Jump to content

अर्नेस्ट हेमिंग्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्नेस्ट हेमिंग्वे

विसाव्या शतकातील श्रेष्ठ अमेरिकन कथा-कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील ओक पार्क येथे १८९९ साली झाला. त्यांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते तसेच त्यांना शिकार, मासेमारी असे छंद होते. अर्नेस्टना बाळपणीच वडिलांकडून या छंदांचे बाळकडू मिळाले. पुढे आयुष्यभर अर्नेस्टने शिकार, मासेमारी, मुष्टियुद्ध, बैलांच्या झुंजी असे छंद जोपासले. ओक पार्क मध्ये ते फुटबॉल खेळत, मुष्टियुद्धात भाग घेत आणि शालेय वृत्तपत्रातून लेखन करीत असत.

वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी कान्सास सिटी स्टार या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कामास सुरुवात केली. त्याच दरम्यान त्यांनी पहिल्या महायुद्धात लढाईवर जाण्यासाठी आपले नाव नोंदविले; पण त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष असल्याने त्यांची निवड झाली नाही. तेव्हा त्यांनी रेडक्रॉसच्या ॲंब्यूलन्सचा ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळविली. आपल्या जिवाची तमा न बाळगता त्यांनी एका जखमी सैनिकाचा जीव वाचविल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

पहिल्या महायुद्धानंतर अर्नेस्ट हेमिंग्वे पुन्हा पत्रकारितेकडे वळले. १९२५ साली त्यांचे पहिले महत्त्वाचे पुस्तक इन अवर टाइम प्रकाशित झाले. या कथासंग्रहात मिशिगनमधील बालपणीचे अनुभव त्यांनी लिहिले आहेत. १९२६ साली द सन ऑल्सो राइझेस आणि १९२९ साली अ फेअरवेल टू आर्म्स नावाच्या पहिल्या महायुद्धावर आधारीत कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. यात पहिल्या महायुद्धाच्या विध्वसंक अनुभवाने हताश झालेल्या तरुण पिढीचे चित्रण हेमिंग्वे यांनी केले आहे. १९३७ साली प्रकाशित टू हॅव अँड हॅव नॉट ही कादंबरी आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीची, हूम द बेल टोल्स (१९४०) ही स्पॅनिश यादवी युद्धावर आधारीत महाकाव्यसदृश कादंबरी, ॲक्रॉस द रिव्हर अँड इन्टू द ट्रीज (१९५०) ही दुस्ऱ्या महायुद्धानंतर एका प्रेमसंबंधांवर आधारीत कादंबरी, अशा विविध विषयांवर हेमिंग्वे यांनी विपुल लिखाण केले.

हेमिंग्वे यांची द ओल्ड मॅन अँड द सी ही सर्वोत्कृष्ठ कादंबरी मानली जाते. त्यांनी सुमारे ५० कथा लिहिल्या आणि त्यांचे तीन कथासंग्रह इन अवर टाइम (१९२५), मेन विदाउट विमेन (१९२७) आणि विनर टेक नथिंग (१९३३) प्रसिद्ध झाले आहेत. हेमिंग्वे यांच्या कथांमध्ये निक ॲडम्स नावाचा एक तरुण नायक भेटतो, तरुण हेमिंग्वेचेच ते एक रूप असल्याचे जाणवते. यावर लिहिलेल्या कथांपैकी द किलर्स, द शॉर्ट हॅपी लाइफ ऑफ फ्रान्सिस मॅकॉम्बर, द स्नोज ऑफ किलिमांजरो अतिशय गाजल्या.

पहिले महायुद्ध, आर्थिक मंदी, दुसरे महायुद्ध, जर्मनीतील हिटलरशाही, रशियातील रक्तरंजित संघर्ष, स्पॅनिश यादवी युद्ध अशा सर्व जागतिक घाडामोडींवर आणि स्वतःच्या छंदांवरून घेतलेले विषय, जंगले, बंदुका, प्रेमप्रकरणे, आत्महत्या या विषयांचे मनस्वी आकर्षण हेमिंग्वे यांना होते आणि तेच त्यांच्या लिखाणात उमटले आहे.

१९५४ साली अर्नेस्ट हेमिंग्वे यांना साहित्यातील सर्वाधिक मानाचे नोबेल पारितोषिक मिळाले.

अर्नेस्ट हेमिंग्वे यांना मृत्युचे खूप आकर्षण होते. वयाची ६० जवळ येत असतांना त्यांना मधुमेह, रक्तदाब, विस्मरण, संशयग्रस्तता, भयगंड अशा असाध्य व्याधींमुळे ते त्रस्त होते. व्याच्या ६२ व्या वर्षी १९६१ साली अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागे मृत्यु विषयीची ओढ असणे एक कारण असु शकेल पण ही ओढ अनुवांशिक असावी असे म्हणतात. कारण अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या वडिलांनीही डोक्यात गोळी झाडुनच आत्महत्या केली होती. त्यांच्या भावालाही आजारपणातून आपण बरे होऊ शकत नाही असे वाटल्यावरून गर्दचे व्यसन लागले होते. अर्नेस्ट हेमिंग्वे यांना तीन मुली, पैकी एकीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली, दुसरी जवळजवळ वेडी झाली तर मुलगा ग्रेगरी यालाही वेडाचे झटके येत असत. बेदरकार, बेधडक, बेभान वर्तन त्यातून निर्माण झालेले आजार, मनोरूग्णता, वेड, स्मृतिनाश, न्यूनगंड अशा विकारांनी सगळेच ग्रासलेले दिसून येते. त्यामुळेच आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला असावा.

बाह्य दुवे

[संपादन]