एका कोळियाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एका कोळियाने हे अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे जगप्रसिद्ध ‘ओल्ड मॅन अँड द सी’ या पुस्तकाचे मराठी भाषांतर आहे. ते पु.ल.देशपांडे यांनी केले आहे. मूळ पुस्तकातील चित्रांचा वापर पुस्तकात केला असल्याने वाचकाला समग्र अनुभव मिळतो.

समुद्रावर मासेमारी करायला जाणाऱ्या एका म्हाताऱ्या कोळ्याची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लिन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. ८४ दिवस होऊनही जाळ्यात मासा न सापडणे हे तो म्हातारा कोळी आपले दुर्भाग्य समजत असतो.

‘ओल्ड मॅन अँड द सी’ या पुस्तकाच्या निर्मितिप्रक्रियेची अवस्था लेखक कशी भोगतो, हे पुस्तक वाचल्यानंतर कळून येते. अनेक प्रकाशकांनी आधी हे लेखन ‘साभार परत’ केले होते. 'द ओल्ड मॅन अँड द सी' या पुस्तकाला पुलित्झर पारितोषिक मिळाले होते.

मराठी शीर्षकावर टीका[संपादन]

पु.लंनी हे शीर्षक समर्पक दिले आहे, असा समज आहे. तथापि नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी शीर्षकावर भेदक टीका केली आहे. ते म्हणतात, "आपण मात्र आपल्या खास मराठी लेखकीय शब्दाळू आणि लडिवाळ मोहाने पुस्तकाच्या शीर्षकाचा अनुवाद ‘एका कोळियाने..’ असा केला आणि एका जातीच्या माणसाची कथा या पुस्तकात आहे की काय असा गैरसमज होईल याची तरतूद करून ठेवली!" [१] तथापि मूळ पुस्तकाबाबत ते म्हणतात, "समुद्र, नाव, एक म्हातारा आणि माणूस नष्ट होईल, पण पराभूत होणार नाही, हे मनावर ठसणारे, बुलंद आणि बलदंड तत्त्व या पुस्तकात दिसून येते. "[१]

मूळ मराठी कविता[संपादन]

ही कविता "एका कोळ्याचे प्रयत्‍न " या नावाची आहे. कवी अज्ञात आहे.[२]

एका कोळियाने एकदा आपुले । जाळे बांधियेले उंच जागी।।
तेथुनि सुखाने खालती तो आला । परि मग झाला कष्टी बहू।।
मागुति जाळियामाजि जाता येना । धाग्यावरूनि पुन्हा पुन्हा पडे।।
चार वेळ तो ह्या परि पडे । जाय बापुडा भागुनि पुढे।।
आस खुंटली येतसे रडे । आंग टाकुनी भूमिसी पडे।।
फिरुनि एकदा धीर घरुनिया । लागे हळूहळू वरती चढाया।।
परि जाळ्यमघि शिरताना । तो झोक जाउनी पडला।।
पाचहि वेळा यत्‍न करूनिया । आले यश न तयाला।।
गरिब बापुडा कोळी तेव्हा । दुःखी अतिशय झाला।।
हिंमत धरुनि फिरुनि । आणखी धागा चढुनि गेला।।
परि जाळ्यामधि शिरताना । तो झोक जाऊनि पडला।।
अहा मज ऐसा दैवहत प्राणी । खचित जगती या दिसत नसे कोणी।।
निराशेने बोलुनी असे गेला । परि चित्ति स्वस्थता नये त्याला।।
मग वेगे वेगे ऊठे धागा चढु लागे नेटे । बहु घेई खबरदारी जाई पोचे जाळ्यावरी।।
हळुच मग आत शिरे पोटी आनंदाने भरी । झटे निश्चयाचे बळे अंति त्याला यश मिळे।।

तात्पर्य : अंगी निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ।।

चित्रपट[संपादन]

The Old Man and the Sea वर १९५८ साली चित्रपट निघाला. तथापि तो इंटरनेट उपलब्ध नाही. इंग्लिश विकीपेडियावर त्याविषयी पान आहे.

यू ट्यूब वर ॲनिमेटेड चित्रपट उपलब्ध आहे : ‘ओल्ड मॅन अँड द सी’

मूळ इंग्लिश कथा[संपादन]

The Old Man and the Sea : येथे पीडीफ उपलब्ध Archived 2016-10-18 at the Wayback Machine.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b नारायण कुळकर्णी कवठेकर, 'तपशिलातून तत्त्वाकडे…' http://www.loksatta.com/lokrang-news/article-on-marathi-literature-77463/lite/, २१ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ KamalAhe , "यत्‍न तो देव" http://kamalahe.blogspot.in/2013/02/blog-post_21.html २१ जुलै २०१६ रोजी पाहिले.