Jump to content

एडी रिकेनबाकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एडवर्ड व्हरनॉन एडी रिकेनबाकर (८ ऑक्टोबर, १८९०:कोलंबस, ओहायो, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - २३ जुलै, १९७३:झुरिक, स्वित्झर्लंड) हा अमेरिकेचा लढाऊ वैमानिक होता. पहिल्या महायुद्धात याने विमानांतील द्वंद्व युद्धात एकदाही आपले विमान न गमावता शत्रूची २६ विमाने पाडली होती. याला मेडल ऑफ ऑनर हा अमेरिकेचा सर्वोच्च सैनिकी सन्मान दिला गेला तसेच डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस क्रॉस हा द्वितीय क्रमांकाचा सन्मान आठ वेळा दिला गेला.

युद्धानंतर रिकेनबाकरने कारशर्यतींमध्ये व्यावसायिक चालक म्हणून भाग घेतला तसेच इंडियानापोलिस मोटर स्पीडवे हे शर्यतस्थळ विकत घेऊन ते पंधरा वर्षे चालवले. त्याने रिकेनबाकर मोटर कंपनी ही मोटरगाड्या तयार करण्यारी कंपनी काढली. काही वर्षांनी ही कंपनी बंद पडली व रिकेनबाकरच्या डोक्यावर २,५०,००० अमेरिकन डॉलरचे कर्ज आले. यामुळे त्याने दिवाळखोरी जाहीर केली. त्यायोगाने या कर्जाची परतफेड करणे सक्तीचे नसूनही रिकेनबाकरने इतर मार्गाने पैसे मिळवून हे कर्ज चुकते केले.

१९३५ च्या सुमारास रिकेनबाकरने जनरल मोटर्स साठी काम करीत असताना नॉर्थ अमेरिकन एव्हियेशन ही कंपनी जीएम साठी विकत घेतली. त्यातील ईस्टर्न एर ट्रान्सपोर्ट या भागाचे रिकेनबाकर व त्याच्या सहकाऱ्यांनी फ्लोरिडा एरवेझशी एकत्रीकरण करून ईस्टर्न एरलाइन्स या विमानवाहतूक कंपनीची रचना केली. त्याची प्रगती झाल्यावर जनरल मोटर्सने ईस्टर्न एरलाइन्स विकायला काढल्यावर रिकेनबाकरने ३५ लाख डॉलर उभे करून ती स्वतःच विकत घेतली. त्याने ही कंपनी अनेक वर्षे चालवली.

वयाच्या ८२व्या वर्षी रिकेनबाकर झुरिकमध्ये मृत्यू पावला.