Jump to content

कन्यागत महापर्वकाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महापर्वकाल म्हणजे महान पुण्य काळ. गुरू कन्या राशीत गेल्यावर कृष्णा नदीच्या तीरावर होणाऱ्या उत्सवाला कन्यागत महापर्वकाल उत्सव असे म्हणतात.

हे महापर्वकाल भारतभरात वेगवेगळ्या नदीकिनारी होत असतात. गुरू ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षणा करायला १२ वर्षे लागतात. म्हणजे गुरूचा मुक्काम दरवर्षी एका राशीत असतो. गुरू कुंभ राशीत गेला, की गंगा नदीच्या तीरावर कुंभमेळा साजरा होतो. गुरू सिंह राशीत गेला की गोदावरीच्या तीरावर सिंहस्थ मेळा होतो.

भारतात असेच दरवर्षी नद्यांचे लहान-मोठे उत्सव सुरू असतात. त्यातील सुमारे २५० उत्सव प्रसिद्ध आहेत. गुरू ग्रहाच्या प्रत्येक राशीमधील मुक्कामाच्या काळात देशाच्या विशिष्ट भागांमध्ये नद्यांच्या किनारी जे उत्सव सुरू असतात त्यांनाच महापर्वकाल म्हणतात. महापर्वकालाच्या ठिकाणच्या नदीमध्ये गंगा नदी अवतरते अशी श्रद्धा असते. संपूर्ण वर्षभर या स्थानिक नदीच्या सान्निध्यामध्ये गंगा नदी राहते अशी महापर्वकालाची संकल्पना आहे.

महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा या नद्यांच्या उगमस्थानी ७ कुंडे आहेत. त्यातील गंगा-भागीरथी हे कुंड ११ वर्षे कोरडे असते; मात्र गुरू कन्या राशीत गेला, की अचानक या कुंडातून वर्षभर पाणी येत राहते, असे सांगितले जाते. यालाच गंगा नदी कृष्णा नदीच्या भेटीला आली, असे म्हणतात. ही घटना १२ वर्षांतून एकदा घडते. या वेळी कृष्णा नदीच्या उगमापासून ती सागराला मिळेपर्यंत सर्वत्र कन्यागत महापर्वकाल हा कृष्णा नदीचा उत्सव साजरा केला जातो.

कन्यागत महापर्वकाळाचे नृसिंहवाडी हे मुख्य ठिकाण असले तरी त्याचबरोबर महाबळेश्वर, वाई, माहुली, कऱ्हाड, औदुंबर, कोळे-नरसिंहपूर, ब्रह्मनाळ, हरिपूर-सांगली, गणेशवाडी, अमरापूर, शिरोळ, कुरुंदवाड, खिद्रापूर, उगार, कुरवपूर, पाताळगंगा (श्री शैल्यम), कर्दळीवन इत्यादी ठिकाणीही हा पर्वकाळ साजरा केला जातो. त्याचबरोबर गणेशवाडी या गावाला विशेष महत्त्व आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पश्चिम वाहिनी नदी हे आहे. कारण गणेशवाडी हे महाराष्ट्रातील पहिले गाव आहे जिथे कृष्णा नदी हे पूर्वेकडून पश्मिकडे वाहते.

पुस्तक

[संपादन]

‘कन्यागत महापर्वकाल’ या विषयावर प्रा. क्षितिज पाटुकले यांनी याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात वर्षभर चालणाऱ्या या सोहळ्यातील शाही स्नानांचे पर्वकाल, कन्यागतची दुर्मीळ माहिती, कन्यागत महाविधी, कृष्णा नदीची जन्मकथा आणि माहात्म्य, कृष्णातीरावरील तीर्थक्षेत्रे, कृष्णा नदी आणि नृसिंहवाडी, श्रीदत्त माहात्म्य यांची माहिती दिली आहे.