Jump to content

के. शंकरनारायणन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कटीकल शंकरनारायणन या पानावरून पुनर्निर्देशित)

कतिकल शंकरनारायणन ऊर्फ के. शंकरनारायणन ([ १५ ऑगस्ट, १९३२ - २४ एप्रिल, २०२२[][]) हे भारताच्या काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल होते. ह्या पदावर ते जानेवारी २०१० ते ऑगस्ट २०१४ दरम्यान होते. त्यापूर्वी ते नागालॅंड राज्याचे राज्यपाल व केरळ मंत्रिमंडळात मंत्री होते. श्री कतिकल शंकरनारायणन यांनी २२ जानेवारी २०१० रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. यांना सार्वजनिक जीवनाचा सहा दशकांचा अनुभव होता.

बालपण

[संपादन]

१५ ऑक्टोबर इ.स. १९३२ रोजी केरळमध्ये जन्मलेले शंकरनारायणन वयाच्या १४ व्या वर्षी विद्यार्थी संघटनेचे सदस्य झाले.

कारकीर्द

[संपादन]

इ.स. १९५७ ते इ.स. १९६४ आणि त्यानंतर इ.स. १९६४ ते इ.स. १९६८ या कालावधीत ते पालघाट जिल्हा काँग्रेसचे अनुक्रमे सचिव व अध्यक्ष होते. इ.स. १९६८ ते इ.स. १९७२ या कालावधीत ते अविभाजित काँग्रेसचे सचिव होते. १९७२ साली शंकरनारायणन यांची केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली. हे पद त्यांनी १९७७ पर्यंत सांभाळले. शंकरनारायणन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य होते. तसेच काँग्रेस पक्ष संघटनेच्या अखिल भारतीय संसदीय मंडळाचेदेखील सदस्य होते. केरळ राज्य विधान सभेवर ते अनेकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले. पाचव्या केरळ विधानसभेत ते तिर्थला येथून निवडून गेले होते, तर सहाव्या विधानसभेत त्यांनी श्रीकृष्णपुरमचे प्रतिनिधित्व केले. ओट्टापलम येथून त्यांनी आठव्या विधानसभेत प्रवेश केला तर अकराव्या विधानसभेवर ते पालघाट मतदार संघातून निवडून गेले, यावरून त्यांचा व्यापक जनसंपर्क व लोकप्रियता दिसून येते. इ.स. १९७७ साली शंकरनारायणन तत्कालीन मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्या मंत्रिमंडळात कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास आणि सामुदायिक विकास खात्याचे मंत्री झाले. त्यानंतर ए. के. ॲंटनी यांच्या मंत्रिमंडळातदेखील ते मंत्री होते. ॲंटनी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत ते २००१ ते २००४ या काळात ते अर्थ व राजस्व खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. इ.स. १९८० ते इ.स. १९८२ या काळात श्री शंकरनारायणन विधानसभेच्या आश्वासन समितीचे अध्यक्ष होते, तर इ.स. १९८९ ते १९९१ या कालावधीत ते लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते. आघाडीचे सरकार चालविणे किती कठीण काम आहे, हे राजकीय निरीक्षक जाणतातच. या पार्श्वभूमीवर इ.स. १९८५ ते इ.स. २००१ या तब्बल साडेसोळा वर्षांच्या काळात ते केरळातील संयुक्त लोकशाही आघाडीचे निमंत्रक होते. या आघाडीत तब्बल सात राजकीय पक्ष होते आणि त्यांना सोबत घेऊन चालण्याची तारेवरची कसरत त्यांनी सहज केली. दि.३ फेब्रुवारी इ.स. २००७ रोजी शंकरनारायणन यांची नागालॅंडच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झाली. त्यांनी २५ जुलै इ.स. २००९ पर्यंत म्हणजे जवळजवळ अडीच वर्षे त्यांनी या पदाचा कार्यभार पाहिला. या दरम्यान नागालॅंडमध्ये काही काळ राष्ट्रपती राजवट लागू होती. ही राजवट संपल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात सर्वसाधारण निवडणूक तसेच नागालॅंड विधानसभेची निवडणूक होऊन लोकनियुक्त सरकार स्थापन झाले. दि. २६ जुलै इ.स. २००९ रोजी झारखंडचे राज्यपाल म्हणून शंकरनारायणन यांनी शपथ घेतली तेव्हा ते राज्यदेखील राष्ट्रपती राजवटीखाली होते. झारखंडमधील त्यांच्या कार्यकाळात राज्य विधानसभेची निवडणूक निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पडली व राज्यात सरकारची स्थापना झाली.

महाराष्ट्राचे राज्यपाल

[संपादन]

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यावर शंकरनारायणन यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला. विकास, उच्च शिक्षण, पर्यावरण संरक्षण व लोककल्याण या विषयांवर त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने शंकरनारायणन यांनी अवघ्या दीड वर्षांच्या काळात तब्बल १४ कुलगुरूंच्या नियु्क्त्या केल्या. या नियु्क्त्या राजकीय शिफारशींवरून न होता केवळ गुणवत्तेच्या आधारावर करण्याबाबत ते विशेष आग्रही राहिले. घटनेच्या अनुच्छेद ३७१(२)अंतर्गत राज्यातील वैधानिक विकास मंडळांसंदर्भात प्राप्त अधिकारांचा वापर करून शंकरनारायणन यांनी विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून राज्यातील मागास भागांच्या विकासाच्या पातळ्यांचा नवे मापदंड वापरून तौलनिक अभ्यास करण्याचे काम त्या समितीला देण्यात आले आहे. आपल्या पर्यावरणाविषयक प्रेमाची साक्ष देत शंकरनारायणन यांनी नागपूरमधील राजभवन येथे एक विस्तीर्ण जैववैविध्य उद्यान स्थापन करण्याची सूचना केली असून येत्या काही महिन्यातच त्याचे विधिवत उद्‌घाटन होणार आहे. या जैववैविध्य उद्यानामध्ये मध्य भारतातील विविध वनस्पतींचे जतन व पुनरुज्जीवन होणार आहे.

आपली सर्व हयात मूल्याधिष्ठित राजकारणात घालविणाऱ्या शंकरनारायणन यांना लोककल्याण व विकासविषयक प्रश्‍नांमध्‍ये विशेष रुची आहे.

मागील
शिलेन्द्र कुमार सिंग
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल
2007–2008
पुढील
जोगिंदर जसवंत सिंह
मागील
शिव चरण माथूर
आसामचे राज्यपाल
2009
पुढील
सैय्यद सिब्‍टी रजी
मागील
एस.सी. जमीर
महाराष्ट्राचे राज्यपाल
2010–2014
पुढील
सी. विद्यासागर राव

संदर्भ आणि नोंंदी

[संपादन]
  1. ^ "മുതിർന്ന കോൺഗ്രസ് നേതാവും മുൻമന്ത്രിയുമായ കെ. ശങ്കരനാരായണൻ അന്തരിച്ചു".
  2. ^ "മുതിർന്ന കോൺഗ്രസ് നേതാവ് കെ.ശങ്കരനാരായണൻ അന്തരിച്ചു".