातली.

संस्था स्थापना[संपादन]

अपंगांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी व पुनर्वसनासाठी कांचन सोनटक्के यांनी अरुण व डॉ. रूपा मडकईकर ह्यांना सोबत घेऊन १९८१ मध्ये 'नाट्यशाला' ही संस्था स्थापन केली. 'नाट्यशाले'ने पंचाहत्तरहून अधिक प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आणि आठ हजारांवर शिक्षक प्रशिक्षित केले. कार्यशाळांत साडेसात हजारांच्यावर मुलांनी भाग घेतला. 'नाट्यशाले'ने प्रशिक्षित केलेल्या शिक्षकांकडून शिकणाऱ्या मुलांची संख्या लाखाच्या आसपास जाईल. 'नाट्यशाले'तर्फे महाराष्ट्रात बालनाट्य शिबिरेही होतात.

विशेष मुलांसाठी नाट्य-अध्यापन[संपादन]

’विशेष‘ मुलांमधील जाणिवा अधिकाधिक विकसित करण्यासाठी कांचनताईंनी ’थिएटर आर्टस‘चा उपयोग करून घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण प्रशिक्षण केंद्रात त्यांनी वाद्यसंगीत, गायन, नृत्य, नाट्य, हस्तकला आणि मल्लखांबासारख्या कलाप्रकारांचे शिक्षण सुरू केले. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील मुलांमधील कलाकौशल्य वाढविण्यासाठी त्या तळमळीने कार्यरत राहून त्यांनी संपूर्ण देशात कला प्रशिक्षण शिबिरे घेतली. या मुलांनी सादर केलेल्या नाटकांना नाट्यगृहे गर्दीने ओसंडून वाहत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. या शिबिरांसाठी कांचन सोनटक्की यांनी प्रशिक्षण देणाऱ्या कलावंतांचे पथक तयार केले. केवळ मुलेच नव्हे, तर शिक्षकांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे मुलांची कलाजाणीव वाढते, त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो, शैक्षणिक गुणवत्ता सुधारते, असे पालक आणि शिक्षकांचे निरीक्षण आहे. इतकेच नव्हे तर ’विशेष‘ मुलांचा सामाजिक वर्तन व्यवहारही सुधारत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुमारे आठ हजार शिक्षकांनी आजवर हे प्रशिक्षण घेतले आहे. पाच हजार मुलेही त्यांत सामील झाली आहेत. हा उपक्रम अव्याहत सुरू आहे.

कांचन सोनटक्के यांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर "विशेष‘ मुलांसाठी नाट्यशिबिरे घेतली आहेत. या मुलांनी सादर केलेल्या नाटकांना नाट्यगृहे गर्दीने ओसंडून वाहत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. ’विशेष‘ मुलांमधील आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी आणि त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे व्यवहार करण्यासाठी कांचनताईंनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर घेतलेल्या कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांचा खूप उपयोग झाला आहे.

नाट्यशालेव्यतिरिक्त अन्य संस्थांतून प्रशिक्षण शिबिरे[संपादन]

कांचन सोनटक्की यांनी आपल्या ’नाट्यशाला‘ या संस्थेशिवाय `एनसीपीए' (National Centre for the Performing Arts, मुंबई), "इंडियन असोसिएशन फॉर प्री-प्रायमरी एज्युकेशन,‘ महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक खाते, गोवा कला अकादमी, दक्षिण-मध्य आणि पश्‍चिम सांस्कृतिक केंद्र अशा अनेक संस्थांसाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले, शिबिरे घेतली.

कांचन सोनटक्के यांची नाट्यकारकीर्द[संपादन]

कांचनताईंनी २०१५ सालापर्यंत वीस हिंदी-मराठी नाटकांमधून भूमिका केल्या’. पंधरा नाटकांची वेशभूषा, प्रकाशयोजना केली.. "विशेष‘ मुलांसाठी ५० बालनाट्ये बसवली. त्यांचे रंगमंचीय, टीव्ही आणि रेडिओ या माध्यमांसाठी प्रयोग केले. ‘गोल गोल राणी,‘ ‘चू चू चू‘, ‘फुलराणी‘, ‘मजेत भूगोल शिकू या‘, ‘मंतरलेली मूर्ती‘, ‘मस्ती की पाठशाला‘, ‘रंगपांचालिक‘, ‘स्वामी विवेकानंद‘, ‘हाताची घडी तोंडावर बोट‘, ही त्यांची बालनाट्ये गाजली. ‘उमंग‘, ‘उडान‘ ‘जल्लोष‘, ‘संकल्प‘, या नावांनी त्यांनी उदयपूर, नागपूर, मुंबई, नवी मुंबई, सोलापूर येथ्ये घेतलेले बालनाट्य महोत्सव खूपच गाजले. या कार्यक्रमांतून केवळ नाटक नव्हे, तर अन्य कलाप्रकारांचीही जोपासना करण्यासाठी कांचनताईंनी प्रशिक्षण दिले.

बालरंगभूमी[संपादन]

महाराष्ट्रातल्या बालरंगभूमीला इ.स. २०१० नंतर मरगळ आली आहे. प्रेक्षक वर्गाने पाठ फिरवली आहे. ’विशेष‘ मुलांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी, उत्साह बालरंगभूमीकडे खेचून आणण्यासाठी कोणते उपाय योजावेत, याचा कांचन सोनटक्क्यांनी बराच विचार केला आहे.

सोनटक्क्यांच्या मते, बालरंगभूमीसाठी बाल आणि मोठा प्रेक्षक खेचण्यासाठी त्या पद्धतीचे ’कल्चर‘ विकसित करावे लागणार आह. नाट्य परिषदेने बालनाट्य संमेलन घेऊन त्याची सुरुवात केली आहे. बालनाट्यांच्या प्रयोगासाठी सभागृहाचे भाडे किंवा जाहिराती यावर मोठा खर्च होतो. त्या तुलनेत प्रेक्षकवर्ग तुटपुंजा असतो. शाळाशाळांमधून बालनाट्यांचे प्रयोग करता येतील काय, याचाही विचार व्हायला पाहिजे, अस कांचन सोनटक्के यांना वाटते.

कांचन सोनटक्के यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • दलित मित्र पुरस्कार
  • नाट्यदर्पण पुरस्कार
  • वसंत सोमण स्मृती पुरस्कार
  • सह्याद्री हिरकणी पुरस्कार
  • नोव्हेंबर २०१५ मध्ये सोलापूरला झालेल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाचे अध्यक्षपद.